What is the best time to walk every day: अलीकडील धावपळीच्या जीवनशैलीमुळे कित्येक लोक फिरायला जाणं किंवा व्यायाम करणं टाळतात. आपल्या शरीरासाठी चालणं खूप फायदेशीर मानलं जातं. चालणे ही सुदृढ शरीराची गुरुकिल्ली आहे. चालण्यासारखा दुसरा उत्तम व्यायाम नाही, त्यामुळे इतर कुठला व्यायाम केला नाही तरी चालेल, पण दिवसातून काही वेळ तरी चालायला हवे हे प्रत्येकालाच माहीत असते. यामुळेच आरोग्यतज्ज्ञांनी चालण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती याविषयी माहिती दिली असल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्याबाबत सविस्तर जाणून घेऊ…

तज्ज्ञांच्या मते, अनवाणी चालणे खूप फायदेशीर असते. जेव्हा आपण जमिनीवर किंवा गवतावर अनवाणी चालतो, तेव्हा आपल्या हृदयाचे ठोके पूर्णपणे सामान्य असतात. हे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. हृदयाचे ठोके हे हार्मोन्सपासून ते शरीराच्या तापमानापर्यंत अनेक गोष्टींचे नियमन करत असते, त्यामुळे त्याचे संतुलन अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. अनवाणी चालण्याने तुमच्या पायांचे स्नायू आणि अस्थिबंध मजबूत होतात, ज्यामुळे पाठीच्या खालच्या भागाला चांगला आधार मिळतो. तसेच या सरावाने, चालताना तुमच्या पायांची स्थिती सुधारते.

आरोग्यतज्ज्ञांच्या माहितीनुसार, जर आपण चालण्याची योग्य वेळ निवडली तर त्याचा आणखी फायदा होऊ शकतो. कोलंबिया पॅसिफिक कम्युनिटीजचे तंदुरुस्ती आणि आरोग्यप्रमुख डॉ. कार्तियायिनी यांच्या मते, आपले शरीर सर्केडियन रिदमनुसार कार्य करते, दुपारी २.३० नंतर कोणत्याही हालचालींसाठी स्नायूंची अधिक ताकद आवश्यक असते, तेव्हा आपले शरीर सर्वोत्तम समन्वयात असते व उत्तम प्रतिसाद देते. तर संध्याकाळी ५ वाजेपर्यंत हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी कार्यक्षमता आणि स्नायूंची ताकद सर्वाधिक असते, त्यामुळे आपले शरीर संध्याकाळी चालण्यासाठी अधिक सक्षम असते.

पण त्यांनी स्पष्टच सांगितले की, संध्याकाळच्या वेळी हवेतील प्रदूषित घटकांचे प्रमाण अधिक असण्याची शक्यता असते. तर रात्रीच्या वेळी प्रदूषित हवा स्थिरावते व पहाटे प्रदूषणाचे प्रमाण त्यामुळेच कमी असते. या दोन्ही गोष्टी लक्षात घेता, सकाळी चालणे हे अधिक फायदेशीर असू शकते, असे तज्ज्ञांनी सांगितले.

त्याचप्रमाणे वय हा एक महत्त्वाचा निकष आहे, त्यामुळे वृद्ध व्यक्तींनी चालण्यास सुरुवात करण्यापूर्वी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यायला हवे. जर एखाद्याला उच्च रक्तदाब (बीपी) असेल तर सकाळी लवकर रक्तदाबात शारीरिक वाढ होते, म्हणून त्या व्यक्तीने खूप लवकर चालणे टाळावे.

वृद्ध लोकांनी हवामान जास्त थंड नसतानाच बाहेर पडावे, म्हणूनच सकाळच्या सूर्यप्रकाशाचा फायदा घेण्यासाठी सकाळी ८ नंतर चालणे सुरू करणे चांगले आणि व्हिटॅमिन डीचा सर्वात फायदेशीर डोस मिळविण्यासाठी संध्याकाळी ४.०० ते ४.३० च्या सुमारास चालणे चांगले असल्याचे डॉ. कार्तियायिनी यांनी सांगितले.