Sleepwalking : गेल्या आठवड्यात मुंबईतील एका १९ वर्षीय तरुणाचा त्याच्या राहत्या घरी झोपेत चालल्याने सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. खरेच झोपेत चालण्याची सवय जीवावर बेतू शकते का? झोपेत चालणे हा आजार नेमका काय आहे? हा आजार का होतो? त्यामागील कारणे, लक्षणे आणि त्यावर कोणते उपचार घ्यावेत, याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रश्मी जोशी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सविस्तर माहिती सांगितली.

झोपेत चालणे हा आजार नेमका काय आहे?

झोपेत चालणे हा एक झोपेचा आजार आहे. निद्रेच्या अनेक समस्यांपैकी एक समस्या; ज्याला आपण पॅरासोम्निया (Parasomnia) म्हणतो. झोप ही दोन प्रकारची असते. REM आणि NREM.

18 slum rehabilitation schemes objected by the municipality will be cleared
पालिकेने आक्षेप घेतलेल्या १८ झोपु योजनांचा मार्ग मोकळा होणार?
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
your sleep position can tell about your health
Sleep Position : तुम्ही कसे झोपता? तुमची झोपण्याची स्थिती तुमच्या आरोग्याविषयी काय सांगते? घ्या जाणून….
Sanjay Rathod case, death of young woman,
संजय राठोड प्रकरण : तरुणीचा मृत्यू अपघात किंवा आत्महत्या असल्याचा निष्कर्ष कशाच्या आधारे ? उच्च न्यायालयाचा सवाल
number of people thinking about suicide due to depression is increasing
तुम्ही निराश आहात? मनात आत्महत्येचा विचार येतोय… मग हे वाचाच! कारण…
zopu yojana, Urban Development Department, zopu,
झोपु योजना संलग्न करण्याबाबत गोंधळ कायम! नगरविकास विभागाची भूमिका अस्पष्टच
dombivli school boy died
डोंबिवलीत टेम्पोच्या धडकेत शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू, एक विद्यार्थी गंभीर जखमी
Orthosomnia News
Orthosomnia : ऑर्थोसोमनिया म्हणजे काय? या विकारामुळे झोपेचं खोबरं कसं होतं?

डॉ. रश्मी जोशी सांगतात, “NREM ही गाढ झोप असते. बेडवर गेल्यानंतर दोन तासांनंतर जी झोप लागते, त्यालाच NREM झोप म्हणतात. ‘झोपेत चालणे’ हा त्यादरम्यान दिसणारा आजार आहे. लहान मुलांमध्ये याचे सर्वाधिक प्रमाण दिसून येते. पाच मुलांपैकी एका मुलाला झोपेत चालण्याचा आजार असू शकतो; पण मुले जसजशी मोठी होतात, तसतसा हा आजार कमी होत जातो. झोपेत चालण्याचा आजार असलेले लोक अचानक उठतात. विशेष म्हणजे त्यांचे डोळे उघडे असतात; पण मुळात ते झोपेत असतात. ते उठतात, चालतात आणि पुन्हा बेडवर येऊन झोपतात; पण प्रत्येक प्रकरणात असे होत नाही. काही वेळा ते क्लिष्ट स्वरूपाच्या कृती करू शकतात.”

मागच्या वर्षी कांदिवली येथील रहिवासी असलेल्या अल्पवयीन मुलाचा झोपेत चालताना दहाव्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाला होता. तो सिंगापूरमध्ये कुटुंबाबरोबर ट्रिपला गेला होता. तेथील एका हॉटेलमध्ये ही दुर्दैवी घटना घडली होती.

काही लोक झोपेत का चालतात, याविषयी डॉ. रश्मी जोशी यांनी काही कारणे सांगितली आहेत.

  • झोपेत चालण्याचा आजार किंवा झोपेशी संबंधित कोणताही आजार कुटुंबात कोणाला यापूर्वी असेल, तर आनुवंशिकरीत्या तो आपल्याला होऊ शकतो.
  • तणाव, जीवनातील लहान-मोठ्या कठीण प्रसंगातून तुम्ही जात असाल, तर तुम्हाला हा आजार होऊ शकतो.
  • जर तुम्हाला ताप असेल किंवा कोणत्याही प्रकारचा संसर्ग झाला असेल तेव्हा तुम्ही झोपेत चालण्याची शक्यता असते.
  • त्याशिवाय अमली पदार्थांचे सेवन केले तरी हा आजार होऊ शकतो.
  • ज्या लोकांना रात्री वारंवार लघुशंकेला जाण्याची सवय असते, तर त्यांनासुद्धा हा आजार होऊ शकतो.
  • ज्या लोकांना झोपण्यामध्ये श्वास घेण्यास त्रास होत असेल (Obstructive sleep apnea) त्यांना हा आजार दिसून येतो
  • जे लोक झोपेत पायांची हालचाल करतात (Restless sleep disorder) त्यांच्यामध्येसुद्धा हा आजार दिसून येतो.

