Sugar Cravings Causes : रात्रीच्या जेवणानंतर अनेकांना गोड खायला आवडते. बरेच लोक रात्रीच्या जेवणानंतर आइस्क्रीम खायला बाहेर पडतात. तर काही जण खास जेवणानंतर खाण्यासाठी घरी रसगुल्ला, गुलाबजाम, चॉकलेट असे पदार्थ आणून ठेवतात. पण, ही सवय आपल्या आरोग्यासाठी चांगली नसते. त्यामुळे तु्म्हालाही अशा प्रकारे गोड खाण्याची सवय असेल, तर ती आजच थांबवा. कारण- त्यामुळे तुमच्या शरीरावर नेमके काय परिणाम होतात हे आपण जाणून घेऊ…
रात्रीच्या जेवणानंतर गोड खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी आणि चयापचय क्रियेवर कसा परिणाम होतो?
या विषयावर दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ म्हणाले की, जेव्हा तुम्ही गोड पदार्थ खाता, तेव्हा तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते कारण- ग्लुकोज रक्तप्रवाहात जाते, ज्यामुळे ही वाढ नियंत्रित करण्यासाठी इन्सुलिनचा स्राव होण्यास सुरुवात होते. रात्रीच्या वेळी चयापचय क्रिया मंदावते. त्यामुळे शरीराची साखरेची पातळी हाताळण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात कमी होते. रक्तात साखरेची पातळी वाढताच शरीराच्या हायपोग्लायसेमियात घट होते. त्यामुळे झोपेचा त्रास होऊ शकतो आणि सकाळी थकवा जाणवू शकतो.
रात्रीच्या जेवणानंतर साखरेचे किंवा गोड पदार्थांचे सेवन केल्याने शरीराच्या सेल्युलर आणि हार्मोनल पातळीवर परिणाम होतो. त्यामुळे शरीराला इतर गोष्टी सोडून ग्लुकोज चयापचयावर लक्ष केंद्रित करावे लागते. एका अभ्यासातून असे दिसून आले की, रात्री उशिरा गोड पदार्थांचे सेवन केल्याने इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी कमी होते. त्यामुळे चयापचय विकारांचा धोका वाढतो. रात्री उशिरा जास्त साखरयुक्त पदार्थ खाल्ल्याने त्याचे चरबीत रूपांतर होते, ज्यामुळे वजन वाढते.
रात्री उशिरा गोड पदार्थ खाल्ल्याने झोपेची गुणवत्ता आणि एकूणच विश्रांती यांवर कोणते दुष्परिणाम होतात?
रात्रीच्या वेळी गोड पदार्थ खाल्ल्याने झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. त्यामुळे शरीरास पुरेशी विश्रांती मिळत नाही. कारण- त्यामुळे हार्मोनल आणि चयापचय क्रिया बाधित होते. साखरेच्या सेवनाने झोपेचे नियमन करणारे हार्मोन मेलाटोनिनवर दबाव निर्माण होतो. त्याच वेळी कॉर्टिसोल हार्मोनमध्ये वाढ होते. हा हार्मोन तणावास कारणीभूत ठरतो. त्याचा तुमच्या झोप, विश्रांतीवर वाईट परिणाम होतो.
याव्यतिरिक्त डॉ. हिरेमठ यांनी म्हटले की, रक्तातील साखरेची पातळीत अचानक झालेली वाढ आणि घट यांमळे तुमच्या झोपेवर दुष्परिणाम होतो. अचानकपणे साखरेच्या पातळीत वाढ झाल्याने शरीरास ऊर्जा मिळते; पण यामुळे अस्वस्थताही जाणवू शकते. अशा वेळी साखरेची पातळी कमी करणे कठीण होते.
कालांतराने रात्रीच्या वेळी नियमित साखरेचे सेवन केल्याने निद्रानाश आणि स्लीप अॅप्नियासह विशेषतः वजन वाढणे आणि चयापचय क्रिया विस्कळित झाल्याने झोपेसंबंधित आजारांचा धोका वाढू शकतो.
