गेल्या आठवड्यात एका अभिनेत्रीने मुलाखतीत सांगितलं की, “मी संध्याकाळी लवकर जेवते आणि थेट दुपारचं जेवण करते गेले ४ ते ६ महिने अशा प्रकारचा आहार घेतल्याने मला खूप शांत वाटतंय. माझ्या विचारात तारतम्य आलंय” आणि ‘इंटरमिटन्ट फास्टिंग’ अर्थात ‘सविराम उपास’ या प्रकारचं आहारनियमन पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलं.
सविराम उपास म्हणजे काय?
ठराविक कालावधीसाठी खाण्याच्या वेळा नेमून त्यानुसार आहारनियमन करणे, म्हणजे उपास. या पद्धतीची सुरुवात ठराविक पद्धतीने शरीराची लय सांभाळण्यासाठी झाली होती. आपल्या शरीराचा केंद्रबिंदू म्हणजे मेंदू आणि त्यातून स्त्रवणारी संप्रेरके! सविराम उपास याच संप्रेरकांचे संतुलन लयबद्ध करण्यात मदत करते, असे अनेक संशोधनातून सिद्ध झाले आहे. याच सविराम उपासाच्या काही पद्धतींची माहिती करून घेऊया.
१. एक दिवस आड उपास करणे
या प्रकारात एक दिवसाआड जेवण केले जातात. २४ तास आपल्या पचनसंस्थेला पूर्णपणे विराम दिला जातो. दुसऱ्या दिवशी नेहमीचे खाणे खाल्ले जाते.
२. सुधारित सविराम उपास
या प्रकारात आठवड्यातील ५ दिवस मनाजोगतं खाऊन उरलेले २ दिवस कमी कॅलरी असणारा आहार घेतला जातो (याला मी सोयीस्कर- साविराम आहार म्हणते.)
३. वेळेच्या बंधनात केले जाणारे सविराम उपवास
या प्रकारात १२ किंवा १४ किंवा १६ किंवा १८ किंवा २० तास खाण्यास विराम देऊन खाण्यासाठी उरलेला वेळ नेमून दिला जातो. या वेळेत योग्य कॅलरीचं जेवण करून उर्वरित वेळेत केवळ पाण्यासारखी शून्य कॅलरी असणारी द्रव्ये प्यायली जाऊ शकतात.
भारतासारख्या देशांत विविध धर्मांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपवास केले जातात. ज्यात ७ दिवस ते १५ दिवस किंवा महिनाभर सातत्याने कंदमुळे न खाणं किंवा केवळ पाणी पिऊन उपवास करणं, सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेप्रमाणे अन्नग्रहण करण्याची परंपरा आहे. पूर्वापार चालत आलेल्या या पद्धतीमध्ये ठराविक कालावधीसाठी शास्त्रीय कारणांसोबत धार्मिक कारणेदेखील जोडलेली आहेत. यातील महत्वाची धारणा मानसिक संतुलन आणि संयम ही आहे.
हेही वाचा… Health Special: पावसाळ्यातील आरोग्यबिघाडाला ‘हे’ कारणीभूत!
सातत्याने एक दिवस आड काहीच न खाणे किंवा अत्यंत कमी आहार घेतल्यामुळे शरीरातील स्नायूंची होणारी झीज हा मुख्य मुद्दा लक्षात घेतला जातो. लठ्ठ व्यक्तीमध्ये उपास केल्यास हमखास वजन कमी होते. मात्र असे उपास करून शरीराला मुबलक ऊर्जेचा पुरवठा न झाल्यामुळे डोके दुखणे, झोप न लागणे, मायग्रेन वाढणे असे परिणाम होऊ शकतात. वेळेच्या बंधनात केले जाणारे सविराम उपास मात्र वेगेवेगळ्या माणसांमध्ये वेगेवेगळे परिणाम देऊ शकतात. शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण कमी होणे. शरीरातील अतिरिक्त चरबीचे प्रमाण कमी होणे असे चांगले बदलदेखील दिसून येतात. शरीरातील सूक्ष्म जैविकांचे प्रमाणही योग्य प्रमाणात राखले जाते.
हेही वाचा… Health Special: मुलांच्या मोबाईलचं करायचं काय?
वेळेनुसार केल्या जाणाऱ्या सविराम उपास पद्धतीमध्ये शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण उत्तमरीत्या कमी झालेलं आढळून आले आहे. या प्रकारात खाण्याची शिस्त, महत्वाच्या पोषणमूल्यांचे प्रमाण या तितक्याच महत्त्वाच्या बाबी आहेत. १२ तास किंवा १४ तास केल्या जाणाऱ्या सविराम उपास पद्धतीमध्ये “पाहिजे ते खाण्याची” मुभा अनेकदा अत्यंत चुकीच्या अर्थाने घेतली जाते. यातील खाण्याच्या वेळेत अतितेल, अतिसाखर, अतिमसालेदार पदार्थ खाल्ल्यास कुपोषण होते आणि अनेकदा थकवा, झोप न लागणे किंवा अतिझोप येणे असे परिणाम झालेले आढळून येतात. लठ्ठ व्यक्तींमध्ये किंवा वजन नियंत्रणात ठेवू पाहणाऱ्या लोकांसाठी तुमच्या शरीराला पोषक असे सविराम उपास फायदेशीर ठरू शकतात. या प्रकारचे उपास करताना अनेकदा जीवनसत्त्वे आणि मूलद्रव्ये आहाराव्यतिरिक्त समाविष्ट करावी लागतात.
सविराम आहाराचं गणित बसवताना केवळ या वेळेत खायचं नाही, एवढाच मुद्दा लक्षात ठेवण्यापेक्षा खाण्याच्या वेळेतील आहाराकडे लक्ष पुरविणे आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखाली त्याचे पालन करणे तितकंच महत्वाचं आहे.