पापण्यांच्या केसांच्या मुळाशी गाठ, किंवा पू येऊन पापणी सुजण्याला आपण रांजणवाडी म्हणतो. पिकल्यावर रांजणवाडी आपोआप फुटते. पू गेल्यावर पापणी पूर्ण बरी होते. पण पापणी दाबून पू काढू नये. कारण त्यामुळे कधीकधी पू उलट रक्तामधून मेंदूत जाण्याची शक्यता असते.
रांजणवाडीची नुसती सुरुवात असल्यास पुढील साधा उपाय करावा. कपडयाचा बोळा गरम पाण्यात भिजवून दिवसातून 5-6 वेळा शेकवावे. याने एक-दोन दिवसांत रांजणवाडी जागच्या जागी जिरण्याची शक्यता असते. अशी न जिरल्यास ती शेकाने फुगून फुटते. ती लवकर मोकळी व्हावी यासाठी असा शेक उपयोगी पडतो. दुसरा एक उपाय म्हणजे सुजेच्या सुरुवातीस लसणाच्या पाकळीचा रस रांजणवाडीवर सकाळ-संध्याकाळ लावावा. याने रांजणवाडी न सुजता जिरून जाते.
आणखी वाचा: ‘Eye Flu’ची तीव्रता कशी समजून घ्यावी आणि त्यानुसार कोणते …
रांजणवाडी मोठी होऊन पू भरला असल्यास तो काढणे आवश्यक असते. पापणीचा तेवढाच केस नखात अथवा चिमटयाने धरून उपसून काढल्यास कणभर पू बाहेर पडतो. दोन-तीन दिवसांत जखम भरून येते. याने उपयोग न झाल्यास किंवा सतत रांजणवाडी येत असल्यास नेत्र तज्ज्ञाकडे पाठवावे.
आणखी वाचा: Eye Flu: डोळ्यांची साथ राज्यभर पसरली; खालीलपैकी एकही …
सतत येणाऱ्या रांजणवाडीची कारणे पुढील प्रमाणे असू शकतात
लहान मुलांमध्ये सततच्या येणारी रांजणवाडीची कारणांपैकी एक म्हणजे डोक्याच्या केसांमध्ये होणारा डँड्रफ अथवा कोंडा तो पापण्यांच्या केसांच्या मुळाशी जाऊन तिथे देखील इन्फेक्शन पसरवतो आणि त्यामुळे या रांजणवाडीची सुरुवात होते. अथवा पोटामध्ये कृमी असल्यास (जंत )असल्यास देखील सतत रांजणवाडी आलेली पहावयास मिळते किंवा चष्म्याचा नंबर असल्यास आणि चष्मा न वापरल्यास अशा लहान मुलांमध्ये देखील रांजणवाडी सतत येत असते.
प्रतिकारशक्ती कमी होणे आणि प्रतिकारशक्ती कमी होण्यासाठी असणारे आजार सामान्यतः क्षयरोग वेगवेगळ्या प्रकारचे ऑटो ईम्युन व्याधी ,त्याचप्रमाणे चाळीस वर्षांपुढील व्यक्तींमध्ये सतत रांजणवाडी येत असल्यास शुगरची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. सर्वसाधारण साठ वर्षाच्या पुढे पापणीला जर गाठ आलेली असेल तर ती गाठ रांजणवाडीचीच असेल असे नसते.
त्यावेळी मात्र अशा गाठी काढायला लागतात आणि त्या प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवायला लागतात.
कारण साठ वर्षाच्या पुढे अशा गाठींमध्ये कॅन्सरची शक्यता असू शकते. त्यानुसार या सर्व गोष्टी दुर्लक्ष न करता वेळीच लक्ष देणे आवश्यक असते.