When is a right time to check weight : वजनवाढ ही खूप मोठी समस्या आहे. चुकीची जीवनशैली अनेकदा वजन वाढण्यास कारणीभूत ठरते. वजन कमी करण्यासाठी अनेक जण वाट्टेल ते प्रयत्न करतात; पण अनेकदा खूप प्रयत्न करूनही वजन कमी होत नाही. वजन कमी करण्यासाठी विविध प्रकारचे उपाय करताना काही लोकांना वारंवार आपले वजन सध्या किती आहे, हे तपासण्याची खूप उत्सुकता असते. पण, अशा लोकांनी हे समजून घेणे गरजेचे आहे की, वजन तपासण्याचीसुद्धा एक ठरावीक वेळ असते. तुम्हाला आश्चर्य वाटेल; पण हे खरे आहे.
‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या ‘Know Your Body’ या मालिकेत वजन तपासण्याचा योग्य मार्ग आणि वेळ याविषयी तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.
वजन तपासण्याची योग्य वेळ कोणती?
सकाळी उपाशीपोटी वजन तपासणे केव्हाही चांगले आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना फूड थेरपिस्ट डॉ. रिया बॅनर्जी सांगतात, “सकाळी शौचाला जाऊन आल्यानंतर पाणी, औषध, चहा, असे काहीही न घेता, जर तुम्ही वजन तपासत असाल, तर ते तुमचे योग्य वजन असते.”
पुढे डॉ. रिया सांगतात, “सकाळचे वजन किती असणार हे प्रत्येक व्यक्ती-व्यक्तीवर अवलंबून असते, हे समजून घेणेही गरजेचे आहे. जे लोक दररोज ४५ मिनिटे ते एक तास व्यायाम करतात, त्यांचे वजन संध्याकाळी थोडे जास्त असते. कारण- त्यांच्या वजनामध्ये जेवण आणि पाण्याचा समावेश असतो; पण जे क्रीडापटू शारीरिकदृषट्या नेहमी सक्रिय असतात, त्यांचे वजन संध्याकाळी कमी असते. त्यामुळे खरे वजन नेमके किती, हे फक्त सकाळी जाणून घेता येऊ शकते.
कितीदा वजन तपासावे?
“वजन तपासण्याची योग्य वेळ ही सकाळी असली तरी नियमित वजन तपासण्याची आवश्यकता नाही”, असे डॉ. रिया सांगतात.
डॉ. रिया पुढे सांगतात, “महिन्यातून एकदा उपाशीपोटी वजन तपासणे, सर्वांत चांगले आहे; पण तुम्ही वजन तपासण्यासाठी नियमित उत्सुक असाल, तर आठवड्यातून एकदा तुम्ही वजन तपासू शकता. पण, हे लक्षात ठेवा की, आदल्या दिवशी आपण किती खाल्ले आहे, दिवसभर किती पाणी प्यायलो, नवीन औषधी किंवा दिवसभरातील शारीरिक हालचाली यांनुसार वजन कमी-जास्त दिसू शकते.”