विविध फळं आणि त्यांच्या गुणधर्माविषयी, औषधी उपयोगांबद्दल जाणून घेऊया. आतापर्यंत आपण पेरु, उस, डाळिंब, केळं या फळांच्या औषधी गुणधर्माबद्दल आपण समजून घेतलं. आता बोरं, सीताफळ, सफरचंद, संत्रं-मोसंबं यांच्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.
बोरं
बोरांच्या विविध जातींतील आंबटगोड बोरं औषधी गुणाची आहेत. त्यांचे वाळवून केलेले चूर्ण तोंडाला चव आणते. पोटात वायू धरणे, वारंवार जुलाब होणे, संग्रहणी, कॉलरा या विकारात बोर हे चांगले फळ आहे. पण फार मोठ्या प्रमाणावर बोरे खाल्ली वर पाणी प्यायलो की उलटे डहाळ होतात. बोरे खाल्ल्यावर कधीही पाणी पिऊ नये. बोरकूट व सोबत जिरेपूड, तोंडात घास फिरत असल्यास उपयोगी पडते. मुंबईत वाळलेली बोरं मिळतात. तसेच सर्वत्र ‘चनिया मणिया’ म्हणून छोटी छोटी आंबट-गोड चवीची बोरंही सिझनमध्ये एकवेळ तरी खावीत. १९६६ ते १९६८ मी अरुणाचल प्रदेशात ‘तेजू’ या पर्वतीय प्रदेशात होतो. तेथे सर्वत्र फक्त वेगवेगळ्या जातीच्या बोरांचीच लहान-मोठी झुडपे होती. त्याची आठवण इथे येते. फीट येणाऱ्या कृश रुग्णांकरिता हे फळ चांगले टॉनिक आहे. बोरे लिंबू, जांभळे, डाळिंब, कवठ यांच्या रसात किंवा चूर्णाबरोबर घोळलेला ओवा चूर्ण उत्तम पाचक औषध होय.
मोसंब
मोसंब हे फळ वजन वाढवण्याकरिता म्हणून आजारी माणसाला देण्याचा प्रघात आहेच. त्याचा ज्यूस करून देण्याचे फॅड आहे. त्याऐवजी त्याच्या फोडी खाणे केव्हाही चांगले. कोणत्याही ज्यूस किंवा रसात हवेच्या संपर्काने लगेच विकृती होते. मोसंब थंड गुणाचे असून खूप चहा पिणे, विड्या, सिगरेट ओढणे किंवा जागरण यामुळे शरीरात उष्णता वाढते त्यावर अक्सर इलाज आहे. अशा पेशंटची मलावरोध, संडासला साफ न होणे ही तक्रार असल्यास एक दिवस दोन्ही जेवणानंतर एक एक मोसंब खाऊन पाहावे. नक्कीच फायदा होतो. नेहमी पोटात वायू धरण्याची खोड असणाऱ्यांनी मात्र मोसंब्याचा रस टाळावा किंवा त्याबरोबर मिरेपूड घ्यावी. मोसंब्याची साल वाळवावी. केसांतील उष्णतेमुळे उत्पन्न झालेल्या फोडांकरिता त्या सालीच्या चूर्णाचे उकळून पाणी आंघोळीच्या वेळेस वापरावे. केसांतील व्रण भरून येतात. जुन्या बाराचे, पावलीची खूण असलेले, वर गोल वर्तुळ असलेले मोसंबंच वापरावे. मधुमेहींनी मोसंब टाळावे.
सफरचंद
रोज एक सफरचंद खा व रोगाला दूर ठेवा. अशी सफरचंदभक्तांची धारणा आहे आणि ती वाजवी आहे. थंड हवामानातील हे फळ तृप्तिकारक आहे. जुलाब थांबावे व शरीराला बल यावे याकरिता वाफारून सफरचंद खावे. रक्तपित्त, क्षय, उर:क्षत, थुंकीतून रक्त पडणे, वजन अकाली घटने, वारंवार जुलाब होणे, शरीराची भगभग, रात्रौ स्वस्थ झोप न लागणे, खूप लाळ सुटणे, फाजील तहान, संग्रहणी, आतड्यांचे विकार, मुखपाक, आतड्यांना व्रण असणे, तिखट आहाराने मांसल आवरण नष्ट होणे, मद्यपान व धूम्रपानाने शरीराची हानी होणे या तक्रारींवर सफरचंद हा उत्तम उतारा आहे.
