White Or Whole Wheat Bread Which Is Better: तुम्हाला ठणठणीत राहायचं असेल तर पांढऱ्या विषापासून शक्य तेवढं लांब राहायला सुरुवात करावी असं अनेक तज्ज्ञ सांगतात. आता हे पांढरं विष म्हणजे काय तर आपल्याच स्वयंपाक घरातील काही वस्तू, उदाहरणार्थ, मीठ, साखर, मैदा इत्यादी. मर्यादेपेक्षा अति प्रमाणात व वारंवार हे पदार्थ खाल्ल्याने शरीराला घातक ठरू शकतात. यात साखर व मीठ हे आपल्या नेहमीच्या जेवणातील, नाष्ट्यातील अविभाज्य घटक असल्याने त्यांचा वापर कमी करणं थोडं कठीण पडतं पण मैदा हा निश्चितच आहारातून वगळता येऊ शकतो. मैद्याचे पाव टाळण्याचा सल्ला तर सर्वच आहारतज्ज्ञ देतात. आपल्यालाही त्याचे फायदे तोटे माहित असतात पण कितीही ठरवलं तरीही कधीतरी मस्तपैकी गरम भाजलेला, बटर लावून शेकलेला पाव खायची इच्छा होतेच. अशावेळी नेमका कोणता पाव खावा याविषयी आपण आज दिका प्रेमानी, क्लिनिकल डायटीशियन, सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल यांनी इंडियन एक्सप्रेसला केलेलं मार्गदर्शन जाणून घेणार आहोत..
वेदिका सांगतात की, अनेकदा पांढरा ब्रेड व संपूर्ण धान्य (Whole Wheat) ब्रेड यांच्यापैकी कोणती निवड करावी यात संभ्रम असतो. जर तुम्हाला निवड करायचीच असेल तर आधी पांढरे आणि संपूर्ण गव्हाचे ब्रेड कशापासून तयार होतात हे जाणून घेणे आवश्यक आहे.
प्रेमानी यांच्या म्हणण्यानुसार पांढरा ब्रेड रिफाइंड पिठापासून बनवला जातो, ज्यामध्ये धान्यातील कोंडा आणि जंतू काढून टाकले जातात पण या प्रक्रियेत अनेकदा काही पोषक सत्व सुद्धा नष्ट होतात. तर, संपूर्ण गव्हाचा ब्रेड संपूर्ण गव्हाच्या पिठापासून बनवला जातो ज्यामध्ये नैसर्गिकरित्या पिकवलेल्या धान्याचा पूर्ण अंश असतो. त्यामुळेच हा संपूर्ण धान्याचा ब्रेड पांढर्या ब्रेडच्या तुलनेत अधिक फायबर आणि जीवनसत्त्वे राखून पोषक पर्याय ठरतो.
दोन्ही ब्रेडमधील पोषणसत्व कसे वेगळे आहे?
प्रेमानी यांच्या माहितीनुसार, व्हाईट ब्रेड आणि संपूर्ण गव्हाच्या ब्रेडची पौष्टिक गुणवत्ता त्यांच्या बनवण्याच्या प्रक्रियेमुळे बदलते. संपूर्ण गव्हाच्या ब्रेडच्या तुलनेत व्हाईट ब्रेडमध्ये फायबरचे प्रमाण कमी असते.
संपूर्ण गव्हाच्या ब्रेडमध्ये नैसर्गिकरित्या जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, ज्यात बी जीवनसत्त्वे, लोह आणि मॅग्नेशियम समाविष्ट असतात, तर व्हाईट ब्रेड बनवताना बी जीवनसत्त्वे व खनिजांचे प्रमाण कमी होते.
Whole Wheat Bread खाण्याचे फायदे
संपूर्ण धान्याचा ब्रेड हा पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारख्या इतर पोषक घटकांसह, रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि संपूर्ण हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकतो. तर या ब्रेडच्या सेवनाने तुम्हाला संतुष्ट वाटते ज्यामुळे वारंवार भूक लागण्याचे प्रमाण कमी होते.
संपूर्ण धान्याच्या ब्रेडचा आणखी एक फायदा म्हणजे याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत होते.
संपूर्ण गव्हाच्या ब्रेडमध्ये आढळणारे विद्राव्य फायबर, आतड्यातील पित्ताची निर्मिती व पुनर्शोषण रोखून व्हिसेरल फॅट कमी करण्यास मदत करू शकतात.
हे ही वाचा<< लिंबू सरबत प्यायल्याने किडनी स्टोन विरघळून लघवीमार्गे बाहेर पडतो? तुमची किडनी सुदृढ आहे का कसे ओळखाल?
मात्र लक्षात घ्या संपूर्ण धान्याचा ब्रेड हा पांढऱ्या ब्रेडला पर्याय आहे. फक्त ब्रेड हा कधीच तुम्हाला आहारातील मुख्य घटक म्हणून निवडणे फायद्याचे ठरत नाही. चौरस आहार निवडण्यासाठी तुमच्या डाएटमध्ये फळे, भाज्या, प्रथिने आणि निरोगी फॅट सुद्धा सामाविषय असायलाच हवे.