डॉ. अश्विन सावंत
खारट रसाची एक विशेषता म्हणजे तो अनुलोमक आहे. अनुलोमक म्हणजे काय? तर वायुला (वाताला) अनुलोम ( प्राकृत) गती देणारा. वायू म्हणजे केवळ गॅस नव्हे तर शरीरामधील सूक्ष्म-स्थूल, गम्य-अगम्य, दृश्य-अदृश्य अशा सर्वच क्रियांमागील प्रेरक बल म्हणजे वायु. उदाहरणार्थ : शिंक-खोकला-हास्य-जांभई या क्रियांमध्ये वाताची उर्ध्व गती आहे,तर मल-मूत्र-अधोवायू-वीर्य-आर्तव (मासिक रजःस्राव) या क्रियांमध्ये वाताची अधोगती आहे. अधो गतीच्या दिशेमध्ये कार्य करणार्या वायूला उर्ध्व गती मिळाली तर मल-मूत्र-अधोवायु यांच्या विसर्जन कार्यामध्ये बाधा येईल व त्यासंबंधित इतर विकारही होतील, तेच शिंक-खोकला-हास्य-जांभई यांच्या उर्ध्वगतीबाबतही! त्यामुळे त्या त्या क्रियांमध्ये वाताला अपेक्षित अशी गती असली पाहिजे, जी त्या त्या क्रियांमध्ये प्राकृत (अनुलोम) असते. विरोधी गति मिळाली तर तत्संबंधित विकृती सुरू होतात. ही जी वाताची विरुद्ध गती होते, तिला प्रतिलोम गती म्हणतात ,त्या विरुद्ध गतीला प्राकृत गती प्राप्त करुन देणे म्हणजे अनुलोमन अर्थात वात-अनुलोमन.
हे वात अनुलोमनाचे जे कार्य आहे, ते खारट रसाने फार चांगले होते. खारट रसाच्या या अनुलोमक गुणाचाच उपयोग करुन आयुर्वेदामध्ये लवणभास्कर चूर्ण-हिंग्वाष्टक चूर्ण-शंख वटी यांसारखी एकाहून एक गुणकारी औषधे तयार झाली आहेत, ज्यामध्ये खारट चवीची सैंधव, पादेलोण, बीडलवण, वगैरे औषधे आहेत. या औषधांचा प्रत्यक्षातही फ़ार चांगला फ़ायदा होताना दिसतो. अर्थात हेसुद्धा खरे की समाजाला जसे वाटते तसे लवणभास्कर-हिंग्वाष्टक चूर्ण आदी औषधे ही केवळ गॅसेस-अपचनावरची औषधे नसून त्यामागे ‘वातानुलोमन’ हे गमक आहे, ज्याचा उपयोग कुशल आयुर्वेद चिकित्सक विविध रोगांच्या विविध अवस्थांमध्ये करून भलेभले आजार बरे करु शकतो.
जंतुघ्न मीठ
मीठाचा एक अलौकिक असा एक गुणधर्म म्हणजे जंतुघ्नता. मीठ हा एक अतिशय उत्तम असा जंतुनाशक पदार्थ आहे. मीठाच्या द्रावणामध्ये रोगजंतु जगत नाहीत. मीठाच्या या जंतुनाशक गुणधर्माशी आपले पूर्वज चांगलेच परिचित होते. अन्नपदार्थ साठवण्यासाठी मीठाच्या जंतुनाशक गुणधर्माचा उपयोग आपल्याच देशामध्ये नव्हे तर जगामधील सर्वच आदीम जातिजमातींमध्ये केला जात होता. आजही ज्या दुर्गम भागामध्ये अन्नधान्याची सहज उपलब्धी नसते, तेव्हा मिळालेले अन्न भविष्यामध्ये खाण्यास मिळावे याकरता मीठ लावून ठेवले जाते. साठवून ठेवलेल्या अन्नाला हवेतील जंतुंपासुन सुरक्षित ठेवण्याचा सोपा मार्ग म्हणजे त्या अन्नामध्ये मीठ मिसळून ठेवणे हा होता व आहे. यावरुन आपल्या पूर्वजांना मीठाचा जंतुनाशक गुणधर्म ज्ञात होता असे दिसते. याच गुणधर्माचा उपयोग करुन घेण्यासाठी आपल्याकडे मीठाने दात व हिरड्यांना मंजन करण्याची पद्धत होती. मीठाने मंजन करणार्यांना दात किडण्याची शक्यता जवळजवळ नव्हतीच. परदेशी विद्वानांनी व त्यांच्या शास्त्रप्रभावाने दिपून गेलेल्या नवशिक्षित भारतीयांनी सुद्धा आपल्या अशा आरोग्यपरंपरांना ’गावठी-अनाडीपणा’ असे संबोधून त्या परंपरा हळूहळू बंद पाडल्या. ब्रिटन-अमेरिकेचा यामागील व्यापाराचा हेतू काही त्या वेळेस आमच्या ध्यानात आला नाही व आम्ही आमचे आरोग्य सांभाळणार्या आरोग्य-परंपरांना फाटा दिला. गंमत म्हणजे त्याच मीठाचे जंतुनाशकत्वाचे गुणधर्म ओळखल्याने की काय, परदेशी कंपन्या आता आमच्या टूथपेस्टमध्ये मीठ असल्याचा प्रचार करत आहेत आणि आमच्या नट्या आपले दात दाखवत “तुमच्या टूथपेस्टमध्ये नमक आहे का” हा प्रश्न समाजाला विचारत आहेत.