डॉ. अविनाश सुपे
Health Special निसर्गातील कधीही न संपणारी ऊर्जा म्हणजे सौर ऊर्जा. आपल्या सृष्टीचे अस्तित्वच मुळी सूर्यप्रकाशामुळे आहे. सूर्यप्रकाशामुळे वनसंपत्ती आणि जीवांचे पालन पोषण होते. याच सूर्यप्रकाशाचा आणखी एक फायदा म्हणजेच शरीरात व्हिटॅमिन डी किंवा ड जीवनसत्व तयार होणे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रुग्णालयात काम करणारे माझे एक जवळचे सहकारी काही दिवस आजारी होते. सकाळी उठल्यापासून मध्यरात्रीपर्यंत पूर्ण देशभरातून आलेल्या रुग्णांना मदत करणारे हे माझे सहकारी माझ्या बाजूच्याच खोलीमध्ये काम करत असत. गेले काही दिवस त्यांना अंगदुखी व सांधेदुखी झाल्याने चालायला व बसायला त्रास सुरु झाला. अस्थिव्यंग चिकित्सकाने बघून नेहमीच्या वेदनाशामक गोळ्या लिहून दिल्या . जेव्हा हे दुखणे थांबले नाही तेव्हा पुढील तपास केले. MRI व एक्स रे हे नॉर्मल आले पण कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी अर्थात ड जीवनसत्व हे अत्यंत कमी प्रमाणात होते. दिवसभर एका बंद खोलीमध्ये काम करून अंगावर थोडाही सूर्यप्रकाश न पडल्यामुळे आणि आहारमध्येही त्याचे योग्य सेवन न केल्याने हा त्रास झाला. अश्या प्रकारचा त्रास हल्ली अनेकांमध्ये आढळून येतो. बहुतांश लोक रोज स्वतः सूर्यप्रकाशात चालत नाहीत, त्यामुळे बदलत्या जीवनशैलीमध्ये ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष होते व लोकांना ड जीवनसत्वाची कमतरता सतावते.

हेही वाचा >>>खराब कोलेस्ट्रॉल नसांमधून चिकटू देत नाहीत ‘हे’ ७ पदार्थ; तज्ज्ञ सांगतात, आहारात कसा करावा समावेश?

आपली हाडे मजबूत राहण्यासाठी ड जीवनसत्वाची खूप गरज आहे. तसेच रक्तातील कॅल्शियम व फॉस्फरस यांची पातळी योग्य राखण्यासाठीही ड जीवनसत्वाची आवश्यकता असते. ड जीवनसत्वाच्या कमतरतेने मुलामध्ये मुडदूस (रिकेट्स) हा आजार निर्माण होतो, तर मोठ्या व्यक्तींमध्ये ड जीवनसत्व कमी असल्यास हाडे ठिसूळ व मऊ होतात आणि त्यामुळे त्यांना अस्थिभंग (फ्रॅक्चर) होऊ शकतो. ड जीवनसत्वाच्या अभावी हाडे, दात, केस यांचे आरोग्यही धोक्यात येते. या शिवाय मधुमेह, रक्तदाब, दमा, कर्करोगाचे काही प्रकार, मेंदूचे विकार आदीआजारात देखील ड जीवनसत्व महत्वाची भूमिका बजावत असते.

ड जीवनसत्वाची कमतरता झाल्यास…

१. हृदय विकारामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढत जाते.
२. वयस्क व्यक्तीमध्ये मेंदूतील कार्य प्रणाली बिघडू लागते.
३. लहान मुलांमधील दम्याची तीव्रता वाढते.
४. कर्करोग होण्याची शक्यता वाढते.
५. मधुमेह, रक्तदाब यासारखे आजार लवकर आटोक्यात येत नाहीत.

ड जीवनसत्वाच्या कमतरतेची कारणे

१. ड जीवनसत्व हे प्राणिजन्य पदार्थातच उपलब्ध असते जसे की मासे, कॉड लिव्हर ऑइल, अंड्याचा पिवळा बलक, दूध, गुरांचे यकृत आदी. ज्यांचा आहार पूर्ण शाकाहारी असेल तर त्यांना आहारातून पुरेसे ड जीवनसत्व मिळत नाही.
२. बहुतांशी शरीरे कपड्यांनी झाकल्यामुळे उघड्या अंगावर सूर्यकिरण घेणं व कोवळ्या उन्हात फिरणे शक्य होत नाही. आवश्यक प्रमाणात सूर्यकिरणे त्वचेपर्यंत पोहोचू शकत नाहीत व त्यामुळे ड जीवनसत्व निर्माण होत नाही.
३. भारतीयांची त्वचा गडद रंगाची असल्याने सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने ड जीवनसत्वे तयार होण्याची प्रक्रिया ही संथ असते.
४. वाढत्या वयाबरोबर आपल्या मूत्रपिंडाचे काम कमी होत जाते. त्या मुळे जीवनसत्व अॅक्टिव्ह स्वरूपात कमी होते व त्याची कमतरता जाणवते.
५. आतड्यांच्या काही आजारात (उदा. Crohn’s disease, Cystic fibrosis आदी.)
आतड्याची शोषण क्षमता कमी होते व त्यामुळे आहारातून घेतलेले शरीरात ड जीवनसत्व शोषले जात नाही.
६. अतिस्थूल व्यक्तीमध्ये चरबीच्या पेशी जास्त प्रमाणात असतात व त्या रक्तातील ड जीवनसत्व शोषून घेतात व रक्त प्रवाहात ड जीवनसत्वाची कमतरता जाणवते.

हेही वाचा >>>‘लठ्ठपणा’ आणि ‘मधुमेह’ नियंत्रणासाठी ‘टाइम-रिस्ट्रिक्टेड डाएट’ फायदेशीर? काय सांगतात डॉक्टर, जाणून घ्या

ड जीवनसत्वाची तपासणी

रक्ताच्या तपासणीत 25 Hydroxy Vit D ची पातळी २० ते ५० ng /ml एवढी असावी. ती १२ ng /ml पेक्षा कमी असल्यास ड जीवनसत्वाची कमतरता आहे असे समजावे.

उपाय योजना

१. आहारात दूध, दुधाचे पदार्थ, अंडी, मासे, कॉड लिव्हर ऑइल, अळंबी, अक्रोड, बदाम व ऑलिव्हची फळे यांचा समावेश असावा.
२. कोवळ्या सूर्यप्रकाशात रोज २० मिनिटे तरी फिरावे किंवा बसावे. उघड्या त्वचेवर सूर्यप्रकाश पडणे आवश्यक आहे.
३. ड जीवनसत्वाची कमतरता असल्यास रोज ८०० ते ४००० युनिट्स घ्यावीत. पर्यायी ड जीवनसत्वाची सॅशे किंवा कॅप्सूल्स बाजारात उपलब्ध आहेत, त्यामध्ये ६०००० युनिट्स असतात. सुरुवातील आठवड्यातून एकदा असे आठ आठवडे ती औषधे घ्यावीत. नंतर महिन्यातून एक वेळा असे ६ महिने औषध घ्यावे. आवश्यकतेपेक्षा ड जीवनसत्व अनेक महिने जास्त प्रमाणात सेवन केल्यास ते मूत्रपिंड (किडनी) आणि हृदयाला अपायकारक ठरू शकते. म्हणून व्हिटॅमिन डी हे अधिक काळ घ्यायचे असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is the solution when vitamin d deficiency occurs hldc amy
Show comments