Health Special: शरद ऋतू हा पावसाळ्यानंतर सुरू होणारे उष्म्याचे दिवस अर्थात आपण ज्याला बोली भाषेमध्ये ऑक्टोबर हिट म्हणतो ते दिवस. पावसाळ्याचा म्हणजेच वर्षा ऋतूचा अंत करणारा या अर्थाने शरद ऋतूला ’वर्षावसानः’ असे संबोधले आहे.
पावसाळ्यात आकाश काळ्याशार ढगांनी झाकलेले असते. वातावरण थंड व ओलसर झालेले असते. सूर्य सहसा दिसत नाही. सूर्याचे अधुनमधून दर्शन होते, मात्र ते तात्पुरते. पावसाळ्यानंतर जेव्हा सूर्य दिसू लागतो व सूर्याची किरणे हळूहळू तीव्र होऊ लागतात, ती या शरद ऋतुमध्येच. पावसाळ्यात दाटून येणार्या ढगांना दिसेनासे करणारा या अर्थाने शरद ऋतूला ’मेघान्त, घनात्यय’ अशीही नावे देण्यात आलेली आहेत. या दिवसांत सूर्याची किरणे पृथ्वीवर पडू लागतात, जी पावसाळ्यातल्या थंड-ओलसर वातावरणाला सरावलेल्या शरीरांना सुरुवातीला सहन होत नाहीत. पावसाळ्याला थंडावा व ओलावा संपून शरद ऋतू सुरु होतो आणि म्हणूनच या ऋतूला पावसाळा संपवणारा म्हणून ’प्रावृडात्यय’ असेही नाव दिलेले आहे. थोडक्यात काय तर शरद म्हणजे पावसाळ्यानंतरचा उष्मा. परंतु हा मे महिन्यातल्या ग्रीष्मासारखा कडक उन्हाळ्याचा उष्ण ऋतू नाही आणि त्याचमुळे याला आयुर्वेदाने ना उष्ण ना शीत असा ’साधारण ऋतू’ म्हटले आहे.
हेही वाचा – पित्ताशयातील खडे शस्त्रक्रियेशिवाय नैसर्गिकरित्या काढता येतात का? वाचा डॉक्टरांचे मत
पावसाळ्यासारख्या थंड व ओलसर ऋतूनंतर थेट हेमंतातला हिवाळा आला असता तर लागोपाठचे दोन थंड वातावरणाचे ऋतू सजीवसृष्टीला अनुरूप झाले नसते याच विचाराने कदाचित निसर्गाने शरदासारखा उष्ण ऋतू वर्षा आणि हेमंत या दोन ऋतूंच्यामध्ये योजिला असावा. दुर्दैवाने आजच्या २१व्या शतकात मानवनिर्मित प्रदूषणाच्या राक्षसाने कालचक्राला हलवले असल्याने पावसाळ्यानंतर येणारा शरदऋतू हा सुखावह न होता ग्रीष्मासारखाच उन्हाळ्याचा जाणवू लागलेला आहे. त्यात वातावरणात होणारा हा बदल अकस्मात होत असेल (जो हल्ली प्रकर्षाने अनुभवास येतो आहे) तर तो रोगांना आमंत्रण देऊ शकतो. ’ऋतूमध्ये होणारा अकस्मात बदल’ हे काश्यपसंहितेने शरीर-संचालक वात-पित्त-कफ या तीन दोषांमध्ये विकृती होण्याचे एक महत्त्वाचे कारण सांगितले आहे आणि ते आयुष्य क्षीण करण्यास कारणीभूत होते असेही म्हटले आहे. याचे कारण समजून घेऊ.
