दि. १ ऑगस्ट हा जागतिक फुफ्फुस कर्करोग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मुंबईसारख्या शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांना, तसेच सिगारेट, गांजा अशी व्यसने असणाऱ्या लोकांना फुफ्फुसाचे आजार अधिक होण्याची शक्यता असते. वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फंडच्या मते, फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. यापार्श्वभूमीवर फुफ्फुसाचा कर्करोग होऊ नये, तसेच फुफ्फुसाची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. यापार्श्वभूमीवर फुफ्फुसाचा कर्करोग होऊ नये, तसेच फुफ्फुसाची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
फुफ्फुसांचे ‘क्लिंझिंग’ शक्य आहे का ?
श्वासावाटे अनेक धूलिकण, जंतू आपल्या फुफ्फुसात जातात. अशावेळी आपली फुफ्फुसे स्वच्छ करणे शक्य आहे का ? तर तज्ज्ञांच्या मते, फुफ्फुसे स्वच्छ करता येतात. डॉ. सुधीर राय यांच्या मते, ” फुफ्फुसे ‘डिटॉक्स’ करता येतात. ही एक उपचारपद्धती आहे. यामध्ये फुफ्फुसांना नुकसान करणाऱ्या घटकांना काढून टाकण्यात येते.” डॉ राहुल केंद्रे यांच्या मते,” फुफ्फुसांचे क्लिंझिंग किंवा डिटॉक्स ही प्रक्रिया फुफ्फुसातील हानिकारक पदार्थ काढून टाकते. मुळात मानवी शरीरात नैसर्गिकरित्याच ‘क्लिंझिंग’ची प्रक्रिया सुरू असते. बाहेरची हवा थेट फुफ्फुसात जाणार नाही, याची काळजी शरीर घेत असते.
डॉ. सुधीर राय यांनी सांगितले की, ”फुफ्फुसांचे क्लिंझिंग हे रासायनिक कारखान्यांमध्ये जे काम करतात किंवा सिगारेट, गांजा ओढण्याची ज्यांना सवय आहे, त्यांच्यासाठी उपयुक्त आहे.”
डॉ. केंद्रे यांनी सांगितले की, ”फुफ्फुसे थेट डिटॉक्स होतील अशी कोणतीही यंत्रणा नाही. किंवा फुफ्फुसे डिटॉक्स केल्यामुळे कर्करोगाची शक्यता कमी होईल असे वैद्यकीय प्रमाणांनी सांगता येत नाही.
हेही वाचा : मायग्रेनचा त्रास होतोय ? कशी कमी कराल डोकेदुखी
फुफ्फुसांचे आरोग्य चांगले कसे राखाल ?
सिगारेट टाळा
डॉ. राय यांनी सल्ला दिला की, तुमची फुफ्फुस निरोगी ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सिगारेटपासून दूर राहणे. तसेच रासायनिक द्रव्ये आणि रासायनिक घटकांच्या धुरापासून लांब राहणे. फुफ्फुसांचे नुकसान टाळण्यासाठी सिगारेट ओढण्याचे थांबवणे कधीही उत्तम.
नियमित व्यायाम करा
डॉ. राय यांच्या मते, फुफ्फुसांचा कितीही जुना आजार असला, तरीही नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. निरोगी जीवनशैलीसाठी व्यायाम आवश्यक असतो. तसेच श्वसनाच्या समस्या प्राणायाम आणि व्यायामाने दूर होतात.
सकस आहार घ्या
सकस आणि पौष्टिक आहार घेतल्यामुळे शरीर निरोगी राहते. सकस आहार फुफ्फुसांकरिताही चांगला असतो. तुमच्या आहारात विविध जीवनसत्त्वे आणि पोषक तत्वांसह अँटिऑक्सिडंटयुक्त पदार्थांचा समावेश केल्यास तुमचे मन आणि शरीर निरोगी राहते, असे डॉ. राय म्हणतात.
चांगल्या हवेत राहण्याचा प्रयत्न करा
आपल्या सभोवताली असणारी हवा आपल्या फुफ्फुसांवर परिणाम करते. सिगारेट किंवा रासायनिक वायूचे उत्सर्जन आपल्या शरीरावर परिणाम करते. त्यामुळे तुलनेने चांगल्या हवेत राहण्याचा प्रयत्न करा. हवेच्या दर्जेचा विचार करा. गुगल ‘AQI’ दर्शवत असतो. हवा अधिक प्रदूषित असेल तर मास्कचा वापर करावा, असे डॉ. केंद्रे यांनी सांगितले.
फुफ्फुसे व्यायामाद्वारे ‘क्लीन’ करण्याचे काही उपाय आहेत. दीर्घ श्वसन, प्राणायाम यामुळे श्वासमार्ग मोकळा राहतो. श्वसनासंबंधित कोणतीही नवीन प्रयोग करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.