डॉ. शशांक सामक आणि डॉ. जेसिका सामक
Understanding Love Psychology महाभारतात युधिष्ठिराला यक्षाने विचारलेल्या प्रश्नांमध्ये एक प्रश्न होता : ‘देवाने पुरुषासाठी निर्माण केलेला उत्तम मित्र कोण?’ युधिष्ठिराने त्याचे उत्तर दिले होते : ‘त्याची बायको’. हजारो वर्षांपूर्वीच युधिष्ठिराने दिलेले हे उत्तर सध्याच्या काळातही मान्य करून जगल्यास पती-पत्नी नातेसंबंधांना मित्रत्वाचे परिमाण लाभेल, घटस्फोट घटून समाजस्वास्थ्य सुधारायलाही मदत होईल.
प्रेम आणि प्रेमभंग यांचे नाते नाण्याच्या दोन बाजूंसारखे असते. प्रेम आणि विवाह हे जणू विरुद्धअर्थीच शब्द असल्यासारखा अनुभव बऱ्याच जणांना येत असतो. संपूर्ण आयुष्य ढवळून टाकणारा हा अनुभव असतो. परंतु प्रेम, प्रेमभंग आणि लग्न यांची समीकरणे जर नीट जाणून घ्यायची असतील तर या संज्ञांचे अर्थ व त्यांना खोली देणाऱ्या भावना नीट अभ्यासल्या पाहिजेत.
प्रेम म्हणजे प्रेम असले तरी प्रत्येकाचे ते सेम नसते. वैद्यकीय दृष्टीने कुठलेही विरुद्धलिंगी आकर्षण हे श्रृंगारिक प्रेमच असते. कारण मेंदूमध्ये त्याची प्रक्रिया ही हायपोथॅलॅमस भागाशीच निगडित असते. इथेच सेक्सच्या आकर्षणाचे केंद्र असते आणि त्याचा संबंध ‘टेस्टोस्टेरॉन’ व ‘ऑक्सिटोसीन’ या हॉर्मोनशी असतो.
प्रेमविवाह टिकवणे महाकठीण
अपेक्षापूर्ती ही तर गृहीत गोष्ट मानली जाऊन प्रेमपूर्तीचे साध्य प्रेमविवाह मानले जाते. पण बहुतेक जण जरी प्रेम करीत असले तरी त्यातील फारच कमी जणांच्या नशिबी अशी इच्छापूर्ती होत असते. म्हणजेच प्रेम करणे सोपे, पण प्रेमविवाह करणे कठीण आणि तो टिकवणे तर महाकठीण. प्रेमाला वास्तववादाची जोड न दिल्याने आणि प्रेमविवाहाला आदर्शवादाची जोड दिल्यानेच अपेक्षा पूर्ण न होऊन प्रेमभंग व प्रेमविवाहभंग घडत असतो.
प्रेमाची कला व शास्त्र
वास्तवाचा चष्मा नसल्यानेच प्रेमाला आंधळे म्हटले गेले आहे. आणि रोमँटिकपणाचा गुलाबी चष्मा सतत न वापरल्यानेच प्रेमविवाह निभावणे कठीण वाटत असते. एखाद्या करण्याच्या क्रियेला कृती म्हटले जाते आणि कुठलीही कृती समाधानकारक करण्यासाठी जी तत्त्वप्रणाली वापरली जाते त्याला कला म्हणतात. आणि कुठलीही कला शिकण्यासाठी जी नियमबद्ध पद्धत वापरतात तिला त्या कलेचे शास्त्र म्हणतात. प्रेम करण्याची गोष्ट असेल तर प्रेमाचीही कला व शास्त्र हे असू शकते. आणि शास्त्र हे तर विचार व अनुभव यांचे अपत्य असते.
सेक्स आणि रिलेशनशिप समस्यांना व्यवसाय रूपात अभ्यासून गेली तीस वर्षांपेक्षा जास्त काळ या क्षेत्रातील मिळालेला अनुभव व ज्ञान सूत्रबद्ध करून कित्येक दाम्पत्यांना त्यांचा वास्तविक जीवनातील वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये सहजपणे वापर करता येईल असे माझ्या लक्षात आले.
प्रेमसूत्रे
ही प्रेमसूत्रे जाणून घेतली तर तणावाच्या परिस्थितींवरही पती-पत्नींना मात करता येईल. त्यामुळे त्यांचे नाते दृढ होऊन समाज सुदृढ होण्यास मदतच होईल. अॅरेंज्ड मॅरेजला लवमॅरेज करण्यासाठी व लवमॅरेजला समृद्ध करण्यासाठी पती-पत्नी दाम्पत्यांनी प्रेमशास्त्राच्या पूर्वतयारीची तीन सूत्रे ध्यानात ठेवली पाहिजेत.
अ. उत्तिष्ठत जाग्रत : उठा, जागे व्हा. तुमच्यात पती-पत्नी नाते आहे याबद्दल जागरूक व्हा. धकाधकीच्या जीवनशैलीमुळे, नात्यातील तणावामुळे याकडे अजाणतेपणाने किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले असेल तर ‘पुनश्च हरिओम’साठी तयारी करा.
ब. ड्रॉप कर्टन मेथड : आजवरच्या दाम्पत्य जीवनातील त्रासदायक व निगेटिव्ह भूतकाळावर पडदा टाका. अगदी ‘लोखंडी’ पडदा. भूतकाळ बदलता येणार नाही. भूतकाळातील नुकसानकारक, दु:खदायक घटनांतून बोध घेऊन वर्तमानकाळ जगा नाहीतर भविष्यकाळ तुम्हाला माफ करणार नाही.
क. पॉझिटिव्ह नेक्स्ट स्टेप : यापुढील काळापासून दाम्पत्य जीवनात सकारात्मक, पॉझिटिव्ह राहा. वारंवार निगेटिव्ह भूतकाळात शिरून त्याचा उल्लेख करायचे टाळा.
(यापूर्वी चतुरंग पुरवणीमध्ये ३० मार्च २०१३ रोजी प्रसिद्ध झालेला लेख पुनर्प्रकाशित करत आहोत.)
© IE Online Media Services (P) Ltd