Health Special आयुर्वेदानुसार मानवी शरीर हे गोड, आंबट, खारट, तिखट, कडू व तुरट या सहा रसांवर (चवींवर) पोसले आहे आणि स्वाभाविकरित्या शरीराच्या सर्वांगीण पोषणासाठी या सहाही रसांचे सेवन नित्य सेवन करायला हवे. आरोग्य अबाधित राहावे म्हणून माणसाने सहाच्या सहा रसांचे सेवन करणे आवश्यक आहे, म्हणजेच ऋतू कोणताही असला तरी आहारामध्ये गोड, आंबट, खारट, तिखट, कडू व तुरट या सहाही चवींनीयुक्त असा आहार असायला हवा. कारण आयुर्वेदानुसार एकाच रसाचा (चवीचा) आहार अधिक प्रमाणात, सतत सेवन करत राहणे हेच अनारोग्याचे मूळ आहे आणि म्हणूनच स्वस्थ माणसाने निरोगी राहण्यासाठी सहाही रसांचे सेवन करत राहावे. असे असले तरी वेगवेगळ्या ऋतूंमध्ये निसर्गात व शरीरामध्ये होणार्‍या विविध बदलांना अनुसरून आयुर्वेदाने विशिष्ट ऋतूमध्ये विशिष्ट रसाचे (चवीचे) सेवन अधिक करावे असा सल्ला दिलेला आहे, जो अर्थातच त्या- त्या ऋतूला अनुरूप व स्वास्थ्याला पोषक आहे, तर पावसाळ्यात कोणत्या रसाचे सेवन अधिक करावे, कोणी करावे आणि का करावे या विषयीचे आयुर्वेदाचे नेमके मार्गदर्शन समजून घेऊ.

पावसाळ्यामध्ये सेवनयोग्य रस (विविध ग्रंथांनुसार)-

food is suitable to eat during monsoon

पावसाळ्यात गोड-आंबट-खारट की तुरट- कडू- तिखट?

चरकसंहिता या ग्रंथामध्ये वर्षा ऋतूमध्ये आंबट-खारट रसाचे (चवीचे), तर अष्टाङ्गहृदय या ग्रंथामध्ये गोड,आंबट व खारट या तीन चवींच्या आहाराचे सेवन करण्यास सांगितले आहे आणि दुसरीकडे सुश्रुतसंहितेमध्ये तुरट, कडू व तिखट या तीन चवींचा आहार घेण्यास सांगितले आहे. आयुर्वेदाने केलेल्या या परस्परविरोधी मार्गदर्शनाचे स्पष्टीकरण काय? आयुर्वेदाने केलेल्या मार्गदर्शनाचा अर्थ तारतम्याने लावावा लागतो. पावसाळ्यामध्ये कोणत्या रसांचे (चवीचे) सेवन आधिक्याने करावे याविषयी केलेल्या वरील भिन्न- भिन्न मार्गदर्शनामागील तारतम्य समजून घेऊ.

आणखी वाचा-Health Special: पावसाळ्यातला अळू किती पोषक?

पावसाळ्यात गोड- आंबट- खारट कोणासाठी- कधी?

अष्टाङ्गहृदयामध्ये सांगितल्याप्रमाणे पावसाळ्यात गोड, आंबट व खारट चवीचा आहार घ्यावा, हे मार्गदर्शन विशेषतः उपयोगी पडते ते पावसाळ्याच्या आरंभीच्या दिवसांमध्ये. पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये जेव्हा अग्नी मंद झालेला असल्याने भूक धड लागत नाही, जेवावंसं वाटत नाही की बळेच खाल्लं तरी पचत नाही. अशा वेळी आंबट-गोड चवीचे मुरांबे, आंबट-गोड चवीची लोणची जर तोंडी लावली तर जिभेला चव येते, अन्नाची रुची वाढते, अन्न जेवता येते आणि खाल्लेले पचते. पावसाळ्याच्या या दिवसांत कैरी, चिंच, पुदिना यांच्यापासून तयार केलेल्या आंबट-गोड चवीच्या रुचकर चटण्या, आंबट-गोड चवीची सूप्स यांचा केलेला उपयोगसुद्धा भूक वाढवण्यास व पचन सुधारण्यास होतो. आमवातासारख्या संधिविकारांचे, खोकला-दम्याचे रुग्ण, पित्तविकारांनी त्रस्त मंडळी यांनी मात्र आंबट-खारट खाताना दक्ष राहावे; मर्यादेत खावे किंवा टाळावे.

आणखी वाचा-Health Special: पावसाळ्यात कढवून आटवलेले पाणीच का प्यावे?

वातप्रकृतीच्या मंडळींसाठी…

याशिवाय गोड- आंबट- खारट चवीचा आहार सेवन करण्याचे मार्गदर्शन प्रामुख्याने वातप्रकृती व्यक्तींना लागू होते. अशा व्यक्ती या सहसा सडसडीत किंबहुना किडकिडीत, हाडकुळ्या शरीराच्या असतात, त्यांच्या शरीरावर मांस व चरबी अगदी कमी प्रमाणात असते, त्यांच्या सांध्यांवर मांसाचे लेपन नसल्याने सांधे सहज दिसतात, हालचाली करताना सांध्यांमधून कटकट असा आवाज येतो. चपळ-अस्थिर व्यक्तिमत्त्वाच्या, वाचाळ (बडबड्या) स्वभावाच्या, धरसोड- धडपड्या वृत्तीच्या अशा या वातप्रकृती व्यक्तींना हाडे(bones), सांधे(joints), स्नायू(muscles), नसा (nerves) , कंडरा (tendons) संबंधित काही ना काही तक्रारी सतत त्रास देत असतात आणि पावसाळ्याचा ऋतू असताना तर यांचे वातविकार अधिकच बळावतात. त्या वातविकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाताच्या विरोधी असलेले गोड-आंबट व खारट रस खाणे त्यांना हितकर होईल. या वातप्रकृतीच्या व्यक्तींच्या शरीराला अशक्तपणा जाणवू नये व शरीराचे बल वाढावे म्हणून सुद्धा गोड-आंबट व खारट चवीचे पदार्थ उपयुक्त पडतात, कारण हे तीनही रस बलवर्धक आहेत. मात्र गोड म्हणताना सहज पचतील असे गोड पदार्थ अपेक्षित आहेत. साखर, मैदा, मावा, बेसन घालून तयार केलेले पचायला जड असलेले गोड पदार्थ खाणं अपेक्षित नाही, हे कडक ध्यानात ठेवावे.

Story img Loader