जर तुम्हाला थायरॉईडचा त्रास असेल तर तुम्हाला चांगली औषधे घेण्याचा सल्ला दिला जाईल. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या थायरॉईडच्या त्रासाची लक्षणे नियंत्रणात आहेत, तर गोळ्या खाणे अनावश्यक वाटू शकते, पण स्वतःहून गोळ्या खाणे बंद करण्याआधी त्याचा आरोग्यावर कसा परिणाम होतो हे जाणून घ्या. जेव्हा तुम्ही अचानक थायरॉईडची औषधे घेणे बंद करता, तेव्हा शरीरावर कसा परिणाम होतो याबाबत तज्ज्ञ काय सांगतात समजून घेऊ या.
बंगळुरू येथील एस्टर सीएमआय हॉस्पिटलचे एंडोक्राइनोलॉजी, सल्लागार डॉ. महेश डी एम यांनी द इंडियन एक्स्प्रेसला याबाबत माहिती दिली. “जेव्हा एखादी व्यक्ती थायरॉईडची औषधे घेणे बंद करते तेव्हा शरीरात अनेक शारीरिक बदल होतात, जे एकूण आरोग्यावर लक्षणीय परिणाम करू शकतात. “चयापचय, ऊर्जा पातळी आणि विविध शारीरिक कार्ये नियंत्रित करणारी थायरॉईड ग्रंथी पूरक औषधांशिवाय पुरेसे हॉर्मोन्स उत्पादन राखण्यासाठी संघर्ष करू शकते. परिणामी, थकवा, वजन वाढणे, नैराश्य आणि थंडीची संवेदनशीलता (Sensitivity To Cold) यांसारखी हायपोथायरॉईडीझमची (Hypothyroidism) लक्षणे पुन्हा दिसू शकतात किंवा आणखी बिघडू शकतात,” असे डॉ. महेश डी एम यांनी सांगितले.
त्यांनी पुढे सांगितले की, शरीराच्या चयापचय प्रक्रिया मंदावू शकतात, ज्यामुळे ऊर्जेची पातळी कमी होऊ शकते आणि वजन वाढण्याची शक्यता असते, म्हणून रुग्णांनी त्यांच्या औषधोपचार पद्धतीत कोणताही बदल करण्यापूर्वी आरोग्यसेवा व्यावसायिकांशी सल्लामसलत करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
दुष्परिणाम काय आहेत?
थायरॉईड औषधे बंद केल्याने तात्काळ आणि दीर्घकाळापर्यंत आरोग्य धोके निर्माण होऊ शकतात. थायरॉईड हॉर्मोन्सची पातळी नियंत्रित करण्यासाठी या औषधांवर अवलंबून असलेल्यांना केस गळणे, उर्जेच्या पातळीत चढउतार, मूडमध्ये अडथळा, मासिक पाळीत अडथळा आणि चयापचय असंतुलन यांसारखे अनेक प्रतिकूल परिणाम अनुभवता येतात. अल्पावधीत डॉ. महेश यांनी थकवा, वजन वाढणे आणि शरीर औषधांच्या अनुपस्थितीशी जुळवून घेत असताना संज्ञानात्मक अडचणी उद्भवू शकतात, अशी लक्षणे सूचीबद्ध केली.
बंगळुरूतील बन्नेरघट्टा रोड येथील फोर्टिस हॉस्पिटलच्या एंडोक्राइनोलॉजी-सल्लागार डॉ. अनुषा नादिग यांनी द इंडियन एक्स्प्रेसला याबाबत माहिती दिली. त्या सांगतात, “थायरॉईडची औषधे बंद केल्याने दीर्घकालीन धोके उद्भवू शकतात, ज्यामध्ये हृदयरोग, ऑस्टियोपोरोसिस, वंध्यत्व, संज्ञानात्मक घट (Cognitive Difficulties म्हणजे विचार करण्याच्या, शिकण्याच्या, लक्षात ठेवण्याच्या, निर्णय घेण्याच्या आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होणे) आणि नैराश्याचा धोका वाढतो. “उपचार न केलेले हायपोथायरॉईडीझम स्थिती गर्भपात, अकाली जन्म आणि गर्भधारणेदरम्यान जन्म दोषांचा धोका वाढवू शकते,” असे त्या म्हणाल्या.
तुम्ही थायरॉईडची औषधे किती वेळा घ्यावीत? (How often should you take thyroid medicines?)
सामान्यतः डॉ. महेश ही औषधे दिवसातून एकदा, शक्यतो सकाळी रिकाम्या पोटी घेण्याचा सल्ला देतात, जेणेकरून हार्मोन्सची पातळी स्थिर राहील. पण, विशिष्ट डोस आणि वारंवारता वैयक्तिक आरोग्याच्या गरजा, उपचार घेतलेल्या थायरॉईड विकाराचा प्रकार आणि रुग्णाच्या औषधांना मिळालेल्या प्रतिसादावर अवलंबून असू शकते.
त्यांनी थायरॉईड फंक्शन चाचण्यांचे नियमितपणे निरीक्षण करणे आणि उपचारादरम्यान उद्भवू शकणाऱ्या कोणत्याही संभाव्य दुष्परिणामांचे किंवा आरोग्य स्थितीत बदलांचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे, यावर भर दिला.