आयुर्वेदाने शरीराच्या पोषणामध्येच नव्हे तर स्वास्थ्यरक्षणामध्ये व रोगांच्या उपचारामध्ये सुद्धा रसांना (चवींना) महत्त्व दिलेले आहे. गोड, आंबट, खारट, तिखट, कडू व तुरट या त्या सहा चवी किंवा सहा रस. कोणत्या चवीचा (रसांचा) आहार सेवन करावा याबाबत आयुर्वेदाने दिलेला बहुमोल सल्ला म्हणजे आरोग्य अबाधित राहावे म्हणून माणसाने सहाच्या सहा रसांचे सेवन करणे आवश्यक आहे, म्हणजेच ऋतु कोणताही असला तरी आहारामध्ये गोड,आंबट,खारट,तिखट,कडू व तुरट या सहाही चवींनी युक्त असा आहार असायला हवा. कारण आयुर्वेदानुसार एकाच रसाचा (चवीचा) आहार अधिक प्रमाणात, सतत सेवन करत राहणे हेच अनारोग्याचे मूळ आहे आणि म्हणूनच स्वस्थ माणसाने निरोगी राहण्यासाठी सहाही रसांचे सेवन करत राहावे. ऋतूचर्येच्या मार्गदर्शनानुसार करायचे इतकेच की त्या त्या ऋतुमध्ये त्या त्या ऋतूला अनुरूप अशा चवींचे सेवन अधिक करावे.(अष्टाङ्गहृदय १.३.५७)

आणखी वाचा: Health Specia: फूड फ्रीडम आणि चौरस आहार

Rakul Preet Singh Diet
Rakul Preet Singh Diet : सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत; रकुलने सांगितले डाएटचे सीक्रेट, वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Milk paneer or curd Which is healthiest dairy product
दूध, पनीर व दही यांपैकी कोणता पदार्थ आहे सर्वांत जास्त फायदेशीर? कसे करावे सेवन, घ्या तज्ज्ञांकडून जाणून….
winter healthy recipe in marathi mulyachi bhaji recipe how to prepare radish vegetable in winter
मुळ्याची भाजी न आवडणाऱ्यांसाठी अशी बनवाल तर नक्की खातील; जाणून घ्या पौष्टिक भाजीची सोपी रेसिपी
Winter special for lunch or dinner methi pulao recipe in marathi methi rise healthy food recipes in winter
पौष्टिकतेला चवीची जोड! हिवाळ्यात घरच्या घरी १० मिनिटांत बनवा मेथी पुलाव
Malai cauliflower recipe Different style recipe of making cauliflower for winter special
रोज काय भाजी करावी सुचत नाही? १ कांदा चिरून करा मलाई फ्लावर; बोटं चाटत रहाल अशी चमचमीत फ्लॉवरची भाजी
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
dudhi barfi recipe
अवघ्या काही मिनिटांत बनवा दुधी भोपळ्याची पौष्टिक बर्फी; वाचा साहित्य आणि कृती…

पावसाळ्यात गोड-आंबट-खारट की तुरट-कडू-तिखट?
अष्टाङ्गहृदय या ग्रंथामध्ये वर्षा ऋतुमध्ये गोड,आंबट व खारट या तीन चवीच्या आहाराचे सेवन करण्यास सांगितले आहे तर दुसरीकडे सुश्रुतसंहितेमध्ये तुरट,कडू व तिखट या तीन चवींचा आहार घेण्यास सांगितले आहे.आयुर्वेदाने केलेल्या या परस्परविरोधी मार्गदर्शनाचे स्पष्टीकरण काय?आयुर्वेदाने केलेल्या मार्गदर्शनाचा अर्थ तारतम्याने लावावा लागतो.पावसाळ्यामध्ये कोणत्या रसांचे सेवन आधिक्याने करावे याविषयी केलेल्या वरील दोन भिन्न मार्गदर्शनामागील तारतम्य समजून घेऊ.


