Marburg Virus Symptoms and Treatment : जगभरात करोना महामारीनंतर विविध जीवघेण्या व्हायरसचा प्रार्दुभाव वाढताना दिसला. यात आता अनेक देशांमध्ये करोनासह H3N2 व्हायरसने हात-पाय पसरले आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने नागरिक पुन्हा आजारी पडत आहेत. भारताततही करोनासह आता H3N2 व्हायरसचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. अशा परिस्थितीत जगावर आता मारबर्ग या नव्या व्हायरसचे संकट निर्माण झाले आहे. आफ्रिकन देशांमध्ये पसरणाऱ्या या घातक व्हायरसमुळे ओमाननंतर आता सौदी अरबने प्रवाशांसाठी एक ट्रॅव्हल अलर्ट जारी केला आहे. सौदी आरोग्य मंत्रालयाने देशातील नागरिकांना आफ्रिकेतील इक्वेटोरियल गिनी आणि टांझानियामध्ये प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे.
यात ओमान आरोग्य मंत्रालयानेही एक अॅडव्हायझरी जारी केली आहे. ज्यात त्यांनी आपल्या नागरिकांना गरज नसल्यास आफ्रिकन देशांमध्ये प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच जे नागरिक त्याठिकाणी राहत आहेत किंवा दोन देशांच्या भेटीवर आहेत त्यांना खबरदारी घेण्याचे आणि आरोग्य सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
मारबर्ग व्हायरस म्हणजे काय?
इक्वेटोरियल गिनी आणि टांझानियामध्ये मारबर्ग व्हायरसचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, हा व्हायरस इबोलासारखाच एक अत्यंत संसर्गजन्य आणि प्राणघातक आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) पूर्वी सांगितले होते. इक्वेटोरियल गिनीच्या आरोग्य मंत्रालयाने काही दिवसांपूर्वी इबोलासारखाच हा आजार असल्याची माहिती दिली होती. तसेच यामुळे ५ जणांचा मृत्यू झाल्याचेही सांगितले होते. हा आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे थुंकी, रक्त आणि स्पर्शाने पसरतोय. यावर कोणताही लस किंवा अँटीव्हायरल उपचार नाहीत. सुरुवातीच्या काळात रुग्णाला फक्त डोकेदुखी, अंगदुखी आण थकवा जाणवतो.
मारबर्ग व्हायरस हा इबोला व्हायरसप्रमाणेच घातक असून हा त्याचाच एक व्हेरिएंट आहे. या व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णास ताप येतो आणि शरीरांतर्गत रक्तस्राव होतो. ज्यामुळे शरीरातील इतर अवयवांवर त्याचा घातक परिणाम होतो. हा व्हायरस देखील प्राण्यांमधून माणसामध्ये पसरला आहे. कोणत्याही संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यास तु्म्हालाही त्याचा धोका निर्माण होतो. या व्हायरसमुळे होणारा मृत्यू दर २४ टक्के ते ८८ टक्क्यांपर्यंत आहे, तर सरासरी मृत्यूदर जवळपास ५० टक्के असू शकतो, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. याचा अर्थ या व्हायरसचा संसर्ग झालेले अर्ध्याहून अधिक रुग्णांचा मृत्यू होतो. या व्हायरसमुळे तीव्र ताप येतो, अनेकदा रक्तस्त्राव होतो आणि अवयव निकामी होतात.
मारबर्ग व्हायरसची लक्षणं
१) ताप
२) तीव्र डोकेदुखी
३) स्नायू दुखणे
४) अतिसार
५) पोटदुखी
६) मळमळ
७) उलटी होणे
८) अंगदुखी
या व्हायरसच्या संसर्गानंतर रुग्णास इबोला व्हायरसप्रमाणेच आहेत. यावेळी रुग्णाच्या थुंकी, लघवी, नाक, डोळे अशा विविध अवयवांमधून रक्त येते. शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे अनेकदा मृत्यूचा धोका वाढतो. मारबर्ग व्हायरसच्या संसर्गानंतर त्याची लक्षणे दोन दिवस ते तीन आठवड्यांपर्यंत दिसतात. यातील बहुतांश लक्षणे एका आठवड्याच्या आत दिसण्यास सुरुवात होता. अशा परिस्थितीत योग्य उपचार न केल्यास ८ ते ९ दिवसात रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो.
मारबर्ग व्हायरसविरोधात लस किंवा उपचार आहेत का?
सध्या मारबर्ग व्हायरसविरोधात कोणतीही लस किंवा अँटीव्हायरल उपचार नाहीत, परंतु संक्रमित रुग्णांवर लक्षणात्मक आणि सहाय्यक उपचार केले जातात. याचा अर्थ आवश्यकतेनुसार द्रव, ऑक्सिजन आणि रक्त संक्रमण केले जाते.
कोणत्या देशांना सर्वाधिक धोका?
सध्या इक्वेटोरियल गिनी आणि टांझानिया या दोन देशांमध्ये मारबर्ग व्हायरसचे रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे या व्हायरसला आळा घालण्याचे प्रयत्न सुरु आहेत. परंतु WHO ने शेजारच्या गॅबॉन आणि कॅमेरूनमध्ये पसरू शकतो म्हणत संभाव्य महामारीचा इशारा दिला आहे. अलीकडच्या वर्षांत इक्वेटोरियल गिनी, घाना, काँगो, केनिया, दक्षिण आफ्रिका, युगांडा, झिंबाब्वे या देशांमध्ये मारबर्ग व्हायरसचा प्रादुर्भाव दिसून आला. परंतु भारतात याचा एकही रुग्ण आढळलेला नाही, त्यामुळे भारताला या व्हायरसपासून अद्याप कोणताही धोका नाही.