अकस्मात बदल अनुकूल नसतो
पावसाळ्यातल्या थंड व ओलसर वातावरणाला अनुरूप दिनचर्या तुम्ही अनुसरता त्यामध्ये उष्ण आहार-विहाराचा स्वीकार करता. पिण्यासाठी गरम पाणी, आंघोळीसाठी गरम पाणी, आले-सुंठ-दालचिनी-गवती चहा वगैरे गरम मसाल्याचे पदार्थ टाकून बनवलेला चहा आणि आहारामध्ये तिखट (उष्ण) चवीच्या आहाराला प्राधान्य जे पावसाळ्याला काही प्रमाणात अनुरूप होते व वर्षा ऋतूमध्ये होणार्या वातप्रकोपाला नियंत्रणात ठेवण्यास साहाय्यक ठरते. अर्थात असे करताना तो उष्ण आहार-विहार पावसाळ्यात शरीरामध्ये जमणार्या पित्ताला (पित्तसंचयाला) अजूनच वाढवणार नाही याची काळजी घ्यावी लागते, विशेषतः पित्तप्रकृती व्यक्तींना तर पावसाळ्याला अनुरूप असा हा उष्ण आहार-विहार अचानक शरद ऋतूचा उष्मा सुरु झाला म्हणून तुम्ही थांबवता आणि लगेच शीत (थंड) आहार-विहार स्वीकारु पाहता. आहार-विहारामध्ये केलेला हा अकस्मात बदल हा शरीराला सात्म्य (आरोग्याला अनुकूल) होत नाही.
गोंधळ आणि असमतोल
पावसाळ्यात शरीराने त्या ओलसर-गार वातावरणाला अनुकूल बनवलेली यंत्रणा अकस्मात वातावरण उष्ण झाले म्हणून आता शरीर त्या उष्म्याचा सामना कसा करायचा, काय बदल करायचे या प्रयत्नात आणि त्याचवेळी तुम्ही थंड पाणी, थंड पेयं, थंड पाण्याची आंघोळ, थंड हवा याचा स्वीकार करता. या स्थितीमध्ये शरीराला समजत नाही, नेमकं काय करायचं? उष्म्याचा सामना करायचा की थंडाव्याचा या गोंधळात पडलेल्या शरीराच्या दोन विविध यंत्रणांचा (सिस्टीम्सचा) हा गोंधळ व असमतोल व्यक्त होतो तो वेगवेगळ्या लक्षणांच्या स्वरुपात. नाक वाहणे, शिंका, घसादुखी, थंडीताप, खोकला, भूक न लागणे, अपचन, पोटाच्या समस्या, सांधे धरणे, अशक्तपणा, वगैरे लहानसहान आजारांनी लोक ग्रस्त होतात ते याच ऋतू संधीकाळामध्ये म्हणजेच पावसाळा संपून शरदातले ऑक्टोबर हिटचे दिवस सुरु होतानाच्या दिवसांमध्ये.
हेही वाचा – सणासुदीच्या दिवसात मिठाईचे सेवन करण्याची योग्य वेळ कोणती? तज्ज्ञांचे मत जाणून घ्या..
होतं असं की ऋतूनुसार होणारा वातावरणात बदल हा तुमचा अग्नी विकृत करण्यास कारणीभूत होतो. अग्नी विकृती म्हणजे भूक, पचन, चयापचय, रोगप्रतिकारक्षमता वगैरे शरीराच्या सर्वच यंत्रणांमध्ये बिघाड. महत्त्वाचं म्हणजे वातावरणात होणारा बदल हा रोगजंतूंच्या (त्यातही विषाणूंच्या वाढीस व प्रसारास) अनुकूल होतो. त्यात पुन्हा काल-परवापर्यंत पावसाचे काळे-ओलसर-थंड वातावरण अशी स्थिती आणि अकस्मात लख्ख प्रकाश पडून घाम काढणारा उष्मा सुरु ही अचानक बदलणारी स्थिती रोगजंतूंना अधिक भावते. त्यात अधिक तुम्ही वर म्हटल्याप्रमाणे आपल्या आहार-विहारामध्ये अकस्मात बदल करता तो त्या रोगजंतूंना शरीरामध्ये शिरण्यास व संख्या वाढवण्यास अनुकूल होतो. प्रत्यक्षातही रुग्ण पाहताना ज्याने आपल्या आहार-विहारात बदल केला होता तेच सहसा रोगग्रस्त झाल्याचे या ऋतू संधीकाळात दिसते. मतितार्थ हाच की पावसाळा संपून उष्मा सुरु झाला म्हणून लगेच थंड पाणी, एसी, थंड पाण्याची आंघोळ, थंड पेयं, दही-ताक यांची सुरुवात करु नका. आपल्या आहार-विहारामध्ये हळूहळू बदल करा, शरीराला नवीन वातावरणाची सवय होऊ द्या. ऋतूसंधीकाळात हलका आहार घ्या. शेवटी आरोग्य सांभाळणे तुमच्याच हातात आहे.