What Is The Five Worst Breakfast Options : आपल्यातील अनेकांना सकाळचा नाश्ता करायला भरपूर आवडते; तर काही जण अगदी या उलट असतात. त्यांना सकाळी उठल्यावर चहा पिणेसुद्धा आवडत नाही. पण, दिवसातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाश्ता. कारण- नाश्ता केल्यामुळे उर्जेची पातळी आणि चयापचय यांवर परिणाम होतो. पण, नाश्त्याचे सर्व पर्याय योग्य नसतात. काही तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठीसुद्धा हानिकारक असू शकतात. त्याचबद्दल आपण या बातमीतून जाणून घेऊया…

नाश्त्यातील अनेक लोकप्रिय पदार्थ सोईस्कर किंवा आनंददायी वाटू शकतात. पण, नियमितपणे सेवन केल्यास त्यांचे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. तर याचबद्दल जाणून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांशी चर्चा केली.

नवी दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलमधील वरिष्ठ सल्लागार कार्डिओथोरॅसिक आणि हार्ट अँड लंग ट्रान्सप्लांट सर्जरी डॉक्टर मुकेश गोयल म्हणाले की, सकाळी सामान्यतः खाल्ल्या जाणाऱ्या काही पदार्थांमुळे हृदयरोग, उच्च रक्तदाब आणि इतर हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या आजारांचा विकास होऊ शकतो.

हृदयाच्या आरोग्यासाठी खालील ५ नाश्त्याचे पर्याय सगळ्यात वाईट ( Five Worst Breakfast Options For Heart Health) :

१. जास्त साखर असणारा नाश्ता (High-Sugar Breakfast Cereals)

धान्य सोईस्कर असतात. पण, त्यात साखरेचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे रक्तातील ग्लुकोजच्या पातळीत जलद वाढ होते. त्यामुळे इन्सुलिन प्रतिरोध, जळजळ, स्थूलता आणि टाईप २ मधुमेहाचा धोका वाढू शकतो . हे दोन्ही हृदयरोगासाठी महत्वाचे घटक आहेत.

२. प्रक्रिया केलेली मांस उत्पादने (Processed Meat Products)

बेकन (bacon) आणि सॉसेज (sausages) यांसारख्या पदार्थांमध्ये सॅच्युरेटेड फॅट आणि सोडियमचे प्रमाण जास्त असते. डॉक्टर गोयल यांच्या मते, एपिडेमियॉलॉजिकल (epidemiological ) अभ्यासात असे सांगितले आहे की, प्रक्रिया केलेले मांस नियमित सेवन केल्याने कोरोनरी हृदयरोग (coronary heart disease) आणि उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. या उत्पादनांमधील नायट्रेट्सदेखील एंडोथेलियल डिसफंक्शनमध्ये योगदान देऊ शकतात, ज्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या धोका आणखी वाढतो.

३. पेस्ट्री आणि डोनट्स (Pastries And Doughnuts)

या लोकप्रिय पदार्थांमध्ये ट्रान्स फॅट्स आणि रिफाइंड कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते. ट्रान्स फॅट्स एलडीएल (खराब ) कोलेस्ट्रॉल वाढवतात आणि एचडीएल (चांगले) कोलेस्ट्रॉल कमी करतात, ज्यामुळे लिपिड प्रोफाइलवर नकारात्मक परिणाम होतो. या पदार्थांचे उच्च ग्लायसेमिक भार इन्सुलिन प्रतिरोध आणि कालांतराने हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्यांनादेखील कारणीभूत ठरू शकते.

४. फुल-फॅट क्रीम चीज (Full Fat Cream Cheese)

फुल-फॅट क्रीम चीजमध्ये सॅच्युरेटेड फॅट भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे एलडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते, ज्यामुळे एथेरोस्क्लेरोसिसचा धोका वाढतो, जो हृदयरोगासाठी एक प्रमुख घटक आहे.

५. आर्टिफिशल फ्लेवर्ड नॉन-डेअरी क्रिमर्स (Artificial, Flavoured Non-Dairy Creamers)

या क्रिमर्समध्ये बहुतेकदा अंशतः हायड्रोजनेटेड तेले असते, जे ट्रान्स फॅट्सचे स्रोत असतात. नियमित सेवनाने लिपिड प्रोफाइल खराब होऊ शकते आणि हृदयरोगाचा धोका वाढू शकतो.

तुमच्या दिवसाची सुरुवात हृदयास त्रासदायक पदार्थ टाळून करायची असेल, तर नाश्त्यामध्ये कमी सॅच्युरेटेड फॅट्स, ट्रान्स फॅट्स आणि साखरेचे प्रमाण कमी असलेल्या पदार्थांचा पर्याय निवडणे आवश्यक आहे, असे डॉक्टर गोयल म्हणाले आहेत.