Summer Dos and Don’ts औषधाविना उपचार मे महिन्यात अनेक तरुण उत्साही मंडळी विविध ठिकाणी पर्यटनाला काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, आपापल्या बजेट व सोयीप्रमाणे प्लान आखत असतात. दिवसेंदिवस भारतात सर्वत्र पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे व लहानमोठी शहरे, उपनगरातील गटार पाणी सर्वच नद्या, नाले, ओढे, तळी या जलसाठ्यांना अतिदूषित करत आहे. माझ्याकडे कैलास मानससरोवर, काश्मीर ट्रिप, राजस्थानातील वाळवंटी प्रदेश, आंध्रातील कर्दळीवन, केरळमधील किंवा तामिळनाडूतील चेन्नई, मदुराई किंवा आग्रा, मथुरा येथे जातात. ‘नागरमोथा चूर्णाची मदत घेऊ का?’ असे रुग्णमित्र नेहमीच विचारत असतात. उकळलेल्या पाण्यानंतर सुरक्षित पाणी क्रमांक दोन म्हणून ‘नागरमोथायुक्त पाण्याचा’ नंबर लागतो हे मला इथे ठासून सांगावेसे वाटते. त्याकरिता अशा टुरिस्ट मंडळींनी शंकास्पद ठिकाणी पाणी पिण्याचा प्रश्न आल्यानंतर नागरमोथा चूर्णाची मदत अवश्य घ्यावी हे सांगावयास नकोच.
पोहण्याचा सर्वोत्तम पर्याय
‘सुसंगती सदा घडो’. या दहा महिन्यांच्या शाळांच्या बंधनातून घरोघरी बाळगोपाळ मंडळी मे महिन्यात खूप खूप धम्माल उडविण्याचे प्लान करत असतात. काही मुले सकाळचे वा रात्रीचे आकाशदर्शन; ग्रह-तारे यांचे निरीक्षण असे सकारात्मक छंदच जोपासत असतात. काही बाबा लोक जवळपास असलेल्या जलतरण तलावात पोहणे शिकणे, डुंबण्याचा मस्त मस्त आनंद घेत असतात. उन्हाळ्यामध्ये पोहणेव्यतिरिक्त इतर व्यायाम टाळता आले व विविध तलावांत सूर मारणे, मुटका किंवा नदीनाल्यात डुंबणे अशा व्यायाम प्रकारात घाम गाळावा लागत नाही; स्नायू बळकट होतात; मन, सदैव प्रसन्न उल्हसित राहते. मी मॅट्रिक झालो त्या वेळी माझी उंची चार फूट दहा इंच एवढी होती. माझ्या खुजेपणाची माझ्यासमोर व माझ्यामागे खूप चर्चा व्हायची. मी एका मे महिन्यात नेटाने पोहणे सुरू करून वर्षभर न कंटाळता रोज तासभर पोहत राहिलो. माझी उंची वर्षात साडेपाच इंच वाढली यावर वाचकमित्रहो, विश्वास ठेवा. सत्यमेव जयते!
जंतूसंसर्ग टाळा
शहरोशहरी विविध रस्त्यांवर बर्फाचे गोळे, आईस्क्रीम, लस्सी, फ्रुट सॅलड, उसाचा रस, थंड ताक व त्याचबरोबर भेळ मिसळ, वडा, पकोडा, वडापाव अशी खूप खूप खाणीपिणी खुणावत असतात. मुंबई महानगरपालिकेने एक वर्ष मुंबईतील सर्व उसाच्या रसाची प्रयोगशाळेत परीक्षा केली. या रस्त्यावरच्या उसाच्या रसांच्या सर्व नमुन्यांत टाइफाइड, कॉलरा व काविळीच्या जंतूंचा खूप मोठ्या प्रमाणावर संसर्ग आढळला. एखादा विचारी व चाणाक्ष वाचकमित्र असे विचारेल, ‘‘वैद्याबुवा, मुंबईत खूप खूप खव्वय्या मंडळी रस्त्यावरचे नित्य खातपित असतातच. मग सर्वांनाच पोटाचे आजार का नाही होत?’’ प्रश्न बरोबर आहे. बहुसंख्य खव्वय्यांना बाहेरचे खाद्यपदार्थ वा पेये नेहमी बाधत नसली तरी ती केव्हा न केव्हा आपला फटका जुलाब, उलट्या व शेवटी अॅमिबायसिस अशा स्वरूपांत केव्हा तरी देतच असतात, म्हणून देतो सावधगिरीचा इशारा. क्षमस्व!
