डॉ. किरण नाबर
Health allergy Special कृत्रिम दागिन्यांचा संपर्क त्वचेच्या ज्या भागावर होतो तिथे लालसर पुरळ उठते, त्याला खाज येते हीच ॲलर्जीची सुरुवात असते, हे आपण गेल्या लेखात पाहिले. असे हे दागिने वापरणे सुरू ठेवले तर तो भाग चिघळल्यासारखा होऊन तिथे लस येते, त्वचेचे पापुद्रे निघतात तेव्हा ॲलर्जीने गंभीर रूप धारण केलेले असते. आता या भागात आपण त्यावरील उपाययोजनांबद्दल चर्चा करणार आहोत.
कथिलाची अंतर्गत ॲलर्जी
अन्नविज्ञानामध्ये काही माहिती व गती आहे अशा व्यक्तीच्या मनात या ॲलर्जीच्या अनुषंगाने एक शंका येऊ शकते. अशा धातूच्या निव्वळ स्पर्शाने एवढी ॲलर्जी येत असेल तर ज्या पदार्थांमध्ये कथिलाचा अंश असतो असे अन्नपदार्थ खाऊन काही त्रास होत नसेल का? शंका अगदीच रास्त आहे. ज्यांना कथिलाची ॲलर्जी आहे अशांपैकी काहींना ज्या अन्नपदार्थांमध्ये कथिलाचे प्रमाण जास्त आहे असे अन्नपदार्थ खाल्ल्यास… तळहात किंवा तळपायांवर साबुदाण्याएवढे पाणी भरलेले व खाजणारे फोड येणे, अंगावर लाल पुरळ येणे व त्याला खाज येणे असा त्रास होऊ शकतो. तसेच अशा व्यक्तींना कधी कधी डोके दुखते किंवा अपचन होऊन पोटही दुखू शकते. याला कथिलाची अंतर्गत ॲलर्जी (systemic nickel allergy) असे म्हणतात.
कथिलाच्या (nickel) ॲलर्जीवर उपाय काय?
कुठलीही ॲलर्जी आली की, ती जायचे नाही घेत नाही. त्यामुळे ज्या गोष्टीची ॲलर्जी आहे ती गोष्ट टाळणे हे जास्त संयुक्तिक ठरते. पण मग ज्या मुलींना व स्त्रियांना ॲलर्जी आहे पण तरीही फॅशन ज्वेलरी घालाविशी वाटते त्यांनी काय करावे? त्यासाठी बाजारामध्ये पातळ पारदर्शक रसायने उपलब्ध आहेत (उदा. गेहना पेंट- Gehana paint). हे रसायन अशा दागिन्यांवर ब्रशने लावावे. ते लगेच सुकते व त्या रसायनाची कोणाला ॲलर्जी येत नाही. ते लावल्यामुळे दागिन्यांची हानीही होत नाही किंवा त्यांची चमकही कमी होत नाही. उलटपक्षी त्या रसायनाच्या थरामुळे दागिन्यामधील धातूचा त्वचेशी थेट संपर्कच येत नाही व त्यामुळे ॲलर्जी थांबते.
स्टिरॉईडयुक्त मलम
काही रसायनांसोबत तर एखाद्या वस्तूमध्ये कथिल आहे की नाही हे शोधण्यासाठी चाचणी संच (test kit) देखील उपलब्ध असतो. ज्या व्यक्तींना धातूच्या चष्म्याची ॲलर्जी आहे त्यांनी धातूविरहित (प्लास्टिक, रबर इत्यादी) फ्रेम निवडावी. मोबाईलच्या धातूची ॲलर्जी असल्यास मोबाईलवर रबरी आवरण चढवावे. कपड्यातील धातूच्या बटन व हूक ऐवजी प्लास्टिकचे बटन व हूक वापरावे. घड्याळाच्या धातूच्या पट्ट्याची ॲलर्जी असल्यास प्लास्टिकचा किंवा चामड्याचा पट्टा वापरावा. फॅशन ज्वेलरी वापरून किंवा वर उल्लेख केलेल्या इतर वस्तू वापरून ॲलर्जी आल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. अशा ॲलर्जीवर स्टिरॉईडयुक्त मलम दिले जाते व खाज कमी करण्याच्या गोळ्या दिल्या जातात.
