Water exercise information: आपण एरवी फिटनेससाठी योगा, चालणे, जिमला जाणे, सायकलिंग असे विविध व्यायामप्रकार करतो. पोहणे हाही एक अतिशय उपयुक्त असा व्यायामप्रकार आहे. पण, आता तुम्ही म्हणाल आम्हाला तर पोहता येत नाही, मग पाण्यात व्यायाम कसा करायचा? तर काळजी करू नका, यामध्ये पोहताच यायला हवे असे नाही. आपले पाय टेकत असतील इतक्या उंचीच्या तलावात आणि किमान पोहणे येईल असे लक्षात घेऊन आपण पाण्यात काही व्यायामप्रकार करू शकतो. या व्यायामप्रकारांचा फिटनेससाठी अतिशय फायदा होतो. हे व्यायामप्रकार कोणते आणि ते कसे करायचे याविषयी आरोग्यतज्ज्ञ डॉ. मिकी मेहता यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.

पाण्यातील वर्कआउट्समुळे स्नायू, सांधे आणि हाडांवर ताण कमी होतो. या व्यतिरिक्त अधिक कॅलरी बर्न करते आणि वजन कमी करण्यासही गती मिळते. कारण पाण्यात तुमचे शरीर आरामशीर होते आणि उत्साही होते. शरीर हलके वाटते आणि तुमच्या सांधे किंवा स्नायूंवर दबाव जाणवणार नाही.

फायदे काय आहेत?

पाण्यातील व्यायामामुळे तणावाची पातळी कमी होते, हाडे आणि सांधे मजबूत होतात, प्रतिकारशक्ती, चपळता, तग धरण्याची क्षमता सुधारते. हृदयाचे आरोग्य वाढते आणि तुमचे वजन नियंत्रणात राहते. पाण्यामध्ये तुम्ही जमिनीवर केलेल्या व्यायामापेक्षा जास्त कॅलरी बर्न कराल. हे विशेषत: ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि गुडघे, घोटे आणि पाठीसारख्या सांधेदुखीतून बरे होणाऱ्यांसाठी चांगले आहेत.

वॉटर वर्कआउट्स कोणते आहेत?

पाण्यात जॉगिंग – ज्या प्रकारे जमिनीवर जॉगिंग केले जाते त्याच प्रकारे पाण्यातही जॉगिंग करता येते, त्याचा जास्त फायदा होतो. कमरेएवढ्या पाण्यामध्ये थोडेसे वाकावे व हळूहळू जॉगिंग चालू करावे. सुरुवातीला बारला पकडून जॉगिंग केले तरी चालू शकेल. स्पीड कमी जास्त करू शकता. टाचा न टेकवता फक्त पायांच्या चवड्यावरती हळूहळू जॉगिंंग करावे.

स्कॉट व्यायाम – जॉगिंग झाल्यानंतर पायामध्ये तेवढ्याच अंतरात श्वास घेत खाली जावे व श्वास सोडत वरती यावे. यामध्ये मांड्या आणि पोटऱ्या यांचा काटकोन करावा. गुडघे दुखत नसतील तर पाय थोडे खाली गेले तरी चालेल. सुरुवातीला आधार घ्यावा. पाठीचा कणा ताठ पण कडक नको. त्याचे अंतर वाढून वाईड स्कॉटही करू शकता. यामुळे मांड्या, नितंब, पोटऱ्या यांची ताकद वाढते, जमिनीवर गुडघ्यांवर जो ताण आलेला असतो तो पाण्यात येणार नाही.

पायांची हालचाल – पाण्यात सुरुवातीला रेलिंग धरा. हळूहळू तुम्ही तुमचे पाय वरच्या दिशेने हलवू शकता. नंतर उजवीकडे आणि डावीकडे बाजूला हलवू शकता.

हेही वाचा >> तुम्हीही थंडगार ‘मोहब्बत का शरबत’ पिताय का? थांबा लक्षात घ्या आहारतज्ज्ञांनी सांगितलेला धोका

खोल पाण्यात चालणे – एकदा तुम्ही कमरेपर्यंत पाण्यात चालण्यात यशस्वी झालात तर हळूहळू खोल पाण्यातही चालणे सुरू करू शकता. या काळात तुमचे हात फिरते असायला हवेत. पाठ एकदम सरळ आणि पोटाचे स्नायू ताठ असायला हवेत, त्यामुळे व्यायामाचा पूर्ण लाभ होईल. त्याशिवाय तुम्ही वॉटर जॉगिंगही करू शकता.