Is Mirroring Good Or Bad : अनेकदा आपण समोरच्या व्यक्तीकडे आकर्षित होतो आणि त्याचे वागणे, बोलणे एवढंच काय तर त्याचा पेहराव आपण हुबेहूब स्वत:मध्ये आत्मसात करतो. आपल्या आजुबाजूचे लोक म्हणतात, “अरे हा अमुक व्यक्तीसारखा दिसतोय, त्याचे वागणे त्या अमूक व्यक्तीसारखे आहे, तो अमुक व्यक्तीसारखा बोलतोय इत्यादी. यालाच मिररींग म्हणतात. खरं तर मिररींग हा इंग्रजी शब्द आहे. याला मराठीत ‘अवचेतन’सुद्धा म्हणतात. पण, बोलीभाषेमध्ये मिररींग हा शब्द अधिक वापरल्यामुळे तो लोकप्रिय झाला आहे.
खरंच मिररींग वाईट आहे का? समोरच्याचे नकळत अनुकरण करणे चुकीचे आहे का? हा मानसिक आजार असू शकतो का? याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी लोकसत्ताने मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रश्मी जोशी यांच्याशी संवाद साधला.
खरंच मिररींग वाईट आहे का?
डॉ. रश्मी जोशी : मिररींग ही अत्यंत साधारण बाब आहे. आपण समोरच्या व्यक्तीचे वागणे, बोलणे, पेहराव चांगल्या दृष्टिकोनातून कॉपी करतो. यात काहीही वाईट नाही. अगदी लहानपणापासून आपण मिररींग करत असतो. आई-वडिलांचे वागणे, बोलणे लहान मुले कॉपी करतात. कोणत्या गोष्टीला कशी प्रतिक्रिया द्यायची, हे मिररींगद्वारे शिकतात. त्यामुळे मिररींग हे वाईट म्हणता येणार नाही.
मिररींग का गरजेची आहे?
डॉ. रश्मी जोशी : ज्या मुलांनी लहानपणी मिररींग केली नाही, त्यांना पुढे समाजामध्ये वावरताना किंवा संवाद साधताना अडचण येते, त्यामुळे मिररींग गरजेची आहे. मिररींग सहानुभूतीसुद्धा निर्माण करते. दुसऱ्याला काय वाटते, मी जर त्या परिस्थितीत असेल तर कसं वागणार, ही जाणीव निर्माण होणे म्हणजेच सहानुभूती निर्माण होणे होय. मिररींगमुळे तुम्ही समोरच्या व्यक्तीला सहज समजून घेऊ शकता. जर तुम्ही समोरच्याची मिररींग करू शकले नाही तर एका ठराविक काळानंतर तुम्हाला ती व्यक्ती तुमच्यापासून दूर गेली असे वाटू शकते.
हेही वाचा : एका व्यक्तीचं रक्त वाचवू शकते तीन जणांचा जीव! रक्तदान कोणी करावे आणि कोणी करू नये? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…
मिररींगचे दुष्परिणाम
डॉ. रश्मी जोशी : जेव्हा तुम्ही जाणीवपूर्वक आणि चांगल्या दृष्टिकोनातून समोरच्याची मिररींग करता तेव्हा ते वाईट नसते, पण जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीचे सतत अनुकरण करत आहात आणि हे करताना तुम्ही स्वत:चे अस्तित्व विसरत आहात, तर तुम्ही नकळत तुमचा आत्मसन्मान गमावून बसता. मिररींग करताना आपण कुणाचे अनुकरण करतोय आणि कितपत अनुकरण करतोय, हे समजून घेणे आवश्यक आहे. मिररींग करताना योग्य व्यक्तीची निवड करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
प्रेमसंबंधांमध्ये तुम्ही समोरच्याला खूप महत्त्व देता. त्यांच्यासाठी वाट्टेल ते करता; त्यांचे वागणे, बोलणे, कॉपी करता आणि या नादात तुम्हाला स्वत:ला काय आवडतं हे मात्र विसरता. तुम्ही त्यांच्यावर अवलंबून राहता आणि समोरचा व्यक्ती तुम्हाला नियंत्रणात ठेवतो, ज्यामुळे तुम्ही स्वत:ची ओळख विसरता, हा सुद्धा एक मिररींगचा दुष्परिणाम असू शकतो.
मिररींग करताना तुमचा हेतू का महत्त्वाचा आहे?
डॉ. रश्मी जोशी : समोरच्याला मिररींग करताना जर तुमचा हेतू चांगला असेल तर त्याचा परिणामसुद्धा चांगला दिसून येईल, पण तुमचा हेतू जर वाईट असेल तर मिररींगचा दुरुपयोग होऊ शकतो. मिररींग ही एक अत्यंत सामान्य बाब आहे, पण त्याचा अतिरेक होत असेल तर त्याचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्त्वावर पडू शकतो.
तुम्ही खूप सकारात्मक आहात आणि तुम्ही नकारात्मक गोष्टी कॉपी करत असाल तर तुम्ही तुमचे अस्तित्व विसरू शकता. तुम्ही स्वत:ची ओळख विसरू शकता, त्यामुळे मिररींग ही काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे.
मिररींग का करतात?
डॉ. रश्मी जोशी : एखाद्या व्यक्तीकडे जेव्हा तुम्ही आकर्षित होता, तेव्हा तुम्हाला त्यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व आपले असावे असे वाटू शकते. जेव्हा तुम्ही समोरच्याचा आदर करता, तेव्हा त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तुम्ही त्यांचे विचार आत्मसात करू शकता किंवा एखादी व्यक्ती तुम्हाला आवडत असेल तेव्हा त्या व्यक्तीनेही आपल्याकडे आकर्षित व्हावे, यासाठी तुम्ही त्यांचे वागणे, बोलणे, राहणीमान कॉपी करू शकता.
मिररींगला आजार म्हणता येईल का?
डॉ. रश्मी जोशी : मिररींगला आजार म्हणायचं की नाही हे त्याच्यामागचा हेतू काय आहे, यावर अवलंबून आहे. समोरच्याचे मिररींग करताना स्वत:चा आत्मविश्वास, आत्मसन्मान, ओळख आणि अस्तित्व तुम्ही गमावत असाल तर तुम्ही एन्झायटी, नैराश्यसारख्या मानसिक आजाराचे बळी पडू शकता; पण तुम्ही चांगल्या दृष्टिकोनातून आणि चांगल्या हेतूने जाणीवपूर्वक मिररींग करत असाल, त्यात तुम्हाला कोणत्याही आजाराचा धोका नाही. मिररींग करताना अतिरेक करू नका, स्वत:ची ओळख जपा.