भारताने चंद्रावर चांद्रयान तीन दाखल केलं आणि त्यानंतर माझ्या डोक्यात चंद्र आणि आहाराशी संबंधित असणाऱ्या अनेक संशोधनांबद्दल एक वेगळंच मिशन सुरू झालं.
“ मला मून डाएट (moon diet ) करायचं आहे “ किंवा “ मला पौर्णिमा आणि अमावस्या वाला हार्मोन्स बॅलन्सचं डाएट करायचंय “ असा विशेष विचार करून अनेकजण आहार नियमन करण्यासाठी गळ घालतात. आहारतज्ज्ञ म्हणून चंद्र स्नान पद्धती आणि आहाराची चंद्रकलेनुसार मांडणी याबद्दल अनेक सिद्धांत वाचून आणि अभ्यासल्यानांतर आहारशास्त्रातील ट्रेंड्सचे प्रमाण आणि लाटा यांचे विशेष महत्व असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं.
असंच मध्यंतरी चंद्राच्या कलेनुसार आहारात बदल करण्याची आहारपद्धती विशेष प्रसिद्ध झाली होती. ज्यात दर १३ दिवस उपास आणि पौर्णिमा जवळ येताच आहाराचे प्रमाण हळूहळू वाढविण्याचा सिद्धांत मांडला गेला होता . सुरुवातीचे दोन दिवस केवळ पाणी आणि नंतर हळूहळू भाज्या, फळे यांचे प्रमाणात वाढवत पौर्णिमेपर्यंत संपूर्ण आहाराचे प्रमाण वाढवत न्यावे असा प्रवाद होता. या सिद्धांताअखेरीस अनेकांमध्ये कुपोषणाचे प्रमाण वाढले होते आणि महत्वाच्या जीवनसत्त्वासह प्रमाण देखील कमी झाल्याचे आढळून आले होते.
आणखी वाचा: Health Special: श्रावणात उपास करताय आणि ‘हे’ पदार्थ खाताय?
अनेक संस्कृतींमध्ये चंद्रप्रकाशात अन्न ठेवून त्याचा आहारात समावेश केला जातो. चंद्रस्नान केलेले दूध किंवा पाणी शरीराचा अम्लांश संतुलित राखण्यासाठी मदत करते असादेखील एक प्रवाद आहे. चंद्र कलेकलेने लहान लहान होत जातो आणि त्यानंतर अमावस्या होते यादरम्यान समुद्रामध्ये होणाऱ्या भरती ओहोटी प्रमाणेच चंद्राच्या भ्रमणाचे मानसिक आरोग्यावर अनेक परिणाम होतात आणि त्याचे शरीरातील संप्रेरकांवर देखील परिणाम होतात आहार हा मुख्यत्वे संप्रेरकाशी संलग्न विषय असल्यामुळे आहारानुसार शरीरातील तत्त्वांचा सांभाळ करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
आयुर्वेदाप्रमाणे पूर्वापर चालत आलेल्या लूनार सिस्टीम म्हणजे आपल्या शरीरासाठी सगळ्यात उत्तम अशा प्रकारचा नमुना म्हणून चंद्र प्रणाली म्हणजेच चंद्राच्या भ्रमणामुळे शरीरावर होणाऱ्या परिणामाबद्दल अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. ज्याप्रमाणे सूर्याची ऊर्जा ही अत्यंत तेजस्वी संतुलित मानली जाते त्याचप्रमाणे चंद्राची ऊर्जा अनेक आजार कमी करण्यासाठी वापरली जाऊ शकते उदाहरणार्थ मायग्रेन्स, उच्च रक्तदाब, शरीरात होत तयार होणारी कोणत्याही प्रकारचे असंतुलन यासाठी चंद्राप्रमाणे आपली आहार पद्धती बदलणे अत्यंत उत्तम परिणाम देते.
आणखी वाचा: Health Special: उपवास (लंघन) का करावा?
याप्रणाली नुसार चंद्र, मानवी मन आणि मानवी मेंदूचे एक नाते आहे. न्यूरो सायन्सनुसार आपले 95 टक्के आयुष्य आकारत असते त्याच्यामुळे मेंदूमध्ये तयार होणारे कन्फ्युजन किंवा मूड स्विंग किंवा कोणत्याही प्रकारचे निर्णय क्षमता हे पूर्णपणे चंद्राच्या भ्रमणावर अवलंबून आहे असे मानले जाते.
किंबहुना चंद्रस्नान केल्याने म्हणजेच चंद्रप्रकाशात उभे राहिल्याने संप्रेरक आणखी कार्यक्षम होऊ शकतात .
मध्यंतरी एका संशोधनात असे आढळून आले आहे कि वय वर्ष ३५ हून कमी असणाऱ्या स्त्रियांमध्ये मासिक पाळी येण्याचा सरासरी वेळ २८-२९ दिवसाचा होता. हा कालावधी चंद्राच्या प्रकाशचक्रासोबत समांतर चालत होता. योग अभ्यासामुळे हे पाहिले गेले आहे की चंद्राच्या भ्रमणानुसार मानवी मेंदूचे कार्य बदलते आणि त्याप्रमाणे त्याचे परिणाम देखील बदलतात.
चंद्राचे भ्रमण शरीरातील इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या संप्रेरकांना संकरित करण्यासाठी कारणीभूत ठरते. असे मानले जाते की मासिक पाळीचे पहिले पंधरा दिवस इस्ट्रोजन तयार होत असते. याच वेळेला पौर्णिमा आकार घेत असते जर या वेळेत मासिक पाळीचे पहिले पंधरा दिवस असतील तर ऊर्जा कुतुहल क्षमता वाढल्याचे लक्षात येते.
पौर्णिमा आणि अमावस्या या चंद्राच्या प्रमाणाशी संबंधित आहेत या भ्रमणानुसार वातावरणात तयार होणाऱ्या हवेच्या दाबानुसार तुमच्या शरीरावर देखील परिणाम होत असतो ज्यामुळे शरीराचे तापमान आणि मानसिक संतुलन याचा देखील यावर देखील परिणाम होत असतो. ज्यांना झोपेच्या तक्रारी असतात त्यांनी नियमितपणे चंद्रप्रकाशात किमान १५-२० मिनिटे दररोज व्यतीत केल्याने झोपेच्या आजारांचे प्रमाण कमी होते. झोपेचे तंत्र आपोआप संतुलित होते.
आता आपण चंद्रावर पोहोचलो आहोतच. त्यामुळे चंद्राबद्दलचे अनेक गैरसमज कमी होऊन चंद्राचं आणि आपलं सख्य आणखी शास्त्रीय दृष्ट्या वृद्धिंगत व्हावं हीच सदिच्छा!