हेही वाचा >>>वजन कमी करताना तुम्ही आवडती पावभाजी खाऊ शकता; फक्त हे बदल करावे लागतील, जाणून घ्या आहारतज्ज्ञ काय सांगतात…
ॲलर्जी तीव्र असल्यास…
ॲलर्जी तीव्र स्वरूपात असल्यास स्टिरॉईडच्या गोळ्याही दिल्या जातात. पण त्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेणे आवश्यक आहे. कधीकधी सोन्याच्या दागिन्यांनीदेखील ॲलर्जी येऊ शकते. २४ कॅरेट सोने हे शुद्ध सोने. पण त्यापेक्षा कमी कॅरेटच्या सोन्यामध्ये काही अंश हा नेहमीच इतर धातूंचा (बहुतांश खेपेस तांबे किंवा चांदी) असतो. अशा मिश्र सोन्याच्या दागिन्यांमुळे देखील ॲलर्जी येऊ शकते. तर क्वचित प्रसंगी शुद्ध सोन्याच्या दागिन्यांनीदेखील ॲलर्जी येऊ शकते. असे दागिने घालायचे असल्यास वर उल्लेख केलेले रसायन लावून मग घालावेत. कथिलाची अंतर्गत ॲलर्जी होत असल्यास अशा व्यक्तींनी ज्या अन्नपदार्थांमध्ये कथिलाचे प्रमाण जास्त आहे ते अन्नपदार्थ टाळावेत किंवा कमी खावेत. ओटस्, गव्हांकुर, अनेक धान्यांनी तयार केलेला पाव (multigrain bread), मासे, कोळंबी, कालवे, शिंपल्या, शेंगदाणे, सोयाबीन, अननस, अंजीर, रासबेरी आणि विविध प्रकारची चॉकलेट्स यामध्ये कथिलाचे प्रमाण जास्त असते.
उपयुक्त प्रतिजैविके
नाक व कान टोचल्यावर तिथे लाल पुळी येऊन गुंतागुंत होऊ नये यासाठी टोचण्यापूर्वीच तो भाग जंतुनाशकाने साफ करून घेणे आवश्यक आहे. तसेच ज्यांना असे आधी झाले असेल त्यांना परत टोचताना कमी ॲलर्जी होणाऱ्या धातूची तार (hypoallergic metal stud) वापरणे आवश्यक आहे. टोचून झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रतिजैविक मलम लावणे आवश्यक आहे. तरीही तिथे लाल दुखरी गाठ आल्यास डॉक्टरांना दाखवून वेळीच तोंडावाटे घ्यायची प्रतिजैविके सुरू करणे आवश्यक असते. गरज पडल्यास डॉक्टर तोंडावटे स्टिरॉईडच्या गोळ्या देखील यासाठी देतात. पण एवढे करूनही जर अशी लाल गाठ कमी होत नसेल तर मात्र ती टोचलेली तार काढून टाकणे आवश्यक ठरते. कान किंवा नाक टोचल्यानंतर जर तिथे किलॉईड तयार झाले असेल तर त्वचारोगतज्ज्ञ त्यामध्ये स्टिरॉईडचे इंजेक्शन देतात. अशी इंजेक्शन्स महिन्याच्या फरकाने अनेक महिने घ्यावी लागतात. जेणेकरून ती किलॉईडची गाठ दबत जाते. ही गाठ शक्यतो शस्त्रक्रियेने काढू नये. तसे केल्यास ती परत वाढते व आधीपेक्षा जास्त मोठी होवू शकते. कान टोचताना चुकून कुर्चा टोचली जाऊन तिथे फोड आल्यास ती तार किंवा तो दागिना काढून टाकावा लागतो, त्याशिवाय ते बरे होत नाही.
थोडक्यात काय तर फॅशन ज्वेलरीची ॲलर्जी असल्यास शुद्ध सोन्याचे दागिने वापरावेत. पण एखाद्या वेळेस फॅशन ज्वेलरी घालावीशी वाटली तर दागिन्यांवर रसायनाचा थर लावून मगच वापरावीत!