प्रिता क्लिनिकला अधेमधे यायची. प्रत्येक वेळी काहीतरी कारण द्यायची. आली तरी ठरवल्याप्रमाणे जिमला उद्यापासून जाते पुढच्या आठवड्यात चालू करते असे म्हणायची. आईवडीलही तिच्या चालढकलीला बघून हतबल झाले होते. त्यांच्याशी प्रिताबद्दल बोलताना ते म्हणाले की डॉक्टर प्रिता आधी खूप चपळपणे सगळं करायची, पण हल्ली काही वर्ष ती महत्वाच्या गोष्टीत टाळाटाळ करते आणि भलतंच काम ओढवून ते करत बसते. अभ्यासाचे प्रोजेक्ट सोडून घराचे कप्पे आवरते. वाढलेले वजन कमी करायला म्हणून रोज जिमला जाईन म्हणते आणि रात्री झोप लागली नाही , आज सकाळी थंडी वाटत होती अशी कारण देत तेही टाळते आणि स्वतः न्याहारी बनवायला घेते. आळस तर तिचा शत्रू आहे. मग या वागण्याला काय म्हणायचे ??
प्रिता जे वागत होती त्याला procrastination म्हणजे चालढकल करणे असे म्हणतात. आपल्याला वाटते की तिला time management जमत नाही. अभ्यासाच्या वेळी तेच करावे , व्यायामाच्या वेळी व्यायाम आणि कामाच्या वेळी काम! पण हे वाटत तसं नाही बरं का ! Procrastination सवय नसून आपल्या मनातील नकारात्मक अवस्थेतून थोड्या वेळासाठी सुटका लवकरात लवकर मिळावी म्हणून केलेली कृती होय. आता यातून जे काम करायचं असतं ते राहून जातं आणि काम वेळेवर न झाल्याने तणाव अजूनच वाढतो. तरी देखील बरेचजण चालढकल करताना आपण पाहतो. काम कंटाळवाणे वाटणे , कशाचे तरी भय वाटणे , निराशा वाटणे , आत्मसंदेह , कटूता अशा अनेक नकारात्मक अवस्थांना तात्पुरते का म्हणेना टाळण्यासाठी चालढकल केली जाते आणि तसे करून वेळ टळली म्हणून तेवढ्यापुरते छान वाटते. तेव्हा हा इमोशनल रेग्युलेशन किंवा भावनिक तालमेळीचा दोष असून टाईम मॅनेजमेंट हा यावर उपाय नाही हे लक्षात घ्यायला हवे.
चालढकल होण्याचे मुख्य कारण म्हणजे एकतर दिलेले काम कंटाळवाणे असेल किंवा त्या कामाशी निगडीत काही भावना असतील. उदाहरणार्थ – एखादं प्रेझेंटेशन द्यायचंय आणि टॉपिक बोरिंग असेल तर तुम्ही टाळाटाळ करता किंवा टॉपिक आवडीचा असेल तरी मला हे जमेल का ? लोकांना आवडेल का ? माझं काही चुकलं तर ? किती अवघड काम आहे ! अशा अनेक नकारात्मक भावना असल्या तरी टाळाटाळ होते. पण यामुळे आत्मविश्वास कमी होऊन आत्मसंदेह निर्माण होतो , आपण स्वतःला काम न झाल्याने अपराधी ठरवतो आणि त्यातच अॅंझायटी, डिप्रेशनला बळी पडतो. मानसिक स्वास्थ्याबरोबरच शारिरीक स्वास्थ्यही खालावते आणि मधुमेह, उच्च रक्तदाब अशा समस्या वाढत्या ताणतणावामुळे निर्माण होतात.
हे सगळं माहीत असताना वारंवार आपण चालढकल करतो कारण नकारात्मक भावनांतून तात्पुरत्या स्वरूपात निर्माण होणारी सुटका आपल्याला मिळायचे काम मेंदूतील amygdala ( threat detector ) करतो. त्या सुटकेची इतकी सवय होते की काम टाळल्याने येणाऱ्या परिणामांचे भान राहत नाही त्याला ( amygdala hijack ) म्हणतात.
हेही वाचा : Health Special : मुलांचे मनःस्वास्थ्य- वाढ आणि विकास भाग ३
या सगळ्यांचा परिणाम उत्पादनक्षमतेवर होतो आणि आत्मविश्वास अजून खालावतो. तेव्हा वेळेचे नियोजन करा , काम तुकड्यात वाटून करा असे बोलून होत नाही. चालढकल ही एक भावनिक समस्या आहे. स्वतः ला आधी केलेल्या दिरंगाई बद्दल मनापासून माफ करा आणि नव्याने कामाला लागा. बाह्यप्रेरणेची वाट न बघता कामाला लागा . कृती केली की आपोआप प्रेरणा मिळते हे लक्षात घ्या. स्वतःबद्दल आपुलकी आणि प्रेम ठेवत स्वतःवर जास्त कठोर बनू नका . आपल्या चुकांमधून शिका आणि त्या परत होणार नाही असा प्रयत्न करा . काम करतांना फोन वगैरे अडथळा आणत असेल तर मोठा पासवर्ड सेट करा जेणेकरून तुम्हाला फोन हाताळायचा कंटाळा येईल आणि काम वेळेत होईल. रात्री झोपतानाच व्यायामाचे कपडे घाला म्हणजे व्यायाम करायचा एक अडथळा दूर होऊन हुरूप येईल. प्रत्येकाला भावनिक समस्या आहेत ! पण चालढकल हे त्याचे समाधान नाही आणि हा आळसही नाही !
कळले असेल तर वरचा लेख पूर्ण वाचूनच टाका ! चालढकल करू नका !!