What to do if you have a heart attack: गेल्या काही वर्षांमध्ये आधुनिक जीवनशैलीमुळे सर्वच स्तरांमधील लोकांच्या आयुष्यात मोठे बदल झालेले दिसून येतात. त्यामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, लठ्ठपणा असे अनेक आजार सर्वच वयोगटांतील लोकांमध्ये वाढल्याचेल दिसत आहेत. आजकालची धावपळीची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी यांमुळे हृदयविकाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. माणसाच्या अशा बऱ्याच चुकीच्या सवयी असतात, ज्या हृदयाच्या रोगास कारणीभूत ठरतात. पण विचार करा, तुम्ही एकटे असताना तुम्हाला हृदयविकाराचा झटका आल्यास तुम्ही काय करायला हवं याबाबत तुम्हाला काही माहिती आहे का? याच विषयावर गुरुग्राम येथील फोर्टिस हार्ट अँड व्हॅस्क्युलर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. टी. एस. क्लेर यांनी माहिती दिल्याचे वृत्त दी इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ…

डॉ. टी. एस. क्लेर सांगतात, हृदयविकाराचा झटका येण्याआधी रुग्णाला छातीत दडपण किंवा वेदना जाणवतात. काहींना छातीमध्ये जळजळ, दडपण, झिणझिण्या किंवा जडपणा वाटतो. त्यासोबतच वेदना खांदे, हात किंवा जबड्यापर्यंत पोहोचू शकतात. विशेषतः डावा खांदा आणि हात दुखणे हे हृदयविकाराच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक आहे. तुम्हाला मळमळ, थकवा, चिंता आणि जलद किंवा अनियमित हृदयाचे ठोके जाणवू शकतात. जर वारंवार अशी लक्षणे जाणवत असतील, तर घाबरू नका, आराम करा आणि तुमच्या जिभेखाली सॉर्बिट्रेट (५ ते १० मिग्रॅ) घ्या. जर तुम्हाला अस्वस्थतेपासून आराम मिळाला, तर तुम्हाला हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होऊ शकेल.

तुम्ही शक्य तितक्या लवकर कोणतीही मानक अ‍ॅस्पिरिन टॅबलेट (३०० मिग्रॅ.), क्लोपीडोग्रेल (३०० मिग्रॅ.) व अ‍ॅटोरवास्टॅटिन (८० मिग्रॅ.) घेऊ शकता आणि नंतर ईसीजीसाठी जवळच्या रुग्णालयात जाऊ शकता. जरी तुम्हाला हृदयविकाराचा त्रास होत नसला तरी या सर्व गोळ्या घेणे सुरक्षित आहे आणि आपत्कालीन परिस्थितीत त्यामुळे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत. हृदयविकाराचा झटका येण्याची लक्षणे दिसू लागल्यानंतर ३० मिनिटांच्या आत अ‍ॅस्पिरिन चघळल्याने प्लेटलेट्स एकत्रीकरण रोखले जाते आणि रक्ताच्या गुठळ्या तयार होण्यास विलंब होतो.

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर घाबरल्याने त्याचा शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. अशा वेळी स्थिर राहण्यासाठी जमिनीवर स्वस्थपणे झोपून जावे आणि पायांच्या खाली उशी ठेवावी. असे करत असताना हळूहळू श्वास घ्यावा. उघडलेली खिडकी, पंखा, एसी यांच्यासमोर झोपणे अधिक फायदेशीर ठरू शकते. हा उपाय केल्याने हृदयापर्यंत योग्य प्रमाणात ऑक्सिजन पोहोचेल.

तुम्ही आटोक्यात आले की, तुम्हाला जवळच्या रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका सेवेला कॉल करा. तुमची लक्षणे सौम्य आणि सूक्ष्म असली तरीही याकडे दुर्लक्ष करू नका. काय चूक आहे हे ओळखण्यासाठी मूलभूत ईसीजी करा.

जर तुम्ही एकटे असाल आणि हृदयविकाराचा झटका आला आहे, असे तुम्हाला वाटत असेल, तर आजूबाजूला असलेल्या लोकांची मदत घ्या. मित्र-नातेवाईक जे तुमच्या जवळचे आहात, अशा लोकांना फोन करा. अशा वेळी रुग्णवाहिकेला फोन करणे योग्य ठरू शकते.