Sleepwalking : झोप ही माणसाच्या प्रिय गोष्टींपैकी एक आहे आणि योग्य झोप घेणे चांगल्या आरोग्यासाठी तितकेच गरजेचेसुद्धा आहे. झोपेत असताना स्वप्न पडणे खूप स्वाभाविक गोष्ट आहे, पण तुम्ही झोपेत चालण्याविषयी कधी वाचले आहेत का? अनेकदा तुम्ही ऐकलं असेल की, एखाद्याला झोपेत चालण्याची सवय असते पण झोपेत चालणे नेमका काय प्रकार आहे, याविषयी काही तज्ज्ञांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना सविस्तर माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

झोपेत चालणे म्हणजे काय?

ही एक सामान्य स्थिती आहे. जेव्हा व्यक्ती गाढ झोपेत असतो आणि डोळे मिटलेले असताना अंथरुणातून बाहेर पडतो आणि आजूबाजूच्या परिसरात फिरतो, याच स्थितीला झोपेत चालणे म्हणतात.

हेही वाचा : तुम्ही खूप पटकन भावूक होता का? असं का होतं अन् यावर उपाय काय? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….

चेन्नईच्या निथ्रा इन्स्टिट्यूट ऑफ स्लीप सायन्सेस येथील क्रिटिकल केअर मेडिसीन आणि स्लीप मेडिसीनचे सल्लागार डॉ. एन. रामकृष्णन सांगतात, “झोपेत चालणे एक ‘पॅरासोम्निया’ (parasomnia) आहे, अशा स्थितीत व्यक्ती झोपेत असताना बेडवरून उठतात आणि थेट चालायला लागतात.
डॉ. रामकृष्णन पुढे सांगतात, “झोपेत चालणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे हावभाव दिसत नाहीत आणि ते कोणत्याही गोष्टीवर प्रतिसाद देत नाही किंवा कुणाशीही बोलत नाही. झोपेत चालणाऱ्या व्यक्तीला उठवणे हे खूप अवघड असते आणि विशेष म्हणजे त्यांना याविषयी काहीही आठवत नाही.”

“जरी यापासून व्यक्तीला कोणताही धोका नाही, तरी झोपेत चालणे हा खरं तर एक आजार आहे. तज्ज्ञांनुसार ही एक “असामान्य स्थिती” आहे, जेव्हा व्यक्ती गाढ झोपेत असतो (stage N3 or slow wave sleep). झोपेत चालणे हे सहसा झोपेच्या दोन तासानंतर घडू शकते, यालाच इंग्रजीमध्ये ‘non-REM parasomnia’ सुद्धा म्हटले जाते”, असे डॉ. रामाकृष्णन सांगतात.

गुरुग्रामच्या आर्टेमिस हॉस्पिटल येथील न्यूरो-इंटरव्हेन्शनल सर्जरीचे आणि स्ट्रोक युनिटचे प्रमुख डॉ. विपुल गुप्ता सांगतात, ” झोपेत चालण्याचे नेमके कारण स्पष्ट नसले तरी त्यामागे आनुवांशिक, पर्यावरणीय आणि शारीरिक बदल कारणीभूत असू शकतात. काही प्रकरणांमध्ये आनुवंशिकता, अपुरी झोप, थकवा, स्ट्रेस, एखादा आजार, झोपेचे अनियमित वेळापत्रक आणि मेंदूचे आजार इत्यादी कारणेसुद्धा जबाबदार असू शकतात.
तज्ज्ञ सांगतात की, झोपेत चालणे हे वारंवार होत असेल तर ही एक गंभीर बाब असू शकते.

डॉ. रामकृष्णन यांच्या मते झोपेत चालण्याचा घोरण्याशी संबंध आहे. कारण घोरणे हे शरीरातील ऑक्सिजन पातळी कमी होण्याचे लक्षण असू शकते.

हेही वाचा : ‘बाईपण भारी देवा’च्या चारूला ४१ व्या वर्षीच आला मेनोपॉज; मासिक पाळी लवकर बंद होण्याची कारणे काय?