रात्रीच्या जेवणानंतर नियमितपणे गोड पदार्थ खाल्ल्याने होणारे आजार
रात्रीच्या जेवणानंतर नियमितपणे गोड पदार्थ खाल्ल्याने गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो. विशेषत: ज्यांना मधुमेह आहे, त्यांच्यासाठी असे करणे अधिक धोकादायक ठरू शकते. मधुमेहाचे रुग्ण जर रात्रीच्या वेळी काही गोड पदार्थ खात असतील, तर त्यांच्या शरीरातील इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी हार्मोनमध्ये वाढ होते. त्यामुळे दीर्घकाळपर्यंत रक्तातील साखरेची पातळी वाढते. अशा परिस्थितीत न्यूरोपॅथी, रेटिनो पॅथी आणि किडनीसंबंधित आजारांचा धोका वाढतो, असे डॉ. हिरेमठ यांनी सांगितले.
रात्रीच्या वेळी जास्त गोड खाल्ल्याने शरीरात फॅट्स वाढू लागतात. अशाने वजन वाढण्याची समस्या वाढते. तसेच इन्सुलिन रेजिस्टन्समध्ये अडथळा निर्माण होतो. टाईप २ चा मधुमेह होण्यामागेही हेच प्रमुख घटक कारणीभूत असतात.
रात्रीच्या वेळी गोड पदार्थ खाल्ल्याने जळजळ आणि धमन्यांचे नुकसानदेखील होऊ शकते आणि त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. पण रोज अशा प्रकारे तुम्ही गोड पदार्थ खात असाल, तर घ्रेलिन व लेप्टिन यांसारख्या भूक नियंत्रित करणाऱ्या हार्मोन्सवरही परिणाम होतो. त्यामुळे अति खाण्याची लालसा वाढवते, असे डॉ. हिरेमठ म्हणतात.
रात्री उशिरा गोड पदार्थ खाण्याची लालसा कमी करण्यासाठी करा ‘हे’ उपाय
रात्री उशिरा गोड पदार्थ खाण्याची सवय रोखण्याबाबत डॉ. हिरेमठ यांनी म्हटले की, पौष्टिक पदार्थ खाण्यावर भर द्या. तसेच, आरोग्यदायी पर्याय आणि वर्तणूक पद्धतीवर लक्ष केंद्रित करा.
शरीरास मॅग्नेशियम किंवा क्रोमियमसारखे पोषक घटक मिळतील अशा पदार्थांचे सेवन करा. त्यासाठी तुम्ही आहारात पालेभाज्या, शेंगदाणे आणि तृणधान्याचा समावेश करू शकता.
कर्बोदक संयुगे, प्रथिने व आरोग्यदायी चरबीयुक्त पदार्थांचा रात्रीच्या आहारात समावेश केल्याने खाण्याची लालसा टाळता येऊ शकते आणि तुम्हाला रात्रभर पोट भरल्यासारखे वाटते.
आठवड्यातून एक दिवस मद्यप्राशन करणाऱ्यांचे यकृत आतून कसे दिसते? पाहा फोटो , डॉक्टर म्हणाले…
तुम्हाला रात्रीच्या वेळी गोड खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही इतर गोड पदार्थ खाण्यापेक्षा तुम्ही फळे, डार्क चॉकलेटचा एक तुकडा, एक चमचा मधासह दही अशा आरोग्यदायी पदार्थांचा पर्याय तुम्ही निवडू शकता.
कॅमोमाइल किंवा दालचिनीसारख्या हर्बल टीसारख्या पर्यायानेदेखील तुमची गोड खाण्याची इच्छा काही प्रमाणात का होईना कमी होईल. अशा वेळी शरीर हायड्रेटेड ठेवणे महत्त्वाचे आहे.
खाण्याची लालसा कमी करण्यासाठी तुम्ही व्यायाम, वाचन अशा गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. त्यामुळे तुमचे खाण्याकडे तितकेसे लक्ष जाणार नाही. गोड पदार्थ खाण्यापासून स्वत:ला रोखण्यासाठी आरोग्यदायी पर्याय निवडा.
तुम्हाला गोड खाण्याचा आनंद घ्यायचा असेल, तर दिवसाच्या सुरुवातीला गोड पदार्थ खा. कारण- यावेळी तुमची चयापचय क्रिया अधिक सक्रिय असते. तसेच शरीरात साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी तुम्ही प्रोटीनयुक्त पदार्थांसह गोड पदार्थ खा, असेही डॉ. हिरेमठ म्हणाले.