उजवी बाजू, डावी बाजू, खालची बाजू, वरची बाजू अशा चार ठिकाणी अक्कलदाढा येतात. आपण आलोय हे त्यांना सांगावंही लागत नाही. आधुनिक जीवनशैलीमुळे आजकाल आपण तयार अन्न जास्त खातो. (फास्ट फूड) हे अन्न खाताना पूर्वी जसे आपल्याला चावून खावे लागायचे तसे आता तेवढे प्रयास करावे लागत नाही. शिवाय पूर्वीचे देशी खाणे जाऊन आता परदेशी खाणे जास्त खात असल्याने या खाण्याच्या सवयीने निसर्ग ही आपल्या शरीरात काही बदल घडवून आणत असतो…
एकूणच आपल्या बदललेल्या आहारशैलीमुळे पूर्वीप्रमाणे आपल्याला आता जास्त दाढांची गरज लागत नाही. त्यामुळेच आपल्या जबड्याचा आकारही बदलत चालला आहे. त्यामुळेच झालेय काय की, जबडा छोटा परंतु दात ३२ त्यामुळे या शेवटी येणाऱ्या चार अक्कलदाढांची जागा अगोदर आलेले २८ दात घेऊन टाकतात. त्यामुळे या चार अक्कलदाढा यायला तर बघतात परंतु सरळ वर येऊ शकत नाहीत. यामुळे काही वेळा त्या तिरक्या येतात, काही वेळा अर्ध्यावरच येऊन अडकतात, काही वेळा वर येतच नाहीत, काही वेळा फक्त त्यांचा पाव भागच वर येतो, काही वेळा त्या सरळ आडव्या झोपून जातात, काही तर खाली डोके वर पाय अशा उलट्या होतात आणि याच कारणांमुळे खरं म्हणजे अक्कलदाढ येताना तीव्र वेदना होतात. गाल सुजणे, हिरड्या सुजणे, तोंड उघडता न येणे, तोंड पूर्ण बंद न होणे, चेहऱ्याचा काही भाग बधिर होणे, कानातून प्रचंड कळा येणे, गळ्याच्या बाजूला सूज येणे, मुख दुर्गंधी येणे इत्यादी अनेक त्रास होतात. त्यामुळेच अक्कलदाढ ही सर्वात वैशिष्ट्यपूर्ण गणली जाते व तिची खूप काळजीही घ्यावी लागते.
हेही वाचा : आरोग्य वार्ता : तंबाखूमुळे सात देशांमध्ये दरवर्षी १३ लाख जणांचा मृत्यू
पण पुढे काय?
म्हणूनच आपण आता सर्वात महत्त्वाच्या विषयावर बोलू ते म्हणजे यावर उपाय काय. पूर्वीच्या काळी अक्कलदाढ दुखायला लागली की दात काढणे हा सर्वात सोपा उपाय केला जायचा. अर्थात अक्कलदाढच काय पूर्वीच्या काळी कुठलीही दाढ दुखली की काढणे हाच जालीम उपाय होता. हल्ली २५-३० वर्षांत यामध्ये सुधारणा होत होत आता कुठलाही दात काढण्यापेक्षा तो वाचवण्यावर सर्वात जास्त भर दिला जातो. हे सर्व असूनही केवळ भारतातच नव्हे तर इतर बऱ्याच देशांत अक्कलदाढ किंवा विज्डम टूथ काढण्यावर जास्त भर दिला जातो, या मागची कारणे आपण जाणून घेऊया.
कुठलाही दात किंवा दाढ काढायची नसेल तर तिला रूट कॅनॉल ट्रीटमेंट म्हणजे आरसीटी करून कॅप बसविण्याची ट्रीटमेंट सहसा करतात. या दातांतील / दाढेतील खराब नस काढून टाकली जाते. तेथे प्लास्टिकची नस टाकून त्यावर कॅप बसवली जाते. अक्कलदाढेवर आरसीटी करणे हे अत्यंत कौशल्याचे काम आहे. आपण आरसीटी करूनही ती दाढ अथवा दात वाचवेलचं याची शाश्वती नसते.
हेही वाचा : Health Special : आंबवलेले पदार्थ पित्तप्रकोपक !
अक्कलदाढेच्या मुळांची संख्या इतर दातांप्रमाणे साचेबंद नसते. तसेच त्यांच्या मुळांचा आकार/ रचना व ठेवणही वैविध्यपूर्ण असते. शिवाय अजून एक अडचण यात येते ती म्हणजे अक्कलदाढ सर्वात शेवटी असल्यामुळे नसांपर्यंत पोहोचण्यासाठी तोंडाचा अॅक्सेस किंवा मार्ग हा फार अरुंद व अवघड असतो. या सर्व बाबींमुळेच तिला आरसीटीने वाचवण्यापेक्षा काढण्यावर जास्त भर द्यावा लागतो.
आजकाल आपण जे खाद्यपदार्थ खातो त्याचे चर्वण (चावून खाणे) ही गरज इतर दात पूर्ण करतात. त्यामुळे या अक्कलदाढेचा तसा खाण्यासाठी फार उपयोग होत नाही. म्हणूनच बऱ्याचदा अक्कलदाढ काढण्याचाच सल्ला दिला जातो. येथे आपण हेही लक्षात ठेवूया की काही रुग्ण दाढ वाचविण्याचा जास्त प्रयत्न करतात व काही डेंटिस्टही प्रयत्नपूर्वक आरसीटी करून दात वाचवायचा प्रयत्न करतात. त्यामुळे रुग्ण व डेंटिस्ट यांनी परस्पर विचार विनिमय करूनच परिस्थितीनुसार निर्णय घ्यायचा असतो. यानंतर पुढील भागात आपण अक्कलदाढेची सर्जिकल रिमूव्हलची पद्धतही जरा समजून घेऊ जेणेकरून रुग्णांना त्यासंबंधी चांगली माहिती मिळून त्यांची भीती कमी होईल.