डॉ. गुप्ता सांगतात, “झोपेत चालण्यासंबंधित काही आरोग्याच्या समस्या कारणीभूत असू शकतात त्या खालीलप्रमाणे-

झोपेची समस्या

झोपेत चालण्यासंबंधी स्लीप एपनिया (sleep apne) म्हणजेच झोपेत असताना श्वास घेणं थांबणं आणि पुन्हा सुरू होणं, पायांची हालचाल आणि खाण्याच्या समस्या इत्यादी कारणीभूत असू शकतात. झोपेच्य संबंधित गोष्टींची काळजी घेतल्यानंतर झोपेत चालण्याचा प्रकार कमी होऊ शकतो.

अपुरी झोप

झोपेच्या कमतरतेमुळेही झोपेत चालण्याची शक्यता वाढू शकते. झोप कमी होण्याची कारणे ओळखणे आणि त्यावर त्वरित उपचार करणे गरजेचे आहे. यामुळे याचा सकारात्मक परिणाम झोपेत चालण्याच्या समस्येवर दिसून येईल.

मानसिक आरोग्याच्या समस्या

मानसिक आरोग्याच्या समस्या या चिंता, दु:ख किंवा तणावाशी संबंधित असू शकतात. झोपेत चालण्याचे हे लक्षण मानसिक आरोग्य तपासून कमी केले जाऊ शकते.

मेंदूसंदर्भात आजार

झोपेत चालणे हे लक्षण काही प्रकरणांमध्ये मेंदूशी संबंधित आजारांमुळे दिसून येऊ शकते. आपली शंका दूर करण्यासाठी त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.

हेही वाचा : ‘Eye Flu’ची तीव्रता कशी समजून घ्यावी आणि त्यानुसार कोणते औषध घ्यावे? वाचा, नेत्रतज्ज्ञ काय सांगतात… 

फरीदाबाद येथील मॅरेंगो आशिया हॉस्पिटलचे सल्लागार डॉ. संतोष कुमार अग्रवाल सांगतात, ” झोपेत चालण्याचे लक्षण हे लहान मुले आणि प्रौढ व्यक्तींमध्येही दिसून येऊ शकते. विशेषत: ४ ते ८ वयोगटातील मुलांमध्ये हा प्रकार खूप सामान्य आहे.”

डॉ. अग्रवाल पुढे सांगतात, ” चुकीची लाइफस्टाइल किंवा अपूर्ण झोपेमुळे जर हे लक्षण दिसत असेल तर ही चिंतेची बाब आहे.”
यावर बोलताना डॉ. गुप्तासुद्धा सांगतात, “जर झोपेत चालणे हा प्रकार नियमित घडत असेल तर ही चिंतेची बाब आहे. झोपेत चालताना व्यक्ती जर असुरक्षित ठिकाणी जात असेल, घरातून पळून जाण्याचा प्रयत्न करत असेल किंवा धोकादायक गोष्टींच्या संपर्कात येत असेल तर त्या व्यक्तीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे राहते.”

डॉ. गुप्ता पुढे म्हणतात, “झोपेत चालण्याच्या या समस्येवर उपचार करणे गरजेचे आहे. कारण यामुळे दैनंदिन जीवनावर परिणाम होतो आणि त्याबरोबरच बेड पार्टनरची झोपमोड होऊ शकते.”

डॉ. रामकृष्णन सांगतात, “चांगल्या झोपेसाठी आहारात बदल, उत्तम झोप आणि झोपेत चालणाऱ्या आजारास कारणीभूत असलेल्या इतर सर्व समस्यांवर उपचार करणे गरजेचे आहे. झोपेत चालण्याची सवय ओळखा आणि सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचला. बेडरूमच्या दरवाजाला कुलूप लावा. ही सवय मोडण्यासाठी स्ट्रेस, कमी झोप या गोष्टी टाळणे खूप गरजेचे आहे.”