कुणाचंही आयुष्य कधीही परफेक्ट असत नाही. मुळात परफेक्ट कशाला म्हणायचं हा मोठा किचकट प्रश्न आहे. आयुष्यात फक्त सुख आहे. आनंद आहे. समाधान आहे. असं कधीच नसतं. ताण, संघर्ष, वादावादी, सांसारिक प्रश्न या सगळ्या गोष्टी कमी अधिक प्रमाणात असतातच. सोशल मीडिया हे काही वैयक्तिक दुःख आणि ताण सांगण्याची जागा नसते खरंतर पण इथेच सर्वाधिक दुःख विकलं जातं. तसंच आयुष्याचं सुंदर चित्रही मजबूत व्ह्यूज आणि लाईक्स घेऊन जातं. या सगळ्यातूनच सोशल मीडियावर शेरेन्टींग प्रकाराला सुरुवात होते. शेअर आणि पेरेंटिंग हे दोन शब्द एकत्र करुन शेरेन्टींग हा शब्द तयार केला गेला आहे. आपण किती सुजाण, सजग पालक आहोत हे जगाला सतत दाखवण्याच्या गरजेतून शेरेन्टींग सुरु होतं.
अनेकदा पालक निरनिरळ्या प्रकारच्या तणावांना सामोरे जात असतात. ते ताण व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यातले असतात. अशावेळी या ताणातून येणाऱ्या नैराश्यापासून सुटका मिळवण्याचा मार्ग म्हणून शेरेन्टिंग केलं जातं असंही अनेक अभ्यासातील निरीक्षण आहे. ते करत असताना मुलांचे फोटो सतत का पोस्ट करतोय हा विचार पालक करत नाही. शेरेन्टिंगचा संबंध आपल्या मनातील असुरक्षिततेशी, नैराश्याशी, आपल्या वैयक्तिक अॅप्रिसिएशनच्या अभावाशी लावता येत नाही. पण खोलात जाऊन चर्चा केली की कुठल्यातरी ताणातून सुटका करून घेण्यासाठी अनेक पालक शेरेन्टींग करतात असं लक्षात येतं. मुलांच्या संदर्भातल्या पोस्ट्सना लगेच लाईक, लव्ह वगैरे मिळतात. त्यामुळे ताणाच्या काळात ताबडतोब छान वाटण्यासाठी जे काही स्टिम्युलेशन हवं असतं ते पालकांना शेरेन्टिंगमधून मिळतं.
आणखी वाचा: मुलांचा स्क्रीन टाईम पालकांमुळे वाढतोय का?
स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी, मुलांचं कौतुक साऱ्या जगाने करावं यासाठी, ताणातून बचाव करण्यासाठी, स्वतःच्या कंटाळ्यावर मात करण्यासाठी, आपण आदर्श पालक आहोत हे स्वतःला आणि जगाला सांगण्यासाठी अशा अनेक कारणांसाठी पालक शेरेन्टींग करत असतात. सोशल मीडिया आपल्यासाठी की आपण सोशल मीडियासाठी हे लक्षात घेतलं तर या माध्यमाचा वापर केव्हा, कसा आणि किती करायचा हे समजू शकतं.
अन्यथा पालक स्वतःच स्वतःसाठी ट्रॅप्स तयार करतात आणि त्यात गुदमरतात.
