अलीकडेच आम्ही एका सहलीला गेलो होतो आणि एका ठिकाणी ‘नो कोलेस्ट्रॉल फूड’ असं लिहिलेलं मेनूकार्ड वाचलं. अगदी पुलाव , पनीर माखनवाला, तळलेली पुरी , तुपाळलेली पोळी आणि अनेक मिठाईचे प्रकार मिळणाऱ्या या निमशहरी हॉटेलमध्ये प्रत्येक पदार्थ हा छुप्या कोलेस्ट्रॉल आणि स्निग्धांशाचे द्योतक होता. आम्ही कुतूहलाने अनेक पदार्थ चाखले (अर्थात आम्हा सगळ्यांमध्ये कुतूहलाने खाणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने आम्हांला त्यांचे ‘कोलेस्ट्रॉल फ्री’ दावा असणारे अनेक पदार्थ चाखता आले) दावा करणाऱ्यांचा भर हा प्रत्येक पदार्थ तुपात तयार केला जातो आणि त्यामुळे त्यात काहीही कोलेस्टेरॉल नाही असा होता. साधारण ४-५ प्रकार खाताना आम्हांला आपल्याकडे ‘हेल्दी ‘ किंवा ‘फॅट फ्री’च्या दाव्यानिशी काय केलं जाऊ शकतं याचं साग्रसंगीत प्रक्षेपण अनुभवायला मिळालं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फॅट्स आणि त्याभोवतालचं जग हे आपल्या सध्याच्या राजकारणाइतकंच गुंगवून टाकणारं आहे. म्हणजे अनाकलनीय नाही पण थक्क करणारं मात्र नक्कीच आहे! असं का बुवा ? त्याबद्दल आज जाणून घेऊया.

शरीरातील चरबी आणि स्निग्धद्रव्ये वजा केल्यास शरीराचा साचा गळून पडेल. कारण स्निग्धांश आपल्या पेशीभवतालचं आवरण तयार करतात, इतकेच नव्हे तर आवश्यकतेप्रमाणे त्यातून संप्रेरकांचे प्रवास अविरत सुरु ठेवण्याचे कामदेखील करतात. किंबहुना मानवी मेंदूचा ६० % भाग अशा पेशींनी तयार झालेला आहे. कोलेस्टेरॉल हे खरं तर हृदयरोगांमुळे बदनाम असले तरी टेस्टोस्टेरॉल आणि प्रोजेस्टेरॉन यासारख्या संप्रेरकांसाठी महत्वाचे स्निग्धांश आहे.

शरीरातील एकूण स्निग्धांशाचे प्रमाण त्याचं शरीरातील स्थान, प्रवाह, कार्य ठरवत असते. म्हणजे काय? तर स्निग्धांश ५०% हून जास्त पेंशीवर काम करतात. त्यांचे प्रवाहीकरण (सिग्नलिंग) योग्य वेगाने सुरु ठेवू शकतात. ज्यांचे वजन प्रमाणात असते त्यामध्ये फॅट्स योग्य वेगाने कार्यरत असतात. अतिरिक्त चरबीचे प्रमाण याच स्निग्धांशांच्या कार्यात अडथळा तयार करते. उदाहरणार्थ अपचन किंवा जळजळ हा सामान्य प्रतिकारशक्तीचा भाग आहे. अतिरिक्त चरबीचे प्रमाण शरीरात आपोआप जळजळ तयार करणारी रसायने सोडू शकतात. त्याचप्रमाणे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या संप्रेरकांप्रमाणे स्टिरॉइड तयार करण्याचे काम शरीरातील स्निग्धांश करत असतात. वय , शारीरिक हालचाली, व्यायाम यावर या संप्रेरकांचे प्रमाण आणि परिणाम कमी किंवा जास्त होत असतात.

हेही वाचा… Health Special: अती पाणी पिण्याचा अन्नपचनावर परिणाम होतो का?

शरीरातील लेप्टीन संप्रेरक भुकेसाठी कारणीभूत असते. स्निग्धांशाच्या महत्वाच्या घटकामध्ये लेप्टीनचा समावेश होतो लेप्टीन भूकेवर संयम ठेवते, ऊर्जेचा वापर वाढवते आणि शरीराला चरबी जाळण्यास प्रवृत्त करते. सकस आहार लेप्टीनची पातळी प्रमाणात राखतो आणि वजनावरदेखील अंकुश ठेवण्यास मदत करतो. आपण खात असलेल्या अन्नातील स्निग्धांशांतून विरघळणारी जीवनसत्त्वे म्हणजे अ , ड , ई , क ; यांना स्निग्धांशी जीवनसत्त्वे (फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स) असेदेखील म्हटले जाते. ही जीवनसत्त्वे चरबीमध्ये विरघळून पूरक प्रमाणात शरीराला उपयुक्त ठरतात. त्यामुळे आहारात योग्य प्रमाणात स्निग्धांश असणे आवश्यक आहे.

हेही वाचा… Health Special: कर्करोग, हृदयरोग, अल्झायमर… सर्वांवर रामबाण उपाय, स्वयंपाकघरातील ‘हा’ घटक!

अनेकदा वजन कमी करण्यासाठी सरसकट कमी स्निग्धांश आणि कमी प्रोटीन असा आहार घेतला जातो. या प्रकारच्या आहारपद्धतीमध्ये शरीरातील सेरोटोनिनचे प्रमाण कमी होते. सेरोटोनिन हे एक न्यूरोट्रान्समीटर आहे ज्याला आपण लेखा पुरतं आनंदी रसायन म्हणू. तर हे सेरोटोनिन आपल्या मनाच्या आनंदी संतुलनाचे गमक आहे. स्निग्ध पदार्थ अत्यल्प प्रमाणात घेतल्यास अचानक आपल्या अतिकर्बोदके खाण्याची (खूप गोड खाणे, खूप जास्त भूक लागणे ) इच्छा होऊ लागते परिणामी शरीरातील इन्सुलिनची पातळी वाढू शकते. आणि सेरोटोनिन तात्पुरते स्रवण्याचे दुष्टचक्र सुरु होऊ शकते . यालाच आपण आहाराच्या बोली भाषेत क्रेविंग्स (cravings) म्हणतो.

अनेकदा अत्यल्प स्निग्धांशांचे प्रमाण कुपोषणाशी संबंधित असते. केवळ आहारातीलच प्रमाण नव्हे तर छुपे स्निग्धांशांचे प्रमाण जाणून त्यावर अंकुश ठेवणे हे आपल्या पिढीसमोर मोठे आव्हान आहे .

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is the exact function of fats in the body hldc dvr
Show comments