अनेक शारीरिक व्याधींचा आत्तापर्यंत आपण मागील काही लेखांमध्ये मानसिक समस्यांशी आणि मानसिक स्थितीशी असलेला संबंध पहिला. आपल्या शरीरातील अंतर्द्रव्ये निर्माण करणाऱ्या ग्रंथीही (endocrine glands) आजारांना कारणीभूत असतात; जसे थायरॉईड ग्रंथी आणि त्यांचे विकार. आज थायरॉईड ग्रंथीच्या विकारांचा आणि मनाचा काय संबंध ते पाहू.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

थायरॉईडचे दोन प्रकारचे आजार असतात. थायरॉईड ग्रंथी आपल्या गळ्यात समोरच्या बाजूला असते. ती Triiodothyronin(T3) आणि Thyroxin(T4) अशी दोन अंतर्द्रव्ये निर्माण करते. मेंदूतील Hypothalamus, Pituitary gland असे भाग काही अंतर्द्रव्ये उदा. Thyroid stimulating hormone(TSH) निर्माण करतात, ज्यांच्या आधारे थायरॉईड ग्रंथीचे कार्य नियंत्रित केले जाते. जेव्हा TSH चे प्रमाण वाढते आणि T4/T3 यांचे प्रमाण कमी होते तेव्हा त्यास प्रत्यक्ष थायरॉईड ग्रंथी कमतरता(Overt Hypothyroidism) आणि जेव्हा TSH चे प्रमाण जास्त, परंतु T4/T3 यांचे प्रमाण नॉर्मल राहते तेव्हा त्याला अप्रत्यक्ष थायरॉईड ग्रंथी कमतरता (subclinical hypothyroidism) असे म्हणतात. जेव्हा TSH कमी प्रमाणात निर्माण केले जाते आणि T4 चे प्रमाण वाढते, तेव्हा त्याला थायरॉईड ग्रंथीचे अतिप्रमाणात स्रवणे(Hyperthyroidism) म्हणतात. या दोन्हीचा मानसिक स्थितीवर परिणाम होतो आणि मानसिक विकारांचा थायरॉईड ग्रंथीच्या कार्यावर काही प्रमाणात परिणाम झालेला दिसून येतो.

३२ वर्षांची श्रुती गेले काही महिने अतिशय थकलेली दिसायची. घरातले काम काही तिच्याने उरकायचे नाही. दुपार उलटून जायची सगळी झाकपाक करताना. कामाचा वेग अत्यंत कमी झाला होता. कशात उत्साह वाटत नसे. पटकन रडू यायचे. काही करताना लक्ष लागत नसे, पटकन विसरायला व्हायचे. मग घरच्या कामात चुका होत. कोणी काही निरोप दिला तर तो ती विसरून जायची. कधी कधी एखादे महत्त्वाचे काम विसरायची आणि मग तिला फार अपराधी वाटायचे. मुलांशीसुद्धा बोलावेसे वाटत नसे. घरातल्या सगळ्यांना वाटले की तिने वर्षापूर्वी नोकरी सोडली, त्याचेच तिला आता टेन्शन आले आहे. तिने स्वतः घेतलेला निर्णय असला तरी आता बहुधा तिला नोकरी सोडल्याचा पश्चात्ताप होत असावा, असे वाटून तिला त्यांनी मनोविकारतज्ज्ञाकडे नेले. तिची लक्षणे सगळी डिप्रेशनची होती. तिला त्यानी औषध दिले. तीन महिने झाले गोळ्या घेऊन, तरी लक्षणांमध्ये काही सुधारणा होई ना! डॉक्टरांनी थायरॉईडचा तपास करायला सांगितला. Hypothyroidism चे निदान झाले. त्याचे उपाय सुरू झाले. डिप्रेशनचे औषध सुरूच होते. हळूहळू श्रुतीची तब्येत सुधारू लागली, कामाला वेग आला आणि मनात उत्साह आला.