मध, सफरचंद रस व जोडीला वेलची, लवंग, दालचिनी, नागकेशर, सुंठ, केशर असे सुगंधी पदार्थ आपापल्या कुवतीप्रमाणे मिसळून एक उत्तम टॉनिक तयार होते. ज्यांना निश्चयाने वजन वाढवायचे आहे त्यांनी वरील प्रयोग जरूर करावा. सफरचंदाबरोबर प्रकृतीनुरूप सुगंधी द्रव्ये मिसळावीत. म्हणजे सफरचंद कधी बाधत नाही. लहान बालकांपासून वृद्धांपर्यंत न बाधणारे, वजन वाढवणारे फळ म्हणून सफरचंद प्रसिद्ध आहे. मधुमेहींनी सफरचंद खाण्यास हरकत नाही. मी दिल्लीत असताना रस्त्यावरचे फळ विक्रेते सफरचंदाच्या फोडी कापून त्यावर किंचित लिंबू पिळून, कणभर मीठ, मिरची पेरून तुलनेने अल्प दरात खवय्या ग्राहकांना देताना पाहात असे. हिमाचल प्रदेश, काश्मीर या भागातून येणाºया सफरचंदांना अधिक चांगली चव असते व ती आपल्याकडच्या सफरचंदापेक्षा अधिक काळ टिकतात, असा माझा अनुभव आहे. सफरचंदाच्या जातीतील, कमी गोडवा असणारे नाशपती तुलनेने स्वस्त असते. भरपूर शारीरिक श्रम करण्याकरिता नाशपती सफरचंदाचेच गुण देते. पण ज्यांना बौद्धिक काम खूप आहे, मगजमारी डोकेदुखी आहे त्यांनी सफरचंद खावे.
चिक्कू
चिक्कू सर्व तऱ्हेने कफवर्धक फळ आहे. केळ्यांमधील कफसंबंधी दोष चिक्कू या फळात नाही. त्वचाविकार विशेषत: कोड, इसब, गजकर्ण या त्वचाविकारांत केळ्याऐवजी चिक्कू हे फळ खावे. वजन वाढविणे, तृप्ती, दाह कमी करणे याकरिता चिक्कू उपयुक्त फळ आहे.
सीताफळ
सीताफळ मधुर, गुणाचे असून हृदयाला हितकर आहे. शरीरात कफ वाढवते. शरीरातील स्नायूंना बळकटी आणते. शरीर पुष्ट करते. वजन वाढविण्यास मदत करते. अधिक प्रमाणात खाल्ल्यास पोटात वायू वाढतो. पित्ताचे विकारात सीताफळ फार उपयुक्त आहे. शरीराचा दाह होत असल्यास सीताफळ फार उपयुक्त आहे. शरीराचा दाह होत असल्यास सीताफळ रात्रभर उघड्यावर ठेवावे. दवामध्ये भिजलेले असे सीताफळ पहाटे खावे. भगभग होणे, धूम्रपान, दारू यामुळे होणाऱ्या दाह विकारात सीताफळ जरूर खावे. शरद ऋतूत उन्हात फिरून पित्ताचा त्रास होणे, फार तहान लागणे, थकवा, डोके गरगरणे या तक्रारींकरिता सीताफळ उपयुक्त आहे. खूप कप खोकला असणाऱ्यांनी सीताफळ टाळावे. अलीकडे सीताफळ रबडी हा अत्यंत रुचकर पदार्थ खूप प्रसिद्ध मिठाईच्या दुकानांतून सर्रास विकला जातो. सीताफळाच्या गरापासून उत्तम आइस्क्रीमही बनवले जाते.
सीताफळाच्या बियांचे चूर्ण पाण्यात उकळून त्याने केस धुतल्यास लिखा, उवा मरून जातात. हे पाणी डोळ्यात जाणार नाही याची मात्र काळजी घ्यावी.
कोंडा, खवडे यांचा ज्यांना नेहमी त्रास आहे, त्यांनी शिकेकाई व सीताफळाच्या बिया एकत्र कुटून त्याच्या पाण्याने केस धुवावे. मूत्राघात विकारात सीताफळाची मुळी उगाळून त्याचे गंध पोटात घ्यावे. काळपुळी किंवा असह्य ठणका देणाऱ्या गळवांवर सीताफळाची पाने ठेचून बांधावीत. पूवाचा निचरा होऊन वेदना थांबतात.
संत्रे
नागपुरी संत्रे सर्वांच्याच आवडीचा विषय. पण एकदम गोड संत्री हल्ली दुर्मीळ झाली आहेत. घाईने फळ अकाली पिकवून व खूप औषधांचा झाडांवर वापर यामुळे संत्रे आंबट राहते. गोड संत्रे म्हणजे उत्तम पाचक व पुन्हा भूक उत्पन्न करणारे मोठे टॉनिक आहे. इन्स्टंट हुशारी येते. संत्र्याच्या रसाबरोबर मिरेपूड अवश्य वापरावी. त्वचेला तेज पाहिजे असेल, रक्त लवकर वाढण्याची गरज असली तर, विशेषत: मेनोपॉज काळात, स्त्रियांच्या चाळिशीच्या काळात संत्रे फार उपयुक्त आहे. ताज्या संत्र्यापासून घरी तयार केलेले ऑरेंज ज्यूस केव्हाही चांगले. प्रवासात संत्र्यापासून बनविलेल्या ऑरेंज टॉफी किंवा ऑरेंज लिमलेट गोळ्या चांगलीच सोबत करतात. संत्र्याच्या वाळलेल्या सालीचा काढा केसातील कोंडा, खाज याकरिता केस धुवायला वापरावा.