आज जणू डॉक्टरांचा प्रश्नांचा तास चालला होता.
“ खूप टेन्शन घेतल्यामुळे माझ्या बहिणीला डिप्रेशन आले ना?”
“ माझ्या वडलांना डिमेन्शिया झाला, म्हणजे मलाही होईल का मी म्हातारा झाल्यावर?”
आणखी वाचा : Health special: निरोगी आयुष्यासाठी मीठ किती खावे? किती खावू नये?
“ आता मेंदूच्या रचनेविषयी, कार्याविषयी इतके संशोधन झाले आहे, मनोविकारांचा मेंदूशी कसा संबंध
असतो?”
असे अनेक प्रश्न सगळ्यांच्याच मनात असतात आणि ते स्वाभाविकच आहे. मलेरियाचे जंतू डास
चावला की आपल्या शरीरात शिरतात आणि आपल्याला मलेरिया होतो, हे सगळ्यांनाच ठाऊक असते.
एखाद्याला टीबी होतो तेव्हा टीबीचे विषाणू त्याला जबाबदार असतात. पण त्याच बरोबर वय,
कुपोषण, दारूचे व्यसन, धूम्रपान, हवेतील प्रदूषण आणि घरात एखाद्या व्यक्तीला टीबी झालेला असणे
असे अनेक घटक या रोगाला कारणीभूत असतात. याचाच अर्थ कोणताही आजार हा अनेक कारणांमुळे
होतो. अनेक शारीरिक आजारांच्या बाबतीत एखादा जीवाणू, विषाणू, जंतू प्रत्यक्षपणे आजाराला
कारणीभूत होतो आणि इतर घटक उदा. आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीही त्याला सहाय्यीभूत
होतात. मानसिक विकारांच्या बाबतीतही हे खरे आहेच, परंतु शारीरिक आणि मानसिक विकारांमध्ये एक
महत्त्वाचा फरक म्हणजे एक विशिष्ट जीवाणू, विषाणू किंवा जंतू असा त्या त्या आजारासाठी सापडत
नाही. तर कोणताही मानसिक आजार हा अनेक जैविक, मानसिक आणि सामाजिक घटकांच्या
परस्परक्रियांमुळे होतो.
आणखी वाचा : Health special: आहारामध्ये प्रथिनांचे प्रमाण किती असावे?
मानसिक विकार अनुवांशिक असतात हे अनेकांना माहीत असते. स्किझोफ्रेनिया, स्वमग्नता(autistic
spectrum disorder), mood disorder(डिप्रेशन-मेनिया)अशा अनेक विकारांच्या बाबतीत अनुवांशिकतेचा
अभ्यास झाला आहे. जुळ्या भावंडांपैकी ४०-५०% भावंडांना, एकाला असेल तर दुसऱ्याला,
स्किझोफ्रेनिया होतो असे सिद्ध झाले आहे, जवळच्या नातेवाईकाला स्किझोफ्रेनिया असेल तर तो
होण्याची शक्यता वाढते. परंतु एक विशिष्ट जनुक (gene) याला जबाबदार नाही. विशिष्ट एका
गुणसूत्रातील बदलामुळेही हा आजार होत नाही. अनेक जनुके स्किझोफ्रेनियाशी संबंधित आहेत असे
लक्षात आले आहे. या जनुकांचा संबंध मेंदूतील विशिष्ट भागांच्या संरचनेमध्ये आणि विशिष्ट
कार्यामध्ये आढळून आला आहे जे स्कीझोफ्रेनियाशी निगडीत आहेत.
आणखी वाचा : Health special: शरीराची वातानुकूलन यंत्रणा बिघडते तेव्हा…
डिमेन्शियामध्ये मस्तिष्काचे(cerebral cortex) आकारमान कमी होते, अल्झायमर डिमेन्शियामध्ये
मेंदूतील पेशींमध्ये Amyloid नावाच्या प्रथिनाच्या पट्ट्या आढळतात, तसेच चेतातंतूंचे(neurofibrillary
tangles) जाळे मोठ्या प्रमाणावर तयार होते. डिप्रेशनमध्ये मेंदूतील सिरोटोनीन, norepinephrine अशा
रसायनांची कमतरता, असंतुलन असते असे सिद्ध झाले आहे. मेंदूतील असे अनेक संरचनात्मक बदल, विशिष्ट कार्यप्रणालीमधील बदल यांमुळे विविध मानसिक प्रक्रिया आणि सामजिक परिस्थिती यांच्या परिणामांना पोषक वातावरण निर्माण होते आणि मानसिक विकार निर्माण होतो.