हेही वाचा : Virat Kohli Diet : विराट कोहलीचा डाएट प्लॅन माहितीये का? जाणून घ्या टी-२० विश्वचषक मालिकेतील त्याच्या फिटनेसचे रहस्य

डॉ. रश्मी जोशी यांच्याबरोबर संवाद साधताना माझ्यासमोर घडलेल्या एका प्रकरणाबाबत मी त्यांना सांगितले, “चार-पाच वर्षांपूर्वीची गोष्ट. मी जेव्हा हॉस्टेलवर राहायचे तेव्हा रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास कोणीतरी माझ्या दरवाजाची कडी वाजवली. मी खिडकीतून पाहिले, तर प्रियंका (बदललेले नाव) होती. मी दरवाजा उघडला. तेव्हा ती खोलीत आली आणि “मला चार्जर दे”, असे म्हणाली. तिच्या चेहर्‍यावर कोणत्याचे प्रकारचे हावभाव नव्हते. मी तिला चार्जर दिला; पण ती एका जागी पुतळ्याप्रमाणे स्थिर उभी होती. मी तिला विचारले, “झोपायचे नाही का तुला?” त्यावर ती काहीच बोलली नाही तेव्हा मी तिला पुन्हा विचारले, “काय झालं? सर्व ठीक?” पण, ती काहीच बोलली नाही. मी तिच्याकडे पाहिले, तर ती पुतळ्याप्रमाणे उभी होती आणि मा‍झ्या खोलीतील एका भिंतीकडे बघत होती. मला वाटले की, ती कोणता तरी खोल विचार करीत आहे. जेव्हा मी तिला जागे करण्याचा प्रयत्न केला तेव्हा काही क्षणांनंतर ती म्हणाली, “मी इथे तुझ्या खोली काय करतेय? आणि किती वाजलेत?” त्यानंतर मी तिला सांगितले की, तू चार्जर मागायला आली होतीस, तेव्हा ती खूप गोंधळलेली होती. तिला मी बेडवर बसवले आणि पाणी दिले. त्यानंतर थोड्या वेळाने तिने मला सांगितले की, तिला झोपेत चालण्याची सवय आहे.”

हे प्रकरण ऐकल्यानंतर डॉ. रश्मी जोशी सांगतात, “झोपेत चालणे म्हणजे ते झोपेत उठतात, चालतात आणि परत येऊन झोपतात. ही सामान्य प्रक्रिया आहे; पण प्रत्येक प्रकरणात असे घडते, असे नाही. बऱ्याचदा असे लोक जेव्हा झोपेत चालतात तेव्हा ते पूर्णपणे सावध नसतात. त्यांचे डोळे उघडे असतात. जर तुम्ही त्यांना तुमच्यासमोरून जाताना पाहिले, तर ते तुमच्याकडे बघणारसुद्धा नाही. ते झोपेत असतात आणि त्यामुळे ते तुम्हाला ओळखू शकणार नाहीत. यादरम्यान कधी कधी ते क्लिष्ट अशा गोष्टी करतात. जसे की झोपेतून उठणार, कपाट उघडणार, ड्रेस घालणार, कधी जेवण बनवणार आणि खाणार, कधी चावी उचलणार, घराबाहेर जाणार व कार चालवणार आणि नंतर परत येणार व बेडवर येऊन पुन्हा झोपणार इत्यादी. ही जी लक्षणे आहेत, ती धोकादायक आहेत. झोपेत चालत असताना जेव्हा तुम्ही त्यांना आवाज देऊन किंवा स्पर्श करून जागे करता तेव्हा त्यांना काहीच आठवत नाही. तेव्हा अशा व्यक्ती खूप गोंधळलेल्या असतात. एवढंच काय तर काही प्रकरणांत ते तुमच्यावर हल्लाही करू शकतात.”

