फुफ्फुसाचा कर्करोग हे जागतिक स्तरावर मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे. जर्नल ऑफ थोरॅसिक ऑन्कोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, भारतातील आरोग्यसेवेतील हा एक चिंतेचा विषय आहे. ज्याचे प्रमाण सर्व कर्करोगांपैकी ५.९ टक्के आणि कर्करोगाशी संबंधित मृत्यूंपैकी ८.१ टक्के इतके आहे. डॉ. केवीवीआर लक्ष्मी, एमडी आणि सीनियर सल्लागार बायोकेमिस्ट्री, ट्रस्टलॅब डायग्नोस्टिक्स यांच्या मते, फुफ्फुसाचा कर्करोगापासून बचाव करण्यासाठी त्यावरती सुरुवातीच्या अवस्थेमध्ये उपाय करणे आवश्यक आहे. तसेच तो सुरुवातीलाच जाणून घेणे महत्वाचे आहे, कारण ज्या रुग्णांना सुरुवातीला फुफ्फुसाचा कर्करोग होतो, तो बरा होण्याचा दर ८० ते ९० टक्के इतका असतो. सुरुवातीच्या तपासणीचा मुख्य फायदा म्हणजे फुफ्फुसाच्या कर्करोगाने मृत्यूची शक्यता कमी होऊ शकते असंही डॉक्टर म्हणाले.
तज्ज्ञांच्या मते, अशा काही चाचण्या आहेत ज्या फुफ्फुसाचा कर्करोग लवकरात लवकर शोधण्यात मदत करतात. डॉ लक्ष्मी सांगतात. फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लवकर निदान करण्यासाठी कमी डोस असलेल्या सीटी (एलडीसीटी) आणि छातीचा एक्स-रेसह स्क्रीनिंग चाचणी उपयुक्त ठरु शकते. विशेषत: त्यांच्यासाठी जे सतत धूम्रपान करतात किंवा याआधी करायचे अशा लोकांसाठी. तसेच त्यांनी सांगितले की, या स्क्रीनिंग टेस्ट प्रभावी असल्या तरी सर्व फुफ्फुसाच्या कर्करोगाचा शोध घेऊ शकत नाहीत आणि आढळून आलेले सर्व कर्करोग प्रारंभिक अवस्थेत असतील असेही नाही.
तज्ज्ञ सांगतात की, नियमित रक्त चाचण्या फुफ्फुसाचा कर्करोग शोधू शकत नाहीत, परंतु फुफ्फुसाच्या कर्करोगाचे आधीच निदान झालेल्या लोकांमध्ये अनुवांशिकता आहे का नाही हे ओळखण्यासाठी त्याचा वापर होऊ शकतो. फुफ्फुसाच्या कर्करोगासाठी तपासले जाणारे सर्वात सामान्य अनुवांशिक बदल EGFR, KRAS आणि ALK जनुकांमध्ये असतात. कर्करोगाच्या निश्चित निदानासाठी, ट्यूमर मार्कर एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो.
हे ट्यूमर टिश्यूमध्ये आढळतात आणि बायोप्सी नावाच्या सामान्य साधनाद्वारे ते प्राप्त केले जातात. फुफ्फुसाच्या कर्करोगाचा संशय असलेल्या रुग्ण ओळखण्यासाठी कोणतेही प्रमाण ट्यूमर मार्कर नसले तरी, संशयित प्रकरणांमध्ये ते लक्षणीय संवेदनशीलता दाखवण्याची शक्यता असते. फुफ्फुसाच्या कर्करोगाचे पाच ट्यूमर मार्कर असतात. ज्यामध्ये प्रो-गॅस्ट्रिन रिलीझिंग पेप्टाइड्स (PGRP), न्यूरॉन स्पेसिफिक एनोलेस (NSE), स्क्वॅमस सेल कार्सिनोमा प्रतिजन (SCCA), सायटोकेराटिन 19 (cyFRA 21-1) चे विरघळणारे तुकडे आणि कार्सिनोमा भ्रूण प्रतिजन (CEA) यांचा समावेश आहे.
फुफ्फुसाचा कर्करोग कसा टाळावा –
डॉ. लक्ष्मी यांनी फुफ्फुसाचा कर्करोग रोखण्यासाठी आरोग्यदायी सवयींचे महत्व पटवून दिले आहे. त्या सांगतात, धुम्रपान न करणे, कामाच्या ठिकाणी जोखीम घटकांचा संपर्क कमी करणे आणि नियमित व्यायाम करून किंवा योगासने करून वजन संतुलित ठेवणं गरजेचं आहे. सिगारेट ओढणे हा फुफ्फुसाच्या कर्करोग होण्यास मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरणारा घटक आहे, तसेच दैनंदिन काही सवयी पाळल्यास सर्व कर्करोगांपैकी १/३ ते १/२ टाळता येऊ शकतात. तसेच फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी चालणे, धावणे किंवा दोरीवर उड्या मारणे यासारख्या एरोबिक हालचाली असा व्यायाम सर्वोत्तम आहेत. जो तुमचे हृदय आणि फुफ्फुसांना योग्य कार्य करण्यासाठी आवश्यक ती मदत करतात असंही लक्ष्मी यांनी सांगितलं.