सकाळी लवकर उठणे हे तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी लाभदायक असते. सकाळी लवकर उठल्यामुळे तुम्ही दिवसभर सक्रिय राहता, तुम्ही सतत सतर्क राहता आणि पुढील संपूर्ण दिवसाच्या कामाचे उत्तम व्यवस्थापन करू शकता. तुम्ही दिवसाची सुरुवात लवकर केल्यामुळे तुम्हाला तुमच्या हातातील काम उरकण्यासाठी जास्त वेळ मिळतो. पण काहींसाठी लवकर उठणे म्हणजे दिवसाची सुरुवात सकाळी ५-६ वाजता करणे, तर काही जण त्याआधीच उठतात. पण सकाळी उठण्याची योग्य वळ कोणती, हे तुम्हाला माहीत आहे का? काळजी करू नका, आम्ही तुम्हाला सकाळी केव्हा उठणे आरोग्यासाठी लाभदायक आहे याबाबत माहिती देणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ब्रह्ममुहूर्त म्हणजे नक्की कोणता काळ?

योगप्रशिक्षक जूही कपूर यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी सांगितले की, ती ब्रह्ममुहूर्ताला म्हणजे सकाळी ४.३० वाजता उठते. ब्रह्ममुहूर्त (संस्कृतमध्ये बह्ममुहूर्त म्हणजे ब्रह्माचा काळ) सूर्योदयाआधी एक तास ३६ मिनिटे आधीचा कालवधी असतो. ब्रह्ममुहूर्ताबाबत स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितले, जर सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंतचा काळ म्हणजे रात्र असेल तर रात्रीचा शेवटचा चतुर्थांश म्हणजे ब्रह्ममुहूर्त होय.

स्वतःला घडविण्याची उत्तम वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त

“ब्रह्ममुहूर्त हा काळ म्हणजे पहाटे ३:३० पासून ते पहाटे ५:३० आणि ६:०० पर्यंत किंवा सूर्योदयाच्या कोणत्याही वेळी येऊ शकतो. आपल्याला माहीत आहे की, सूर्योदयाची वेळ ही प्रत्येक ऋतू आणि प्रत्येक भौगोलिक स्थानानुसार भिन्न असते, त्याचप्रमाणे ब्रह्ममुहूर्तदेखील त्यानुसार बदलतो,” असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. कपूर पुढे सांगतात की, “ही निर्मात्याची वेळ आहे आणि म्हणूनच, तुम्ही स्वतःला घडवण्याची वेळ म्हणून ब्रह्ममुहूर्ताकडे पाहू शकता.”

ब्रह्ममुहूर्ताला मानतात पवित्र काळ

याबाबत सहमती दर्शविताना, LYEF वेलनेस सल्लागार आणि BAMS, MD(Ayu) डॉ. लक्ष्मी वर्मा के यांनी सांगितले, “ब्रह्ममुहूर्त हा भारतीय संस्कृतीत सूर्योदयाच्या दीड तास आधीच्या कालावधीसाठी वापरला जाणारा संस्कृत शब्द आहे. हा दिवसाचा पवित्र काळ मानला जातो आणि पारंपरिकपणे योग, ध्यान आणि प्रार्थना यांसारख्या आध्यात्मिक क्रियांसाठी सर्वात शुभ काळ मानला जातो.”

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ‘ब्रह्ममुहूर्त अगदी सोप्या पद्धतीने मोजला जाऊ शकतो; रात्र १४ भागांमध्ये विभागली जाते आणि रात्रीचा शेवटचा भाग म्हणजे ब्रह्ममुहूर्त.’

हेही वाचा : तांब्याची बाटली की मातीचा माठ: कोणत्या भांड्यातून पाणी पिणे आरोग्यासाठी लाभदायक?

ब्रह्ममुहूर्ताला उठण्याचे फायदे काय आहेत?

इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, डॉ. वर्मा यांनी स्पष्ट केले की, “आयुर्वेदानुसार वात, पित्त आणि कफ हे तीनही दोष शरीरात असतात. हे दोष दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी सक्रिय असतात. दिवसाच्या सुरुवातीला, कफ दोष मुख्यत: सक्रिय असतो, दिवसाच्या मध्य काळात पित्त दोष सक्रिय असतो आणि रात्री वातदोष सक्रिय असतो. रात्रीच्या वेळीही हाच प्रकार पाहायला मिळतो. वात दोष हा हालचालींशी संबंधित म्हणून ओळखला जातो आणि हवा आणि अवकाशातील घटकांनी तयार झालेला असतो. हा श्वासोच्छ्वास, रक्तप्रवाह आणि उत्सर्जन (शरीरातून टाकाऊ पदार्थ बाहेर टाकणे) यांसारखी शारीरिक कार्ये तसेच सर्जनशीलता आणि संवाद यांसारखी मानसिक कार्ये नियंत्रित करण्यास मदत करतो. जेव्हा वात संतुलित असतो, तेव्हा एखादी व्यक्ती उत्साही, सर्जनशील आणि अनुकूल असते. म्हणून, जेव्हा वात प्रबळ असेल तेव्हा तुमच्या दिवसाची सुरुवात करणे तुमच्या आरोग्यासाठी चांगले आहे.”

कपूर यांनी सांगितल्याप्रमाणे ब्राह्ममुहूर्तावर उठण्याचे फायदे

  • या वेळी तुमच्या दोन्ही नाकपुड्या सक्रिय असतात. तुम्ही चांगला श्वास घेण्यास सक्षम व्हाल.
  • या घडीला त्रास देणारे कोणीही आसपास नसते म्हणून सर्जनशील पैलूंवर चिंतन आणि कार्य करण्यासाठी ही उत्तम वेळ असते.
  • या वेळी मेलाटोनिनचे नैसर्गिक उत्पादन आणि पाइनल ग्रंथीचा स्राव जास्त असतो.
  • ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी तुमचे मन सक्रिय असते, तुमची इंद्रिये सतर्क असतात.

डॉ. वर्मा पुढे सांगतात, “ब्रह्ममुहूर्ताला उठण्यामुळे पचन आणि चयापचय वाढते, तणाव आणि चिंतेची पातळी कमी होते आणि आध्यात्मिक जागरूकता आणि संपर्क वाढतो.

हेही वाचा : कोकम आहे उन्हाळ्यातील Super Fruit! आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी, जाणून घ्या फायदे

हे फायदे असूनही, इतक्या लवकर उठणे हे अनेकांना अवघड काम वाटू शकते. पण, काळजी करू नका! कपूर यांनी तुमच्यासाठी काही प्रभावी टिप्स सांगितल्या आहेत त्या फॉलो करा.

  • सर्वप्रथम, तुमची झोपण्याची वेळ योग्यरीत्या ठरवा. जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर उठायचे असेल, तर तुम्हाला लवकर झोपणे आवश्यक आहे, रात्री १० वाजेपर्यंत झोपणे तुमच्या शरीराला लवकर उठण्याचे वळण लावण्यासाठी आवश्यक आहे, जे तुम्ही वेळेवर झोपलात तरच शक्य होईल.
  • खोलीत पूर्ण अंधार असणे आवश्यक आहे. हे तुम्हाला गाढ झोपण्यास मदत करेल आणि तुम्हाला ताजेतवाने होऊन उठण्यास मदत करेल, तेही तुमच्या आवडीच्या वेळेनुसार.
  • तुमचा मोबाइल फोन/टीव्ही/टॅब्लेट रात्री नऊ वाजेपर्यंत बाजूला ठेवा.
  • रात्री दीर्घ श्वास घेण्याचा सराव करा जेणेकरून तुम्हाला चांगली झोप लागेल.
  • तुम्हाला कोणत्या वेळी उठण्याची इच्छा आहे ते तुमच्या डायरीत लिहा आणि स्वतःच्या मनात निश्चित करा. स्वतःला वचन द्या- ‘तुम्हाला गजराची गरज नाही,’ असे योगतज्ज्ञ सांगतात.
मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is the right time to wake up in the morning what is brahma muhurta know its benefits from experts snk
Show comments