तू डाएटमध्ये बाकी सगळं कर, फक्त माझी कॉफी बंद करू नकोस; कारण मला माझी किमान एक मग कॉफी रोज लागते. स्मिता डाएट सुरू करण्यापूर्वी म्हणाली. पण तू व्यायाम करत असशील तर व्यायामापूर्वी एक कप कॉफी अगदीच चालणार आहे; त्यामुळे काळजी करू नकोस, मी तिला दिलासा दिला. कॉफी आणि चहा याबद्दल अतिरेक करणारा आणि ठराविक प्रमाणात कॉफी आणि चहा पिणारा असे दोन वर्ग आपल्याकडे आहेत. त्यामध्ये कॉफी पिणाऱ्यांसाठी कॉफीची विविध रूपं देखील आहेत. याच महिन्यात जागतिक कॉफी दिवस साजरा झाला त्यानिमित्ताने आजचा हा लेख!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कॉफी म्हटलं की आपल्यासमोर कॅपॅच्युनो, कोल्ड कॉफी, ब्लॅक कॉफी येतात सध्या कॉफी म्हटलं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉफीमध्ये फ्लेवर कोणता आहे… ऑक्टोबर महिन्यातच जागतिक कॉफी दिवस होता आणि त्या निमित्ताने कॉफीच्या विविध प्रकारांबाबत, त्यातील पोषण मूल्यांबाबत जाणून घ्यायलाच हवं.

चांगला आणि जुना प्रकार म्हणजे ब्लॅक कॉफी!

कॉफीच्या बिया विशिष्ट तापमानावर भाजून त्यानंतर त्यातून जे तेल तयार होते त्याने कॉफीला एक वेगळा गंध आणि वेगळीच चव प्राप्त होते. मेंदूला तरतरी येणे, ब्लड प्रेशर थोडंसं वाढणे, तसेच खेळाडूंसाठी योग्य वातावरण व मानसिकताही तयार होते. कॉफी म्हटलं की दरवेळी दुधाळ क्रीमर क्रीम टाकलेली किंवा फेसाळलेला कॉफीचा एखादा वाफाळता कप आपल्या डोळ्यासमोर येतो! ब्लॅक कॉफी खूपच सोपी आहे. एक चमचा कॉफी आणि त्यावर गरम पाणी की झाली ब्लॅक कॉफी.

हेही वाचा…. Health Special: ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे काय?

सध्या कॉफी हा पिण्याचा गोड पदार्थ झाला आहे. अलीकडे चहा बरोबरच कॉफी पिणाऱ्यांचे प्रमाणदेखील वाढले आहे. खरं सांगायचं तर योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात तयार केलेली कॉफी ही तुमच्या शरीरासाठी अत्यंत उपकारक असते. हृदय रोगाच्या विकारापासून तुम्ही स्वत:ला दूर ठेवू शकता तसेच त्वचेच्या विकारांसाठीही कॉफी अत्यंत उपकारक आहे. मात्र अतिरेकी कॉफी पिणाऱ्यांमध्ये कॉफीचे दुष्परिणाम तितकेच अधिक आढळतात. सातत्याने साखर असलेली कॉफी प्यायल्यामुळे दातांचे नुकसान होते तसेच साखरेचा अतिवापर केल्यामुळे कॉफीची चव तर बिघडतेच आणि कॉफी पिणाऱ्यांची तब्येतही बिघडते! कॉफीमध्ये असणारे रायबोफ्लेविन पेशींच्या आरोग्यासाठी अत्यंत चांगले असते. शिवाय यात असलेले नायसीन म्हणजेच जीवनसत्व ब तीन त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. कॉफीमध्ये असणारे पोटॅशियम शरीरातील द्रव पदार्थांचे संतुलन साधण्यासाठी मदत करते तसेच स्नायूंच्या लवचिकतेसाठी देखील मदत करते. कॉफीमध्ये असणारे क्लोरोजेनिक अ‍ॅसिड, क्विनायइड्स यांसारखे पदार्थ शरीरातील पेशींच्या आरोग्यासाठी आणि संवर्धनासाठी अतिशय उपयुक्त आहेत.

ब्लॅक कॉफी ते कोल्ड कॉफी हा कॉफीचा प्रवास त्यात मिसळल्या जाणाऱ्या पदार्थानुसार बदलत जातो. कारण कॉफीच्या चवीत फरक पडतो. ब्लॅक कॉफी साधारण शून्य ते एक कॅलरी इतकी ऊर्जा देते तर ब्लॅक कॉफी विथ शुगर पाच ते दहा कॅलरी इतकी ऊर्जा देते. त्यानंतर कॉफीमध्ये क्रीम घातलं किंवा दूध वापरलं तर दुधाच्या प्रमाणावर कॉफीतील कॅलरीज ठरतात, अर्थात त्या अधिकच असतात. साखर दूध क्रीम यापासून केली जाणारी कॉफी हे साधारण ‘पोस्ट मील डेझर्टट असतं, असं म्हणायला हरकत नाही.

हेही वाचा… Health Special: ऋतूसंधीकाळात तब्येत नीट ठेवणं का महत्त्वाचं?

ग्रीन कॉफी शरीरातील अतिरिक्त चरबी जाळण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे मात्र व्यायामाआधी घेतली जाणारी ग्रीन किंवा ब्लॅक दोन्ही प्रकारची कॉफी अत्यंत परिणामकारक ठरते. अलीकडे बाजारामध्ये दालचिनीचा अर्क असणारी किंवा इतर विविध फ्लेवर्स असलेली कॉफीही मिळते. कॉफी घेताना त्यामध्ये साखरेचा अंश कितपत आहे हे जाणून घेणे तितकंच महत्त्वाचं आहे. कारण दालचिनी सुंठ यासारख्या रोगप्रतिकारकशक्ती वाढवणाऱ्या पदार्थातील तेल किंवा स्निग्धांश जर कॉफीमध्ये असेल तर ती नेहमीच फायदेशीर ठरते. मात्र त्यासोबत त्यामध्ये साखर एकत्र केली की, अशी कॉफी अनावश्यक ऊर्जा देण्याचे काम करते. कॉफीची विविध रूप स्वीकारताना ब्लॅक कॉफी आणि फॅट्स हा सध्याचा ट्रेण्डिंग विषय आहे. कॉफीमध्ये नारळाचे तेल किंवा तूप घालून कॉपी कॉफी प्यायल्यास चयापचयाची क्रिया सुधारते आणि आतड्यांचे आरोग्यही सुधारते!

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What type of coffee is best for health when and how to drink the coffee hldc dvr
Show comments