Healthy Options: सध्या नवरात्रीचे दिवस सुरू असून येत्या काही दिवसांत दसरा, त्यानंतर दिवाळी येईल. या सणासुदीच्या दिवसात उत्साह, आनंदासह विविध पदार्थांचे, मिठाईचे सेवन केले जाते. परंतु, या दिवसात अनेक जण जास्त प्रमाणात आहार घेतात, ज्यामुळे अतिरिक्त वजन वाढणे, पोट फुगण्याची समस्या निर्माण होते. पण, अशावेळी काय करायला हवे? टेलिव्हिजन होस्ट आणि मॉडेल रोशनी चोप्रा यांनी पोषण आणि आरोग्य सल्लागार नेहा सहाया यांच्याशी संपर्क साधला, ज्यांनी काही टिप्स सांगितल्या आहेत.

सणासुदीच्या दिवसात घरी बनवलेली पारंपरिक भारतीय मिठाई निवडायला हवी; जसे की खीर, लाडू आणि हलवा, ड्रायफ्रुट्स आणि तुपापासून बनवलेली मिठाई, ज्याचा आरोग्यावर चांगला परिणाम होईल. तसेच उपाशी पोटी मिठाई खाऊ नये, जेवणानंतर मिठाईचे सेवन करावे.

वजन वाढल्यावर अनेक जण उपवास करतात. परंतु, अशावेळी तुम्हाला उपवास करण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त तुमच्या रात्रीचे जेवण आणि नाश्ता यामध्ये किमान १२ तासांचे अंतर ठेवावे लागेल, यामुळे तुमच्या पचनास मदत होईल असे सहाया यांनी सांगितले.

याला सहमती देताना हैदराबाद येथील ग्लेनेगल्स हॉस्पिटल्सच्या मुख्य आहारतज्ज्ञ डॉ. भावना पी यांनी सांगितले की, सणासुदीच्या काळात मिठाईचा आनंद घेताना संयम आणि खाण्याची योग्य वेळ महत्त्वाची आहे. “मिठाई खाण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे संतुलित जेवणानंतर दुपारी आहे.”

फायबर किंवा प्रथिने जास्त असलेल्या पदार्थांसह मिठाई खाल्ल्यास “रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास” मदत मिळते. “रिकाम्या पोटी मिठाई खाणे टाळा, कारण यामुळे रक्तातील साखरेमध्ये झपाट्याने वाढ होऊ शकते,” असे डॉ. भावना यांनी सांगितले.

“तुमच्या आवडत्या पदार्थांचे कमी प्रमाणात सेवन करा. ड्रायफ्रुट्स, बिया किंवा खजूर, मध यांसारख्या आरोग्यदायी पर्यायांनी बनवलेल्या मिठाईची निवड करा, जे आरोग्यासाठी पौष्टिक ठरतात”, असे डॉ. भावना यांनी सांगितले.

हेही वाचा: केसातील उवा कोणत्या ऋतूमध्ये होतात? त्यांच्यापासून दूर राहण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितला उपाय…

काय लक्षात घ्यावे?

सणासुदीच्या काळात मिठाईचा आनंद घ्या, परंतु संयम राखण्याचे लक्षात ठेवा. संतुलन आणि आरोग्य चांगले राखण्यासाठी शक्य असेल तेव्हा निरोगी पर्याय निवडा.

डॉ. भावना यांनी सांगितले की, मधुमेहासारख्या दीर्घकालीन समस्या असलेल्या लोकांना हे लागू होत नाही, त्यांनी मिठाईचे जास्त सेवन करण्यापूर्वी पोषणतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.