“झोपेत चालण्याची प्रक्रिया ही १० ते १५ मिनिटांची असते किंवा त्याच्यापेक्षा कमी असते; पण जेव्हा ते दुसर्‍या दिवशी उठतात, तेव्हा त्यांना काहीच आठवत नाही”, असे डॉ. रश्मी जोशी पुढे सांगतात.

कोणती काळजी घ्यायला पाहिजे?

डॉ. रश्मी जोशी यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

१. या आजाराने त्रस्त असलेल्या लोकांची सुरक्षा खूप महत्त्वाची आहे. ते सुरक्षित कसे राहतील, यावर विचार करणे गरजेचे आहे.
२. हे लोक जर तुम्हाला चालताना दिसले, तर त्यांची समजूत घालून त्यांना परत झोपण्यास कसे सांगायचे, हे आव्हानात्मक ठरू शकते. अशा वेळी त्यांच्यावर न रागावता, त्यांच्याबरोबर प्रेमाने बोलणे अपेक्षित आहे.
३. जर व्यक्ती झोपेत स्वत:ला इजा पोहचवत असेल किंवा दुसर्‍याला इजा पोहचवत असेल, तर लगेच तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. तज्ज्ञांचा वेळ मिळेपर्यंत तुम्ही त्यांना बांधून ठेवू शकता.
४. आपल्याकडे ‘स्लीप सेंटर’ असतात. तिथे ‘स्लीप स्टडी’ केली जाते आणि त्यात आपल्याला कळते की, हा आजार कशामुळे झाला? स्लीप सेंटरला जाऊन त्याविषयी माहिती घेणे खूप गरजेचे आहे.
५. या आजाराचा सामना करीत असलेल्या लोकांनी झोपायची वेळ ठरविणे महत्त्वाचे आहे. झोपल्यानंतर दोन तासांनी या लोकांची गाढ झोप सुरू होत असेल, तर झोपेत चालण्याची त्यांची वेळ कोणती असू शकते, याचा अंदाज येऊ शकतो. गाढ झोपेदरम्यान या लोकांची झोपमोड करता येऊ शकते; ज्यामुळे त्यांचे झोपेत चालणे टाळता येईल.
६. अतिप्रकाशात झोपू नका. सायंकाळी ५ नंतर कॅफिनयुक्त द्रव पदार्थ घेऊ नका. रात्री हलके जेवण करा. झोपण्याच्या अर्ध्या किंवा एक तासाआधी पाणी प्या. झोपण्यापूर्वी लघुशंकेला जा. झोपण्यापूर्वी योग निद्रा करा.
७. वरील सर्व उपाय करूनही झोपेत चालण्याची सवय कमी होत नसेल, तर फार्मेकोथेरेपी (Pharmacotherapy) घ्या. ही थेरेपी मानसशास्त्रज्ञ आणि न्यूरोलॉजिस्ट देऊ शकतात. त्यात बेंझोडायझेपाइन्स (Benzodiazepines) व अँटीड्रिप्रेसंट (Antidepressants) अशा दोन्ही ड्रग्जचा समावेश असतो. त्यामुळे त्यांची झोपेत चालण्याची सवय कमी होऊ शकते.

डॉ. रश्मी जोशी सांगतात की, ‘कन्ज्युरिंग’सारख्या अनेक चित्रपटांमध्येही झोपेत चालण्याचा आजार दाखविला आहे. त्या पुढे सांगतात, “असे लोक फक्त उठून चालतात. झोपेत चालताना व्यक्ती स्वप्नात नसते. त्या व्यक्तीबरोबर ही बाब खरोखर घडत असते. स्वप्न बघताना आपल्याला वाटते की, ती गोष्ट आपल्याबरोबर घडत आहे; पण झोपेत चालताना त्या व्यक्तीला अशी कोणतीही जाणीव नसते, की ती कुठे जात आहे. कधी कधी झोपेत पडलेली स्वप्ने आपल्याला दुसर्‍या दिवशी सकाळी आठवतात; पण झोपेत चालणार्‍या व्यक्तीला काहीच आठवत नाही. अशा लोकांसाठी सुरक्षा हा खूप महत्त्वाचा पैलू ठरतो. झोपेत रस्ता समजून ते खिडकीतून उडीसुद्धा मारू शकतात याच कारणामुळे मुंबईतील तरुण सहाव्या मजल्यावरून पडला. त्यामुळे या लोकांची सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची आहे.”