अष्टाङ्गहृदयामध्ये सांगितल्याप्रमाणे पावसाळ्यात गोड,आंबट व खारट चवीचा आहार घ्यावा हे मार्गदर्शन प्रामुख्याने वातप्रकृती व्यक्तींना लागू होते. अशा व्यक्ती या सहसा सडसडीत किंबहुना किडकिडीत,हाडकुळ्या शरीराच्या असतात, त्यांच्या शरीरावर मांस व चरबी अगदी कमी प्रमाणात असते, त्यांच्या सांध्यांवर मांसाचे लेपण नसल्याने सांधे सहज दिसतात, हालचाली करताना सांध्यांमधून कटकट असा आवाज येतो. अस्थिर व्यक्तिमत्त्वाच्या,वाचाळ स्वभावाच्या,धरसोड वृत्तीच्या अशा या वातप्रकृती व्यक्तींना हाडे(bones), सांधे(joints), स्नायू(muscles), नसा(nerves), कंडरा(tendons) संबंधित काही ना काही तक्रारी सतत त्रास देत असतात आणि ऋतू पावसाळ्याचा असताना तर यांचे वातविकार अधिकच बळावतात. त्या वातविकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाताच्या विरोधी असलेले गोड-आंबट व खारट रस खाणे त्यांना हितकर होईल.या वातप्रकृतीच्या व्यक्तींच्या शरीराला अशक्तपणा जाणवू नये व शरीराचे बल वाढावे म्हणून सुद्धा गोड-आंबट व खारट चवीचे पदार्थ उपयुक्त पडतात, कारण हे तीनही रस बलवर्धक आहेत. मात्र वर म्हटल्याप्रमाणे गोड म्हणताना सहज पचतील असे गोड पदार्थ अपेक्षित आहेत.

आणखी वाचा: Health Special: सतत वेदना आणि थकवा देणारा ‘हा’ आजार कोणता?
सुश्रुतसंहितेनुसार पावसाळ्यात तुरट,कडू व तिखट या रसांचा (चवींचा) आहार आधिक्याने घ्यावा. पावसाळ्यामध्ये हवेत असणारा गारवा व ओलावा यामुळे मनुष्यांचे शरीर आर्द्र होते, अर्थात शरीरातला ओलावा वाढतो. या अतिरिक्त-अनावश्यक ओलाव्यालाच आयुर्वेदाने पावसाळ्यामधील विविध विकृतींचे मूळ मानले आहे. (सुश्रुतसंहिता ६.६४.६) आणि त्या ओलाव्याच्या परिहारार्थ तुरट,कडू व तिखट चवीचा आहार घेण्यास सांगितले आहे. कारण हे तीनही रस शरीरामध्ये कोरडेपणा वाढवणारे आहेत अर्थात शरीरामध्ये वाढलेला ओलावा शोषून घेण्याचा गुणधर्म यांमध्ये आहे. त्यात पुन्हा तुरट रसामध्ये ओलावा शोषण्याचा गुण अधिक प्रखरतेने असल्याने त्याचा उल्लेख प्रथम करुन तुरट चवीच्या आहाराचे सेवन आधिक्याने करण्यास सुचवले आहे.

विविध ग्रंथांमध्ये पावसाळ्यात काय खावंप्यावं याबद्दल सविस्तर लिहिलं आहे.
विविध ग्रंथ काय सांगतात?


शरीरामध्ये ओलावा वाढण्याचा धोका ज्यांना पावसाळ्यात पाण्यामध्ये वा उघड्यावर पावसामध्ये काम करावे लागते त्यांना आणि जे मुळातच शीत प्रकृतीचे असतात (म्हणजे ज्यांच्या शरीरात मुळातच थंडावा अधिक असतो) त्यांना प्रकर्षाने लागू होतो. इथे वाचकांच्या मनात प्रश्न उभा राहील की शरीरामध्ये ओलावा वाढतो आहे किंवा वाढला आहे हे कसे समजावे? तर शरीरामध्ये ओलावा वाढल्यामुळे शरीर सुजल्यासारखे वाटणे, शरीरामध्ये जडत्व जाणवणे, हालचाली मंद होणे, शरीरावर किंवा शरीराच्या एखाद्या अंगावर सूज येणे, वारंवार सर्दी-ताप-कफ-खोकल्याचा त्रास होणे, भूक मंदावणे,खाल्लेले अन्न नीट न पचणे,सकाळी उठल्यावर शरीर जड होणे वा आखडणे वगैरे लक्षणे दिसू शकतात. महत्त्वाचे म्हणजे पाण्याशी संपर्क आल्यावर वा पावसात गेल्यावर ही लक्षणे बळावतात. तसेच थंड पाणी, दूध-ताक-फळांचे रस वगैरे थंड द्रवपदार्थ, पचायला जड असणारे गोड पदार्थ खाण्यात आल्यानंतरसुद्धा ही लक्षणे वाढतात.साहजिकच अशी व्यक्ती गार पाणी, थंड द्रवपदार्थ, गोड पदार्थ, थंड हवा, पाणी, पाऊस यांपासून दूर राहाण्याचा प्रयत्न करते. अशा व्यक्तीसाठी शरीरामध्ये नकोसा झालेला ओलावा नियंत्रणात आणण्याचा नैसर्गिक मार्ग म्हणजे आहारामध्ये तुरट, कडू व तिखट चवींच्या पदार्थांचे सेवन वाढवणे. इतकंच नव्हे तर तुरट-कडू-तिखट या रसांनी शरीरातला ओलावा कमी करत असताना महर्षी सुश्रुतांनी शरीरात ओलावा वाढवेल असा द्रव आहार वर्ज्य करण्याचा सल्ला दिलेला आहे.


