Mental Stress pranayam : तणाव किती हानिकारक आहे याबद्दल आपण बरेच काही ऐकले आहे. तणाव हा माणसाचा सर्वांत मोठा शत्रू आहे. त्यामुळे अनेक आजारांचा धोका वाढत जातो. या तणावामुळे जगभरातील लोकांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर तणावाचे व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे. तणाव येत असेल, तर तुम्ही घरीच काही गोष्टी करू शकता. अवघ्या पाच मिनिटांच्या योगानं तुम्ही तणावमुक्त होऊ शकता.
अशा या योगानं नैराश्य आणि चिंता लक्षणीयरीत्या कमी होण्यास मदत होत आहे. योगातज्ज्ञ कामिनी बोबडे यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. श्वासोच्छवासाच्या योगानं ताणतणावाला दूर ठेवण्यास मदत मिळते; ज्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते आणि अतिरिक्त कार्बन डाय-ऑक्साइड बाहेर टाकला जातो. तणाव तुमच्या रक्तदाब आणि हृदय गतीवर विपरीत परिणाम करतो.
शवासन
हे आसन अन्य आसने केल्यानंतर शरीर आणि मनाला आराम मिळावा यासाठी अखेरीस केले जाते. या आसनात मनुष्य हालचाल न करता, शवासारखे पडून राहतो म्हणूनच त्यास शवासन म्हणतात. या आसनामुळे शारीरिक, मानसिक थकवा, ताण कमी होण्यास मदत होते. उच्च रक्तदाब, हृदयरोग, निद्रानाश यांवरही हे आसन उपुयक्त आहे.
शवासन कसे करावे?
१. जमिनीवर चटई टाकून पाठीवर झोपावे.
२. संपूर्ण शरीर सैल सोडा आणि डोळे बंद करा.
३. हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने जमिनीवर ठेवावेत.
४. हळूहळू श्वासावर लक्ष केंद्रित करा; मात्र तुम्हाला झोप लागणार नाही याची दक्षता घ्या.
५. पाच ते दहा मिनिटे या स्थितीत राहा.
अशा प्रकारे उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी ही योगासने करा आणि निरोगी व आनंदी राहा.
योगिक श्वसन किंवा प्राणायाम म्हणजे काय?
‘प्राण’ म्हणजे वैश्विक जीवनशक्ती; तर ‘आयाम’ म्हणजे तिला वाढविणे. आपल्या शारीरिक आणि सूक्ष्म स्तरांसाठी प्राणशक्तीचे खूप महत्त्व आहे; प्राणशक्तीशिवाय आपले शरीर नष्ट होऊ शकते, तिच्यामुळेच आपण जिवंत आहोत. श्वसनाच्या माध्यमातून प्राणावर नियंत्रण मिळविणे म्हणजे प्राणायाम. या नासिकांद्वारे श्वास घेणे व सोडणे यांद्वारे ही प्रक्रिया केली जाते.
योगिक श्वासोच्छ्वास : ही क्रिया खाली दिल्याप्रमाणे दोन भागांत विभागली गेली आहे.
ओटीपोटात श्वास घेण्यासाठी या चरणांचे अनुसरण करा:
१. उजवा हात नाभीवर आणि डावा हात छातीच्या वरच्या भागावर ठेवा..
२. आता तुमच्या पोटाच्या भागावर पूर्ण लक्ष ठेवून आणि जागरूक राहून खोल आणि दीर्घ श्वास घ्या.
३. नंतर पूर्ण श्वास सोडा. आता तुमचे पोट पूर्णपणे फुगल्यासारखे वाटेल.
हेही वाचा >> तुम्ही रोज रिकाम्या पोटी आल्याचा तुकडा चघळल्याने तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डॉक्टरांकडून जाणून घ्या…
नाडीशोधन
शारीरिक व मानसिक ताणतणाव घालविण्यासाठी प्राणायामाची ही क्रिया अधिक महत्त्वाची आहे. प्राणायामाच्या या कृतीमुळे श्वसनमार्ग मोकळा होतो आणि रक्ताभिसरण सुधारते.
कपालभाती
कपालभाती ही श्वसनाचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी रामबाण औषधापेक्षा कमी नाही. कपालभाती रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढविण्यास मदत करते. या योगासनामुळे फुप्फुसाची क्षमता वाढते. त्याचबरोबर शरीरात साचलेले विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात. तसेच, जर तुम्हाला तणावाचा त्रास होत असेल, तर तुमच्यासाठी हे खूप प्रभावी आसन ठरू शकते. कपालभातीमुळे तुम्हाला मानसिकदृष्ट्याही शांत झाल्याची अनुभूती मिळेल.