Hyperhidrosis: घाम येणे ही एक सामान्य शारीरिक प्रक्रिया आहे. आपल्या त्वचेमध्ये काही सूक्ष्मछिद्रे असतात. या छिद्रांद्वारे शरीरासाठी अपायकारक द्रव्ये घामाच्या स्वरुपातून बाहेर येत असतात. घाम येणे हे शरीररचनेवर अवलंबून असते. तसेच आसपासच्या वातावरणाचा शरीरावर परिणाम झाल्याने घाम येण्याचे प्रमाण कमी-जास्त होत असते. म्हणजेच वातावरणामध्ये उष्णता असताना जास्त घाम येतो, तसेच थंड वातावरण असताना फारसा घाम येत नाही. शरीराचे तापमान नियंत्रणामध्ये राहावे यासाठी घाम येत असतो. पण काहीजणांना एसीच्या समोर बसूनही घाम फुटत असतो. एसी असलेल्या थंड खोलीत बसूनही जर घाम येत असेल, तर त्या व्यक्तीला Hyperhidrosis चा त्रास आहे असे म्हटले जाते.
Hyperhidrosis म्हणजे काय?
गरजेपेक्षा जास्त घाम येण्याची स्थितीला ‘हायपरहाइड्रोसिस’ (Hyperhidrosis) असे म्हटले जाते. आपल्या शरीरातील घामाच्या विशिष्ट ग्रंथीद्वारे घाम बाहेर निघत असतो. आसपास कसे वातावरण आहे यावर घाम येण्याचे ठरत असते. पण हायपरहाइड्रोसिस आजाराचा सामना करत असलेल्या व्यक्तीच्या शरीरातील घामाच्या ग्रंथींमधून कारण नसतानाही घाम बाहेर पडत असतो. हा आजार असलेल्या व्यक्तीला एसीसमोर बसूनही प्रचंड घाम येऊ शकतो. एसीच नाही, तर स्विमिंग पूलमध्येही तो घामाने भिजू शकतो.
Hyperhidrosis आजाराची लक्षणे कोणती आहेत?
हात, पाय, काख, चेहरा अशा विविध अवयवांना प्रचंड प्रमाणात घाम येणे हे हायपरहाइड्रोसिसचे प्रमुख लक्षण आहे. शरीराच्या अंगांना विनाकारण घाम सुटणे ही या आजाराची प्राथमिक स्थिती आहे असे मानले जाते. सेकेंडरी हायपरहाइड्रोसिस असलेल्या व्यक्तीला संपूर्ण शरीराला घाम येत असतो. या परिस्थितीमध्ये त्रास वाढत जातो. त्यामुळे यावर लवकरात लवकर उपचार करणे आवश्यक असते.
Hyperhidrosis होण्यामागील कारणे
प्रायमरी हायपरहाइड्रोसिस हा अनुवांशिक असू शकतो. म्हणजे हा आजार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असतो. सेकेंडरी हायपरहाइड्रोसिस ही स्थिती संभवण्याची अनेक कारणे आहेत. गरोदरपणामध्ये हा त्रास सुरु होऊ शकतो. याव्यतिरिक्त मधुमेह, थायरॉईड असंतुलन, रजोनिवृत्ती, लठ्ठपणा, संधिवात, हृदयरोग, श्वसन समस्या अशा काही आजारांमुळेही ही समस्या उद्भवते. काही वेळेस ताणतणाव वाढल्यानेही सेकेंडरी हायपरहाइड्रोसिस होऊ शकतो. कधीकधी हा त्रास विशिष्ट औषधांच्या सेवनामुळेही होऊ शकतो.