पावसाळ्यात तुरट,कडू व तिखट या रसांचा (चवींचा) आहार आधिक्याने घेण्याचा आयुर्वेदाने दिलेला सल्ला विशेषतः लागू होतो कफप्रकृती व्यक्तींना. ज्या व्यक्ती स्थूल,जाडजूड, वजनदार शरीराच्या असतात, ज्यांचे शरीर एकंदरच आकाराने मोठे असते, ज्यांच्या सांध्यांवर मांस-मेदाचे लेपण असल्याने सांधे दिसत नाहीत वा गोलाकार दिसतात आणि एकंदरच ज्यांच्या शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते अशा शांत-स्थिर व्यक्तिमत्त्वाच्या, सावकाश बोलणार्‍या, स्थिर बुद्धिच्या त्या कफप्रकृती व्यक्ती. यांना कफविकार आधिक्याने त्रस्त करत राहतात. पावसाळ्यात हवेत गारवा व ओलावा वाढला की कफप्रकृतीच्या व्यक्तींमध्ये वर दिलेली लक्षणे दिसण्याची शक्यता अधिक असते. कारण मुळातच कफप्रकृती व्यक्तींच्या शरीरात पाण्याचे प्रमाण तुलनेने अधिक असते आणि त्या शरीरपेशींना पाणी धरुन ठेवण्याची सवय असते. तर अशा कफप्रकृती व्यक्तींसाठी (मग त्यांना कफविकार होवोत वा न होवोत त्यांच्या साठी) पावसाळ्यात कडू-तिखट-तुरट चवीचा आहार हितकर, कारण हे तीनही रस कफविरोधी आहेत.


दुसरीकडे पावसाळ्या आधीच्या ग्रीष्मातल्या उन्हाळ्यात ज्यांच्याकडून शरीरामध्ये कफाचे (पाण्याचे) प्रमाण वाढेल अशा गोड, थंड आहाराचे व द्रव पदार्थांचे आधिक्याने सेवन झाले असेल त्यांनी लगेचच्या पुढच्या ऋतूमध्ये त्या कफाला कमी करण्यासाठी कडू-तिखट-तुरट चवीचा आहार घ्यावा. उन्हाळ्यात ज्यांनी शरीरामध्ये गोडवा वाढवणार्‍या कफवर्धक आंब्याचे नित्य सेवन केले होते, जे सातत्याने उन्हाळ्यात श्रीखंडासारखे गोडधोड पदार्थ वारंवार खात होते, जे आंब्याबरोबरच केळे, पेरु, सीताफळ, पेअर, कलिंगड, काकडी वगैरे फळे सातत्याने खात होते, एकंदरच उन्हाळ्यात थंडावा वाढवणारा आहार सातत्याने सेवन करत होते, ज्यांनी उन्हाळ्याचा उष्मा कमी करण्यासाठी म्हणून रोज आईस्क्रीम, फळांचे रस,नारळपाणी,सरबते वगैरे द्रवपदार्थ आधिक्याने व सातत्याने सेवन केले होते, जे सतत थंडगार पाणी पित होते आणि या गोडधोड,पौष्टिक,थंड व कफवर्धक आहाराला ज्यांनी व्यायामाची जोड दिली नव्हती व जे दिवसा झोपत होते अशा मंडळींच्या शरीरामध्ये वाढलेल्या पाण्याच्या रेणूंचे (कफाचे) पचन होण्यासाठी लगेच येणार्‍या पावसाळ्यामध्ये त्या कफविरोधी असलेल्या कडू-तिखट-तुरट चवीच्या आहाराचे सेवन करणे योग्य.