मुक्ता चैतन्य, समाजमाध्यम अभ्यासक
‘मुलांच्या मोबाईलचं करायचं काय?’ – हा प्रश्न पालक, शिक्षक आणि मोठ्यांच्या जगाला पडलेला असला तरी खरंतर हा प्रश्न ‘माणसांच्या हातातल्या मोबाईलचं करायचं काय?’ असा आहे. जन्माला आल्यापासून डोळ्यासमोर असणाऱ्या मोबाईलचे बरेवाईट परिणाम आता मोठ्या प्रमाणावर दिसायला लागले आहेत. आपण डिजिटल माध्यमसाक्षर नाही याची जाणीव विविध वयोगटातल्या अनेकांना होऊ लागली आहे. सेक्सटॉर्शनपासून आर्थिक फसवणुकीपर्यंत अनेक गुन्हे दाराशी येऊन उभे राहिले आहेत. नव्या पिढीचा संवाद, प्रेम, डेटिंग, बुलिंग, शॉपिंग, मनोरंजन सगळंच ऑनलाईन जगाशी जोडलं गेलेलं आहे. त्यामुळे या हायब्रीड आयुष्याचे परिणाम निरनिराळ्या स्तरांवर आता दिसायला लागले आहेत.
डिजिटल जगातून अनेक मानसिक आरोग्याचे प्रश्न निर्माण होताना दिसतायत. मग त्यात समाजमाध्यम नैराश्य (सोशल मीडिया डिप्रेशन) असो, फोमो (फिअर ऑफ मिसिंग आऊट) असो नाहीतर स्व- प्रतिमेचे प्रश्न असोत. माणसांमध्ये वर्तणुकीय बदलही मोठ्या प्रमाणावर होऊ लागले आहेत. ट्रोलिंग हा कालपर्यंत फक्त मोठ्यांच्या जगाशी संबंधित विषय आता तरुणाईपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन जगाची आपल्याही नकळत आपण सरमिसळ करतो आहोत.
हेही वाचा… Health Special: ‘मंत्रचळ’ (OCD) म्हणजे काय?
सगळ्यात गमतीचा भाग असा की खासगी आणि जाहीर यातली सीमारेषा आपणच झपाट्याने पुसायला लागलो आहोत. कालपर्यंत आपण जे काही डायरीत लिहीत होतो किंवा अगदी जवळच्या माणसांना मन मोकळं करायचं म्हणून सांगत होतो ते आता आपण जाहीर व्यासपीठावर मोठ्या मोठ्याने सांगत सुटलेलो आहोत. वैयक्तिक नाजूक क्षणाचे आणि अनुभवांचे जाहिरीकरण करत असताना अनेकदा आपल्या हे लक्षात येत नाही की आपण आपल्या जगण्याच्या मूलभूत संवेदनाच बोथट करतो आहोत. ‘अति झालं आणि हसू आलं’ असं म्हणतात तसंच, सातत्याने आपल्यापुरतं असलेलं जगणं जाहीर केल्याने कुठेतरी आपण जगण्यातल्या अनेक गोष्टींबद्दल असंवेदनशील होत जातो. तंत्रज्ञान मागत नाही इतकं जास्त अनेकदा आपण तंत्रज्ञानाला पुरवतो आहोत आपल्याही नकळत.
आणि हे सगळं बघत आपली मुलं वाढतायेत, तरुण होतायेत हेही आपल्या लक्षात येत नाहीये. एखाद्या विषयाबद्दल जागरूकता असणं वेगळं आणि असंवेदनशील होत जाणं वेगळं. यातला फरक समजून घेणं आजच्या काळात फार गरजेचं आहे. मल्टीटास्किंग हे अत्यावश्यक कौशल्य झालं आहे, ज्याची खरंतर प्रत्येकाला गरज असतेच असं नाही. चार ऐवजी चार हजार गोष्टी एकाच वेळी करत असताना आपल्या मना- मेंदूचं जे काही होतंय त्याकडे आपलं लक्षच नाहीये.
