पावसाळ्यात मध सेवनाचे आरोग्याला होणारे फायदे ध्यानात घेऊनच आचार्य-सुश्रुत यांनी वर्षा ऋतुचर्येमध्ये मधयुक्त पाणी पिण्याचा सल्ला दिलेला आहे. पाणी उकळवून थंड (सामान्य तापमानाचे होईल असे) करावे आणि त्यामध्ये मध मिसळून प्यावा. उकळवून थंड (प्राकृत) केलेले पाणी हे पित्तशमनासाठी, तर कफनाशनासाठी मधयुक्तपाणी उपयोगी पडते. वर्षा ऋतूमधील मुख्य विकृती म्हणजे पित्तसंचय आणि त्याला जोडून शरीरात वाढणारा कफ या उभय दोषांना नियंत्रणात राहण्यासाठी वरीलप्रकारे मधयुक्त पाणी पिण्याचे मार्गदर्शन आयुर्वेदाने केलेले आहे.
वात वाढवणारे असूनही मध पावसाळ्यात कसे चालते?
वात-पित्त व कफ यांना प्राकृत असताना शरीर-स्वास्थ्य धारण करणारे म्हणून ‘धातू’ आणि विकृत झाल्यावर स्वास्थ्य बिघडवून शरीराला दूषित करणारे म्हणून ‘दोष’ म्हटले आहे. वात-पित्त व कफ या तीन शरीर-संचालक किंवा स्वास्थ्यबाधक घटकांवर उपयुक्त असे तीन मुख्य पदार्थ आयुर्वेदाने सांगितले आहेत, ते म्हणजे तेल, तूप व मध. वातावर उपयोगी तेल, पित्तावर उपयुक्त तूप आणि कफावर परिणामकर मध. मात्र मध वातल म्हणजे वात वाढवणारा आहे. मग वर्षा ऋतूमध्ये वातप्रकोप झालेला असताना वात वाढवणारा मध का आणि कसा सांगितला, असा प्रश्न वाचकांना पडेल ,तर याचे उत्तर जाणून घेऊ.
हेही वाचा… Health Special: स्निग्धांशाचे (फॅट्स) शरीरातील नेमके काम काय?
वर्षा ऋतूमधली सर्वात महत्त्वाची विकृती म्हणजे शरीरामध्ये वाढलेले आर्द्रत्व म्हणजे ओलावा (पाण्याचा अंश). सततच्या पाण्याच्या वर्षावामुळे जसा वातावरणात ओलावा वाढतो. तसाच तो शरीरामध्येसुद्धा वाढतो, जो अग्नीमांद्य आणि विविध विकृतींना कारणीभूत होतो. पावसाळ्यात शरीर सतत वेगवेगळ्या विकारांनी ग्रस्त असते,त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे शरीरामधील विविध धातूंमध्ये (शरीरकोषांमध्ये) वाढलेला ओलावा. साहजिकच आयुर्वेदाने त्या ओलाव्याला कमी करण्याचे विविध विधी वर्षा ऋतुचर्येमध्ये सांगितले आहेत, त्यातलाच एक म्हणजे मधाचे सेवन. कारण मध चवीला गोड-तुरट आणि गुणांनी रूक्ष म्हणजे कोरडे आहे. तुरट रस आणि रूक्ष गुण हे शरीरातले द्रव शोषण्याचे कार्य करतात आणि मधामध्ये संग्राही म्हणजे द्रव ग्रहण करण्याचा (शोषण्याचा) गुण आहेच. मधाच्या या शोषक गुणाचा लाभ घेऊन शरीरामधील अतिरिक्त ओलावा शोषण्यासाठी पावसाळ्यात मधाचा उपयोग करण्यास आयुर्वेदाने सांगितले आहे.
हेही वाचा… Health Special: अती पाणी पिण्याचा अन्नपचनावर परिणाम होतो का?
याशिवाय शरीरामध्ये ओलावा शोषण्याचे कार्य केल्यानंतर मध क्षीण होतो व वात वाढवण्याचे सामर्थ्य त्यात राहात नाही, असे अरुणदत्त सांगतात, तर कालसामर्थ्याने अर्थात काळाच्या प्रभावाने सुद्धा मध वातावर उपयोगी होतो,असे हेमाद्री सांगतात. याचसाठी अष्टाङ्गसंग्रहकार आचार्य वाग्भट सुद्धा सांगतात की, वातवर्धक असला तरी मधाचा वर्षा ऋतूमध्ये उपयोग योग्य समजावा. मथितार्थ हाच की पावसाळ्यात मधाचा उपयोग आयुर्वेदसंमत आहे.
मध कशावर गुणकारी?
आधुनिक विज्ञानामध्ये जसे का-कसे प्रश्न हे आवश्यक असतात, तसेच आहाराबाबतही आयुर्वेद का, कसे, किती व कोणासाठी याचे मार्गदर्शन करते. पावसाळ्यात मध उपयुक्त असला तरी मधाचा उपयोग अल्प मात्रेत करावा, असा सल्ला चक्रपाणी दत्त देतात. याचा अर्थ तारतम्याने समजून घ्यायला हवा.
मध हे कफावरील सर्वोत्तम औषध असल्याने ज्यांना सर्दी, ताप, कफ, सायनसायटीस, खोकला, दमा, सांधे जड होणे वा आखडणे, शरीर जड होणे वगैरे कफ प्रकोपजन्य समस्या असतील त्यांनी कफाचा पावसाळ्यात मधाचा सढळ उपयोग करावा. त्यातही ज्या व्यक्ती स्थूल,वजनदार व जाडजूड शरीराच्या असतात, त्यांच्यासाठी मध योग्य, कारण मध लेखन (शरीरामधील चरबी व मांस खरवडून कमी करणार्या) गुणांचे आहे. आचार्य चरक यांनी मध हे कफाप्रमाणेच पित्त कमी करण्यासाठी सुद्धा श्रेष्ठ सांगितले आहे. याचा अर्थ कफाप्रमाणेच ज्यांना पित्ताचा त्रास होत आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हितकर आहे, मात्र मध उष्ण आहे हे विसरु नये, जे पित्तप्रकृती व्यक्तींना अतिमात्रेत बाधक होऊ शकते.
याशिवाय मळमळ,उलट्या होत असताना मध टाळावा. याउलट कृश (अंगावर मांसमेद कमी असलेल्या),कमी वजनाच्या, सडसडीत शरीराच्या व धडपड्या-बडबड्या-अस्थिर व्यक्तिमत्त्वाच्या अशा ज्या वातप्रकृती व्यक्ती आहेत त्यांनी वर सांगितलेले सर्दी, ताप, कफ-खोकला असे आजार झाले असतील तर तेवढ्या पुरता मधाचा उपयोग करावा. शरीरामध्ये ओलावा वाढल्याचे जाणवत असेल तर मधाचा उपयोग करावा तोसुद्धा अल्प मात्रेमध्ये. थोडक्यात पावसाळ्यात मधाचा उपयोग वातप्रकृती व पित्तप्रकृती व्यक्तींनी जपून व चक्रपाणी यांनी सांगितल्याप्रमाणे अल्प मात्रेत करावा.