आपलं आयुष्य मस्त चालू आहे, आपला मुलांशी सजग संवाद आहे हे सतत जगाला सांगत राहण्याच्या मानसिकतेला ऑल इज वेल सिंड्रोम म्हटलं जातं. कुणाच्याही आयुष्यात सगळं परफेक्ट नसतं. जे परफेक्ट नाहीये ते कुणीही सोशल मीडियात सांगायला येत नाही, हेही ठीकच. पण ऑनलाईन जगात सतत छान छान दाखविण्याची धडपड काहीवेळा पालकांना मूळ प्रश्नांपासून दूर नेऊ शकतात. हे विशेषतः किशोरवयीन मुलांच्या पालकांबाबत होण्याची दाट शक्यता आहे. आपल्याला जसं पालकत्व अपेक्षित आहे त्या पद्धतीचे फोटो, व्हिडीओ आणि पोस्ट सातत्याने टाकत राहिल्याने प्रत्यक्षातील आपलं पालकत्व तसंच बनतं असं मुळीचच नाहीये. पालकत्व हा किचकट आणि मोठा प्रवास आहे. अशावेळी आपण जे सोशल मीडियावर टाकतो ती पळवाट नाहीये ना याचा विचार पालकांनी करणं गरजेचं आहे. पालकत्वातले अडथळे, त्रुटी जाहीर व्यासपीठावर मांडण्याची आवश्यकता नसतेच तसंच सतत माझ्या आयुष्यात सगळं सुरळीत सुरु आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये हे सोशल मीडियाच्या आधाराने स्वतःला सांगत राहणंही चुकीचं आहे. पालकत्वाच्या प्रवासातले प्रश्न, समस्या यांच्याकडे डोळेझाक करुन चालत नाही. उलट ते आहेत हे मान्य केलं तरंच प्रवास सुलभ होऊ शकतो.
आणखी वाचा: Mental Health Special: मुलांचा स्क्रीन टाईम किती हवा?
शेरेन्टींगमधला दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण मुलांविषयी काहीही लिहिताना मुलांची परवानगी घेतो का? अनेक पालकांना वाटते, मुलांची काय परवानगी घ्यायची? किंवा आमची मुले परवानगी देण्याच्या वयाची नाहीत. जर तुमचं मूल परवानगी देण्याच्या वयाचे नसेल तर त्या वयात ते जोवर येत नाही तोवर त्याच्याविषयीच्या पोस्ट्स लिहिण्याची उबळ दाबलीच पाहिजे. मुलांचे फोटो, व्हिडीओ शेअर करताना त्यांची परवानगी घेणं आवश्यक आहे. पारंपरिक भारतीय पालकत्वाच्या भूमिकांमध्ये पचणे कठीण आहे. तरीही हे केलं पाहिजे. कारण मुलांचे डिजिटल फूटप्रिंट्स तयार करण्याचा अधिकार पालकांनाही नाही. डिजिटल फूटप्रिंट्स किती हवेत, कसे हवेत, हवेत की नकोत हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार त्या मुलाचा आहे. निव्वळ पालक म्हणून मला कौतुक आहे, मला शाबासकी हवी आहे, काहीतरी गमतीशीर लिहून लाईक्स मिळवायचे आहेत, मी पालक म्हणून योग्य काम करते आहे याची पावती हवी आहे यासाठी मुलांचे कुठलेही डिजिटल फूटप्रिंटस (यात मुलांचे नाव, फोटो, व्हिडीओ, त्यांच्याविषयीची माहिती यांचा समावेश होतो) तयार करणं हा मुलांवर अन्याय आहे. मला अनेक पालक असंही सांगतात की आमची मुलं मोठी होतील तेव्हा आम्ही त्यांचे सगळे फोटो, व्हिडीओ, त्यांच्या विषयीच्या पोस्ट्स डिलीट करू, असा विचार करणाऱ्या पालकांनी माध्यम शिक्षित होण्याची गरज आहे. डिजिटल जगात एकदा गेलेली गोष्ट तिथून कधीही डिलीट करता येत नाही. जरी ती पालकांनी त्यांच्या मोबाईलमधून, सोशल मीडिया अकाउंट्स वरुन डिलीट केली तरीही. त्यामुळे मुलांचे डिजिटल फूटप्रिंट्स आम्ही नंतर पुसून टाकू असं जर कुणाला वाटत असेल तर तसं होऊ शकत नाही. त्यापेक्षा स्वतःला अवाजवी ऑल इज वेल सिम्ड्रॉममध्ये न अडकावणं शहाणपणाचं ठरु शकतं.