वाळ्याचा पडदा
काही सुखवस्तू मंडळींची, मध्यमवर्गीयांची राहती घरे कमीअधिक प्रमाणात लहान खोल्यांची वा बंदिस्त असतात. सगळ्यांकडेच ए.सी. असतो असे नाही. एक काळ घरोघरी दाराखिडक्यांवर वाळ्याचे पडदे सोडून त्यावर पाणी शिंपडून दुपारच्या सुखद झोपेचा आनंद घेण्याची प्रथा होती. काही लोक वाळ्याच्या ओल्या पंख्याने वारे घेत असतात. वाळ्याचा पडदा वा पंखा नाही जमला तरी मे महिन्यात वाळ्याचे पाणी दुपारच्या वेळात प्यावयाचा आनंद निश्चितच आरोग्यदायी आहे. त्याकरिता वाळ्याचा दर्जा चांगला असायला हवा. हे सांगायला नकोच.
माठ वापरा
चैत्र महिन्याच्या शेवटी शेवटी लहानमोठ्या शहरांत विविध कुंभार वस्त्यांमध्ये गार पाण्याकरिता मातीचे घडे बनविले जातात. काही घरांमध्ये मागल्या वर्षी उन्हाळ्यात वापरलेला मातीचा घडा हिवाळ्यात पालथा करून ठेवला जातो व उन्हाळ्यात पुन्हा नव्याने वापर केला जातो. मला नेहमी असे वाटते की, कुंभार मंडळींकरिता शहरवासीय मध्यमवर्गीयांनी दरवर्षी एक घडा, शक्यतो काळ्या मातीचा वा लाल मातीचा खरेदी करावा. स्वच्छ धुऊन एक दिवस तो पाणी भरून मुरू द्यावे. महिनाभर घड्यातील पाणी वापरावे. फ्रिजला जरूर कुलूप लावावे.
कैरीचे पन्हे आणि वाटली डाळ
अलीकडे विविध सोसायट्या, बंगले वा लहानमोठ्या वाडीवस्तींत आंबा, वड, जांभूळ, उंबर, कढीलिंब अशी वनसृष्टी असते. या लहानमोठ्या वृक्ष-झाडांच्या सावलीत निवांतपणे विश्रांतीचा आनंद घेणे यासारखे बिनपैशाचे सुख कोणते? महाराष्ट्राच्या शहरी तसेच ग्रामीण भागातही वैशाखातील हळदीकुंकू कार्यक्रमाला खूप खूप महत्त्व आहे. आमच्या लहानपणी एके काळी घरोघरी असे हळदीकुंकू समारंभ व्हायचे. या घरगुती कार्यक्रमात कैरीचे पन्हे, हरभऱ्याची वाटली डाळ या दोन गोष्टी हमखास असायच्या.
मधुमेहींसाठीचे पथ्य
सुखवस्तू समाजातील मंडळींच्या एका गटाच्या, मधुमेहीग्रस्त वाचकमित्रांचाही विचार मे महिन्यात करायला हवाच. मे महिना हा सर्वांकरिताच घरीदारी आवडीचे खाणेपिणे, नात्यागोत्यातील लग्नमुंजी वा अन्य मेळाव्यांतील पंचपक्वान्ने तसेच रस्तोरस्ती खुणावत असणारे चटकमटक पदार्थ, विविध कोल्ड्रिंक्स यांची मजा घेण्याचा, खात्रीचा महिना समजला जातो. मधुमेहग्रस्त रुग्णमित्रांनो, या सविस्तर लेखात सांगितलेल्या अनेकानेक फळफळावळ वा गोड पदार्थांचा, थंड पेयांचा तुम्हाला जरूर मोह होईल. तुम्ही पुढील ५ नियम पाळा आणि मे महिन्याच्या सुट्टीचा सुखद आनंद जरूर मिळवा. ज्वारी-जोंधळा-शाळूला रोज न्याय द्या. पांढरे खरबूज, पपई, डाळिंब, ताडगोळे, सफरचंद या फळांचा आधार घ्या. दुपारी झोपणे टाळा. सकाळी आरोग्याकरिता व रात्रौ भोजनोत्तर निवांत, बिनधास्त झोपेकरिता किमान वीस मिनिटे फिरायला जा. शुभं भवतु! संयम से स्वास्थ!
दोन मिनिटांत उकड!
‘ज्वारीची ताजी उकड’ हा जगातील सर्वात अल्पमोली बहुगुणी व कमीत कमी वेळात होणारा आरोग्यदायी नाश्ता आहे. कढई किंवा पातेल्यात थोडे पाणी उकळत ठेवावे. पाणी उकळायला लागले की त्यात थोडे थोडे ज्वारीचे पीठ टाकावे, ढवळावे. मग त्यात थोडे किसलेले आले, लिंबूरस व कढीलिंबाची पाने टाकावीत. अशी ताजी ताजी ज्वारीची उकड दिवसभर खूप खूप मोलाची मदत करते. एका माणसासाठी उकड करायला एक-दोन मिनिटेच लागतात, यावर वाचकमित्रांनी विश्वास ठेवावा.