Keratin Treatment: स्त्रियांचे सौंदर्य हे त्यांच्या केसांवरच अवलंबून असते. अनेकदा स्त्रिया त्यांच्या त्वचेच्या आणि केसांच्या सौंदर्याबद्दल खूप जागरूक असतात. प्रत्येक स्त्रीला असे वाटत असते की, आपले केस सरळ लांबलचक आणि सिल्की असावेत. काही स्त्रिया या बाबतीत नशीबवान असतात की, त्यांचे ओरिजनल केस सरळ आणि लांबलचक असतात. तर, काही महिला यासाठी पार्लर किंवा हेअर स्ट्रेटनिंग ट्रीटमेंट घेतात. तुम्हीसुद्धा यातल्याच आहात का? तुम्हीही केस सरळ करण्यासाठी हेअर स्ट्रेटनिंग प्रॉडक्ट वापरत असाल, तर सावधान! केस सरळ करण्यासाठी रासायनिक उत्पादन वापरणे तुमच्या जीवावर बेतू शकते. कारण- याचा थेट परिणाम मूत्रपिंडावर होऊ शकतो.
हेअर स्ट्रेटनिंगचा मूत्रपिंडांवर कसा परिणाम होतो आणि मूत्रपिंडे खराब होण्यासाठी ही बाब कशी कारणीभूत ठरते या संदर्भात इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्सचे वरिष्ठ सल्लागार डॉ. डी. एम. महाजन यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे.
संशोधनानुसार केस सरळ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रसायनांमुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. कधीतरीच हेअर स्ट्रेटनिंग करणे आणि हेअर स्ट्रेटनिंग उत्पादनांचा अधूनमधून वापर केल्यास फारसा धोका निर्माण होत नाही. मात्र, केसांसाठी वारंवार रासायनिक उत्पादनांचा वापर केल्यानं मूत्रपिंडांशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे महिलांनी याबाबत खूप सावध राहिले पाहिजे.
हेअर स्ट्रेटनिंगच्या उत्पादनांमुळे मूत्रपिंडांचे नुकसान होऊ शकते का?
केस सरळ करणाऱ्या उत्पादनांमुळे मूत्रपिंडांचे नुकसान होऊ शकते का? तर हो. याचा मूत्रपिंडांवर परिणाम होऊ शकतो. हेअर स्ट्रेटनिंगच्या ट्रीटमेंटप्रसंगी वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांमुळे त्वचा खराब होऊ शकते. त्यामुळे योग्य उत्पादनांची निवड करण्याबरोबरच त्यांचा वापरही योग्य प्रमाणात केला जाणे आवश्यक आहे. आपल्याला जर आधीच त्वचेसंदर्भात काही अॅलर्जी असेल, तर अशा प्रकारच्या ट्रीटमेंट घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे डॉक्टर सांगतात. केराटिन ट्रीटमेंटमध्ये ग्लायऑक्सिलिक अॅसिड अधिक प्रमाणात वापरले जाते. त्यामुळे केस मजबूत होत असले तरी त्यामुळे ऑक्झलेट क्रिस्टल्स जमा होऊन मूत्रपिंडांची कार्यक्षमता कमी होऊ शकते.
याचा अर्थ ज्यांना मूत्रपिंडाच्या समस्या आहेत, त्यांनी हेअर स्ट्रेटनिंगशी निगडित उत्पादने अजिबात वापरू नयेत?
डॉक्टर सांगतात, “ज्यांना मूत्रपिंडाच्या समस्या आहेत, त्यांनी ही हेअर स्ट्रेटनिंगला वापरली जाणारी रसायनयुक्त उत्पादने वापरणे टाळावे. या हानिकारक उत्पादनांच्या अतिरिक्त वापरामुळे मूत्रपिंडे निकामी होऊ शकता. केसांचे सौंदर्य वाढविण्यासाठी केराटिन उपचार अधिक प्रमाणात केले जात आहेत. पण, हा उपचार आरोग्यासाठी घातक ठरू शकतो, अशी माहिती नव्या अभ्यासातून समोर आली आहे. केराटिन उपचारामध्ये फॉर्मल्डिहाइड होते. त्यामुळे केस, त्वचा आणि डोळ्यांवर विपरीत परिणाम होतो. त्यातील रासायनिक घटक रक्तप्रवाहात शोषले जातात आणि त्यामुळे मूत्रपिंडे खराब होऊ शकतात.”
हेही वाचा >> नारायण मूर्ती राहिले होते १२० तास उपाशी; पाच दिवस उपाशी राहिल्याने शरीरावर काय परिणाम होतात?
या उत्पादनांचा वापर कसा करावा ?
हेअर ट्रीटमेंटमध्ये किमान चार ते सहा महिन्यांचे अंतर असावे. त्यामध्ये रसायनांचे प्रमाण योग्य असणे महत्त्वाचे आहे. तुमच्या त्वचारोग तज्ज्ञांशी याबाबत संपर्क साधून मगच पार्लरमधील योग्य ते उत्पादन वापरावे. तसेच अशा प्रकारे केसांवर कोणतीही अनैसर्गिक प्रक्रिया न करता, केसांची नैसर्गिकरीत्या काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात.