Does Yolk Colour Indicate Egg Quality: अन्नातील भेसळीच्या घटना, हॉटेल्समधील अस्वच्छतेचे व्हिडीओ यामुळे अगोदरच मनात भीती असताना आता एक नवीन सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये केलेल्या दाव्यानुसार, पांढऱ्या व तपकिरी रंगाच्या अंड्यांमधील बलकाचा रंग हा वेगळा असतो. यामुळे फक्त रंगच नाही तर या अंड्यांमधील पोषण मूल्यामध्येही फरक असू शकतो. हा फरक लक्षात घेता आपण खात असलेले अंडे हे चांगले आहे की नाही याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. काही नेटकऱ्यांनी या व्हिडीओखाली कमेंट करत क्रिएटरने दिलेली माहिती चुकीची असल्याचे म्हटले, रंगामधील फरक हा ब्रीड आणि आहारातील फरकांमुळे असल्याची माहिती नेटकऱ्यांनी दिली आहे. दोन्ही बाजूंनी वेगवेगळी मते मांडली जात असताना आम्ही शेवटी तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचे ठरवले.
प्रियांका बांदल, वरिष्ठ आहारतज्ज्ञ , मणिपाल हॉस्पिटल्स, बाणेर, पुणे यांनी सांगितले की, “बहुतेक अंडी पांढरी किंवा तपकिरी असली तरी ती क्रीम, गुलाबी, निळी आणि हिरवी अशा रंगातही येतात. कोंबडीच्या कानाच्या पाळ्यांवरून अंड्याचा रंग ओळखण्यास मदत होऊ शकते. सर्व अंडी सुरुवातीला पांढरी असतात कारण टरफले कॅल्शियम कार्बोनेटपासून बनतात. अंडी तयार झाल्यावर कोंबडीच्या अनुवांशिकतेवरून त्यांना रंग मिळतो. ज्या कोंबड्यांच्या कानाच्या पाळया हलक्या पुसट रंगाच्या असतील तर त्या कोंबड्यांचीही पिसे पांढरी असतात व त्या सुद्धा पांढरी अंडी देतात. ज्यांना रंगीत पिसे आणि कानाच्या पाळ्या जास्त गडद असतात त्या बहुधा रंगीत अंडी देतात.
कोंबडीच्या आहाराचा सुद्धा अंड्यातील बलकाच्या रंगावर परिणाम होतो, डॉ बांदल म्हणतात की, “समजा, उदाहरणार्थ, जर कुरणात वाढलेली कोंबडी पिवळसर-केशरी रंगद्रव्य असलेली पाने खात असेल तर अंड्यातील पिवळ बलक अधिक केशरी रंगाचा असू शकतो. जर ती मुख्यतः कॉर्न- किंवा धान्य-आधारित आहार खात असेल, तर अंड्यातील बलक फिकट पिवळा होण्याची शक्यता असते. संशोधनात असे दिसून आले आहे की गडद, अधिक रंगीबेरंगी व हलक्या रंगछटांच्या अंड्यातील बलकामध्ये सुद्धा समप्रमाणातच प्रथिने आणि चरबी असते.”
कोंबड्यांच्या वेगवेगळ्या जाती आणि वयाचा देखील अंड्यातील बलकाच्या रंगावर प्रभाव पडू शकतो पण सर्वात मोठं योगदान हे आहाराचंच असतं, असं डाएटिशन अमरीन शेख, प्रमुख आहारतज्ज्ञ, वोक्हार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल यांनी नमूद केले.
डॉ. विनित बंगा, सहयोगी संचालक, न्यूरोलॉजी, BLK मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांनी असे सांगितले की, कोंबड्यांचा आहार, जसे की हिरव्या वनस्पती, मका आणि झेंडूच्या पाकळ्यांमध्ये कॅरोटीनॉइड मुबलक प्रमाणात असते. हे कॅरोटीनॉइड्स अंड्यातील पिवळ्या बलकामधील व्हिटॅमिन ए वाढवू शकतात. या शिवाय बलकामध्ये चरबी, जीवनसत्त्वे (A, D, E, K) आणि लोह आणि सेलेनियम सारखी खनिजे सुद्धा असतात. अंड्यातील बलकाचा पिवळा रंग हा अंड्याचा दर्जा, ताजेपणा किंवा कोंबडीच्या आरोग्याचा सूचक नाही असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले. रंगातील बदल हा फार फार तर चव व पोत यांच्यामध्ये फरक निर्माण करू शकतो पण त्याचा पोषण मूल्याशी थेट काहीच संबंध नाही.
त्यामुळे, तुम्ही पांढरी अंडी घ्या, तपकिरी अंडी घ्या किंवा अन्य कोणती, अंड्याची निवड बलकाच्या रंगापेक्षा वैयक्तिक पसंती आणि आहाराच्या गरजांवर आधारित असावी, असे डाएटिशियन शेख यांनी स्पष्ट केले.