आणखी वाचा: Health Special: सगळं संपवून टाकावं वाटतं तेव्हा काय विचार …

३५ वर्षांचा अभय हल्ली सारखा घामाघूम होई. ऑफिसला जाताना कसली तरी अनामिक भीती त्याला वाटे. छातीत धडधडू लागे. लिहायला बसला की हात थरथरत. काय होते आहे आपल्याला, असे त्याला वाटे. नुकतेच प्रमोशन मिळाले होते, जबाबदारी वाढली होती, टीम लीडर झाला होता. त्या वाटले आपल्याला त्याचेच टेन्शन आलेले दिसते आहे. त्याने सरळ एका मानसोपचारतज्ज्ञाचा सल्ला घेतला, थेरपी सुरू झाली. एकीकडे त्याच्या लक्षात आले, कितीही खाल्ले तरी वजन कमी होत चालले आहे. हे काहीतरी वेगळे आहे, असे जाणवले आणि तो आपल्या डॉक्टरांना भेटला. त्याला तपासून त्यांनी लगेचच थायरॉईडचा तपास करायला सांगितला, रिपोर्ट पहिले आणि hyperthyroidism चे निदान केले.

थायरॉईडचे विकार आणि डिप्रेशन, चिंता अशा मानसिक विकारांची लक्षणे खूप सारखी असतात. त्याचबरोबर हायपोथायरॉईडीझममध्ये डिप्रेशनचे प्रमाण जास्त आढळते. हायपरथायरॉईडीझममध्ये चिंतेच्या विकारांचे प्रमाण जास्त आढळते. क्वचित कधी मेनिया, सायकोसिस असेही विकार दिसून येतात.

थायरॉईड ग्रंथीचे विकार बौद्धिक क्षमतांवर परिणाम करतात. लक्ष न लागणे, स्मरणशक्तीवर परिणाम, कामामध्ये चुका अशी अनेक बौद्धिक लक्षणे दिसून येतात. यांची तीव्रता जास्त असेल तर डीमेंशीयाचे निदान करावे लागते. लवकरात लवकर थायरॉईड ग्रंथीचा विकार यात लक्षात आला आणि उपाय सुरू झाले तर बौद्धिक क्षमतांमध्ये सुधारणा दिसून येते.

आणखी वाचा: Health Special: पचनसंस्था आणि मन यांचं कनेक्शन

६० वर्षांच्या सुलेखाताई हल्ली विसरायला लागल्या होत्या. आपण जेवलो की नाही हे सुद्धा कधी कधी विसरत. एकदा तर आपल्या घराचा रस्ताच चुकला. ओळखीच्या बाई वाटेत भेटल्या आणि त्यांना घरी घेऊन आल्या. एकट्याच बसायच्या, चेहऱ्यावर काही भावभावनाच दिसत नसत. आपल्या आईला असे काय झाले आहे, हे मुलाला कळेना. डॉक्टरांकडे नेल्यावर त्यांनी एमआरआय.करायला सांगितला. त्यात काही विशेष निदान निघाले नाही. तरी त्यांची बुद्धी काम करत नाही आहे, असे लक्षात येत होते. अनेक तपासण्या केल्या आणि थायरॉईड ग्रंथीचा विकार सापडला. लगेच औषधे सरू झाली आणि अहो आश्चर्य! दोन महिन्यात आईची स्मरणशक्ती सुधारायला लागली. चेहऱ्यावर हसू परत आले.

उपचारांना प्रतिसाद न देणारे डिप्रेशन आणि थायरॉईड ग्रंथी यांचेही नाते आहे. अप्रत्यक्ष विकार यात आढळतात आणि थायरॉईड ग्रंथी नियंत्रणात ठेवणाऱ्या अंतर्द्रव्यांचे प्रमाण कमी जास्त झालेले आढळते. लिथिअम सारखी औषधेसुद्धा थायरॉईड ग्रंथीच्या विकारांना कारणीभूत होतात.

थायरॉईड ग्रंथी आणि मन यांचे असे एकमेकांशी असलेले नाते. सजगपणे लक्षणांकडे पाहणे आणि योग्य निदान आणि उपचार करणे फार आवश्यक. शरीर आणि मन यांच्यातला दुवा किती दृढ आहे हे आपण गेल्या काही लेखांमध्ये पहिले. ही चर्चा अजूनही सुरू राहू शकते, परंतु सध्या यातून अर्धविराम घेते. शरीर आणि मन विचार करतानाच जाणवले की तितकेच महत्त्वाचे आहे ते स्त्रीचे मन. पुढच्या काही लेखांमध्ये या स्त्रीमनाचा वेध घेऊ!

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is the connection between thyroid and mind hldc psp
Show comments