मानसिक घटकांमध्ये आपला स्वभाव, एखाद्या प्रसंगाला तोंड देण्याची रीत, वैचारिक चौकट(cognitive
framework) ताणताणाव यांचा समावेश होतो. ताणतणावाच्या परिस्थितीला सामोरे जाताना आपण
कोणता मार्ग वापरतो हे फार महत्त्वाचे ठरते. ‘गेल्या काही दिवसांपासून मला वाटतंय की माझ्या
छातीत गाठ झाली आहे. भीतीने गाळण उडाल्येय माझी! काय करू काही सुचत नाही. नुसता ‘कॅन्सर’
असा शब्द जरी मनात आला, तरी छातीत धडधडायला लागते आणि रडू कोसळते!’ कोणी असे
भावनाप्रधान असते, कोणी जणू आपल्याला काही झालेलेच नाही असे ठरवते आणि छातीतल्या
गाठीकडे लक्ष देण्याचे टाळते; तर कोणी ‘सक्रिय’पणेडॉक्टरकडे ताबडतोब जाणे, तपासण्या करून घेणे,
माहिती मिळवणे या मार्गाने याच समस्येचा सामना करते. हे आपल्या सहज लक्षात येईल की या
पैकी कोणाला अतिचिंतेसारखा किंवा डिप्रेशनसारखा आजार होऊ शकतो. एखाद्याची विचारांमध्ये
नकारात्मकता असते. ‘माझ्याच आयुष्यात सतत अडचणींचा डोंगर समोर असतो’ किंवा ‘ कोणाला
माझी किंमतच नाही. त्यामुळे माझ्यावर सतत अन्याय होतो’ अशा प्रकारे स्वतःचे आणि आजूबाजूच्या
लोकांचे, परिस्थितीचे मूल्यांकन करत राहिले तर उदासपण येते, निराशा येते आणि आयुष्यात काही
अर्थ राहिला नाही असे वाटू लागते.
अत्यंत भावनाशील असणे, सतत मनात असुरक्षिततेची भावना असणे असा स्वभावदोष(borderline
personality disorder) असणाऱ्या व्यक्तींमध्ये डिप्रेशन आणि आत्महत्येची प्रवृत्ती जास्त प्रमाणात
आढळते. आर्थिक स्थिती, शैक्षणिक पातळी, लहानपणापासून आलेले प्रतिकूल अनुभव उदा. घरातील
व्यसनाधीनता, कौटुंबिक हिंसा, शारीरिक किंवा लैंगिक शोषण अशा आजूबाजूच्या सामाजिक
परिस्थितीचा मनःस्थितीवर नक्कीच परिणाम होतो आणि मानसिक विकाराची शक्यता वाढते.
‘लहानपणीच मला मावशी तिच्या घरी घेऊन गेली. त्यामुळे माझ्या शिक्षणांची तरी सोय झाली.
आतासुद्धा मनातले काही सांगायचे तर मी माझ्या मावशीकडे जातो, तिच्यापाशी आणि भावापाशी मन
मोकळे करतो, म्हणजे कशाचे टेन्शन येत नाही.’ असे कोणी आपल्याला आधार देणारे असेल तर
आपले मानसिक ताणतणावाला तोंड देण्याचे बळ वाढते. ‘रात्री बेरात्री सुद्धा माझ्या वर्गातल्या मित्रांना
फोन केला ना, तर धावून येतील माझ्या अडीनडीला! म्हणून तर मन निश्चिंत असते. माझ्या आईच्या
शेवटच्या आजारपणात त्या सगळ्यांमुळे तर मी दुःखातून बाहेर पडू शकलो.’ अशी आपल्या मनाभोवती
संरक्षक भिंत(social support) तयार करणारी मंडळी आपल्यासोबत असली की मनोविकाराची शक्यता
कमी होते.
“जयंतच्या आईला पूर्वी डिप्रेशन आले होते. गेल्या काही वर्षांत त्याला किती अडचणी आल्या
आयुष्यात! आईचे जाणे आणि करोनामध्ये नोकरी जाणे एकदमच झाले. त्यातच मुलगा परदेशी गेला,
म्हणजे पुन्हा आर्थिक बोजा! कसा तोंड देणारा बिचारा. स्वभावही तसा भिडस्तच. पूर्वीपासूनच स्वतःला
कमी लेखणारा जयंत. त्याला उदासीनतेचा(depression) त्रास झाला मागच्या वर्षी. पण त्याची पत्नी
चांगली खंबीर आहे. भाऊही मदत करणारा आहे. त्यामुळे उपचार सुरू केल्यावर आता छान बरा
झालाय.पुन्हा टेनिस खेळायला यायला लागला!’
असा हा जैविक, मानसिक आणि सामाजिक घटकांचा एकमेकांशी असलेला दुवा- कधी मानसिक
विकाराच्या दिशेने नेणारा, तर कधी मन अभेद्य बनवणारा!