शौच केल्यानंतर वैयक्तिक स्वच्छतेसाठी आधुनिक जगामध्ये जेट स्प्रेचा उपयोग केला जातो, ही आता नवीन गोष्ट नाही. बसल्या जागेवर करावयाची ही स्वच्छता तशी सुविधाजनक व एका दृष्टीने आरोग्यास उपकारकच म्हणायला हवी. जेट स्प्रे वापरताना  हातांचा गुदभागाला थेट स्पर्श होत नाही व त्यामुळे संभाव्य आरोग्य धोके टळतात. असे असले तरी या जेट स्प्रेचा सुद्धा आरोग्याला एक धोका संभवतो!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुदभाग हे आयुर्वेदाने एक मर्म सांगितले आहे. मर्म म्हणजे शरीराचा असा भाग जो तुलनेने नाजूक आहे. ज्यावर मांसाचे वा हाडाचे आवरण नसल्याने रक्तवाहिन्या वा नसा तुलनेने त्वचेच्या जवळ व असुरक्षित असतात आणि साहजिकच तिथे इजा होणे कटाक्षाने टाळले पाहिजे. गुदासारख्या अशा नाजूक भागावर ज्याच्या नावामध्येच जेट आहे अशा स्प्रेमधून वेगाने येणार्‍या पाण्याचा फवारा आदळणे योग्य होईल काय? तो थंड पाण्याचा मारा त्या नाजूक भागाला बाधक होत असेल काय? तशी शक्यता आहे व तसे अनुभवही आहेत. त्यातही विशेषतः थंडीमध्ये जेव्हा वातावरणातल्या गारव्यामुळे पाणी थंडगार होते, कोरड्या हवेमुळे गुदभाग अधिकच कोरडा व हुळहुळा झालेला असतो; तेव्हा थंड पाण्याचा जेट स्प्रे अधिकच त्रासदायक होऊ शकतो. त्यातही ज्या व्यक्ती पित्त प्रकृतीच्या अर्थात कोमल शरीराच्या असतात, ज्यांच्या सर्व अवयवांमध्ये तुलनेने उष्ण रक्ताचा संचार अधिक असतो त्यांना हा जेट स्प्रेचा फवारा तिथल्या लहानशा रक्तवाहिन्यांना इजा करण्याची व गुदभागी सूज निर्माण करण्याची शक्यता असते, तर वातप्रकृतीच्या कृश-सडसडीत शरीराच्या मंडळींमध्ये गुदभागी जात्याच असणारा थंडावा व कोरडेपणा थंड पाण्याच्या वेगवान फवार्‍यामुळे अधिकच वाढून गुदविकारांना कारणीभूत होऊ शकतो.

हेही वाचा…Health Special: पालकत्वाची शिकवणी

सहसा चांगल्या दर्जाचा जेट स्प्रे नवीन असतो, तोवर त्यामधून पाण्याचा फवारा हवा तसा व्यवस्थित येत असतो. मात्र कालांतराने  जेट स्प्रेची काही छिद्रे मातीच्या सूक्ष्म कणांनी वगैरे बुजतात , तेव्हा पाण्याचा फवारा योग्य येत नाहीये,  या विचाराने तुम्ही पाण्याचा वेग वाढवता. तेव्हा आहेत त्या छिद्रांमधून पाणी अतिशय वेगाने येऊन तुमच्या गुदभागावर आदळते. काही काही जेट स्प्रे तर गुदावर असा तीक्ष्ण मारा करतात की पाणी असूनही ते टोचते. असे वारंवार होत राहिले तर गुदाला इजा होऊन तिथे सूज येणे, तिथल्या लहानशा शिरा फुगून वर येणे(पाईल्स), त्या शिरा फ़ुटून त्यामधून रक्तस्त्राव होणे, गुदभाग थंड व कोरडा होऊन त्याला चिरा पडणे( फिशर्स) असे त्रास संभवतात.

हेही वाचा…Health Special : बसणं सोडा, ‘या’ गोष्टी करा आणि ठेवा स्वत:ला क्रियाशील

२१ व्या शतकामध्ये तुम्हा आम्हांला त्रस्त करणार्‍या गुदविकारांमागे गार पाण्याचा वेगवान स्पर्श हे सुद्धा कारण असू शकते, हे  लिहीले आहे, ईसवीसनापूर्वी निदान १५०० वर्षे इतक्या प्राचीन काळामध्ये लिहिलेल्या सुश्रुत संहितेमध्ये. तुम्ही म्हणाल मग काय जेट स्प्रेचा उपयोग बंद करु? नाही, थोडी काळजी घ्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेट स्प्रेमधून बाहेर पडणारे पाणी हलक्या वेगाने येईल, जेणेकरुन  हळूवारपणे गुदाची स्वच्छता होईल अशी योजना करा. जेट स्प्रेची दर महिन्याला स्वच्छता करुन त्याची छिद्रे बुजू देऊ नका. जेट स्प्रेमधून कोमट पाणी आले तर उत्तम, नाहीच तर आठवड्यातून एकदा कोमट पाण्यात बसून शेक घ्या. गुदभागाला रात्री झोपताना तेल, तूप, लोणी वगैरे लावा. भल्याभल्यांना रडवणार्‍या गुदविकाराला प्रतिबंध करण्यासाठी हे उपाय पुरेसे आहेत.  

हेही वाचा…Health Special : हिवाळ्यात वातप्रकोप होण्याची शक्यता का असते?

आधुनिक तंत्रज्ञान वेळ वाचवणारं, वेगवान आणि सोयीचं असतं पण त्याची एक दुसरी बाजूही असते. त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What precautions need to be taken while using toilet jet spray hldc psg