हेही वाचा… Health Special: पावसाळ्याच्या सुरुवातीस आरोग्य बिघडण्याचे प्रमाण वर्षात सर्वाधिक का असते?
बिंज वॉचिंग सारख्या ग्लॅमरस शब्दाला घट्ट चिकटलेला ‘व्यसन’ हा शब्द आपल्याला दिसत नाहीये. सतत मोबाईल चेक करण्याच्या सवयीमुळे कशावरच लक्ष केंद्रित न होणं हा एक सार्वजनिक त्रास उद्भवला आहे ज्याची, मुलं आणि तरुणाई पहिली शिकार आहेत. आपल्याला तंत्रज्ञानाला वळसा देऊन गोष्टी कशा करायच्या हे लक्षात येईनासे झाले आहे. इयरफोन्समधून कानात वाजणारे निरनिराळे आवाज, डोळ्यासमोर सतत हलणारी चित्र या सगळ्यात भवतालचं भान हे अत्यंत मूलभूत मानवी लक्षण आपण हरवत चाललो आहोत. आपल्या आजूबाजूला, शेजारी काय घडतंय हे आपल्या लक्षात येत नाही इतकी बधिरावस्था पाहायला मिळते आहे.
२४ तास बारामहिने, दिवसरात्र हातात फोन असणं, आभासी जगात फिरण्याची सोय असणं, कामापासून भावनांपर्यंत अनेक गोष्टींच्या जोडण्या या फक्त आभासी जगाशी करणं, हायब्रीड जगण्याची सवय लावत असताना माध्यम शिक्षणाकडे पाठ फिरवणं या सगळ्यातून निर्माण होणारा, झालेला, होऊ घातलेला माणूस निराळा असणार आहे आणि आहेही! तो जितका सच्चा आणि खरा आहे तितकाच तो खोटा आहे. आभासी जगातली माहितीच फक्त ‘फेक’ असते असं नाहीये, माणसं ही फेक असतात, माणसांच्या प्रतिमा, त्यांचे शब्द, त्यांनी वापरलेले इमोजी या सगळ्या गोष्टी ‘फेक’ असू शकतात. पण हे शोधण्यासाठी, समजून घेण्यासाठी आपल्याकडे वेळ आहे का?
हेही वाचा… Health Special: पावसाळी वातावरणाचा आणि शरीरातील हार्मोन्सचा काय संबंध?
आपल्याला आपल्याही नकळत अनेक सवयी ऑनलाईन जगात लागतात. मग स्वतःच्या भावना ‘फेक’ करण्यापासून चुकीची माहिती शेअर करण्यापासून, एखाद्याला त्रास देण्यापर्यंत अनेक सवयी आपण स्वतःला लावून घेतो आहोत. ट्रोल करणं ही वृत्ती किंवा वैचारिक मतभेदाची गोष्ट न राहता अनेकांसाठी ‘सवय’ झालेली सोशल मीडियावर सहज पाहायला मिळते. आपल्या डिजिटल सवयी आणि त्यामुळे बदलेलं वर्तन याकडे अजूनही आपण डोळसपणे पाहायला तयार नाही.
या लेखमालेतून या सगळ्याचाच उहापोह करण्याचा प्रयत्न आहे. आपल्या जगण्याचं आपण नेमकं काय करतो आहोत, जेन झी आणि त्यांच्या मागची पुढची पिढी त्यांच्या जगण्याकडे कसं बघते आहे, त्यातले प्रश्न काय आहेत, ताणेबाणे काय आहेत हे जरा समजून घेऊया. मुलांच्या मोबाईलचं करायचं काय हा प्रश्न स्वतःला विचारताना हातातल्या मोबाईलकडे तटस्थपणे बघण्याचीही एक संधी आपणही आपल्याला द्यायला हवी आहे. देऊया का?