White Spots On Nail: नखांवर पांढऱ्या रंगाच्या उभ्या- आडव्या रेषा येणे हे शरीरातील कॅल्शियमच्या कमीचे लक्षण आहे असे आपण आजवर अनेकदा ऐकले असतील. पण अलीकडेच यामागील सत्य समोर आले आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार तुमच्या नखावर उमटणाऱ्या पांढऱ्या रेषा हे कॅल्शियमची कमतरता दर्शवत नाहीत. आहारतज्ज्ञ पूजा माखिजा यांच्या माहितीनुसार, नखावर येणारे हे डाग तुमच्या हृदय, फुफ्फुसे व हाडांना आवश्यक सत्व मिळत नसल्याचे लक्षण आहे. आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाच्या अवयवांना दिवसाला शेकडो एन्झाइम्सची गरज असते, त्यातीलच एक म्हणजे झिंक. यात समस्या अशी आहे की मानवी शरीर झिंक शरीरात जतन करून ठेवू शकत नाही. झिंकची कमतरता असल्यास शरीर नखांवरील पांढऱ्या रेषांमधून संकेत देत असते.
शरीरात झिंक कमी असल्यास दिसतात ‘ही’ लक्षणे
झिंकची कमतरता ओळखणे कठीण आहे कारण झिंक शरीरात रक्तामार्फत अगदी छोट्या पेशींमध्ये विरघळलेले असते. त्यामुळे रक्त चाचणीत झिंकची कमतरता ओळखता येईलच असे नाही. मात्र खालील काही लक्षणांमधून आपण झिंक कमी झाल्याचे ओळखू शकता.
- थकूनही झोप न लागणे
- सतत सर्दी- खोकला- ताप असे आजार होणे
- सेक्स ड्राइव्ह कमी होणे
- वजन अचानक वाढू लागते
- दात किडतात आणि हिरड्यांमधून रक्त येते
- हातावर आणि चेहऱ्यावर सुरकुत्या
झिंकची कमतरता भरून काढण्यासाठी काय खावे?
जर आपण मांसाहार करत असाल तर ऑयस्टर, खेकडा, मांस आणि अंडी असे पदार्थ झिंकने समृद्ध असतात. तर शाकाहारी मंडळींसाठी मशरूम, पालक, ब्रोकोली, लसूण, काळे चणे, बीन्स, भोपळा अशा भाज्या उत्तम पर्याय ठरतील. दुग्धजन्य पदार्थ, डार्क चॉकलेट सुक्या मेव्याचे सेवनही झिंकची कमी भरून काढण्यास मदत करू शकते. याशिवाय धान्यांमध्ये कॉर्नफ्लेक्स, मुसली, गहू, ब्राऊन राईस, ओट्स व क्विनोआ यांचे सेवन करणे गुणकारी ठरू शकते.
हे ही वाचा<< किडनी निकामी होण्याआधी ‘या’ अवयवांना होतात प्रचंड वेदना; युरिक ऍसिड वाढल्याचे संकेत ओळखा
शरीराला किती प्रमाणात झिंक आवश्यक आहे?
झिंकचे जास्त सेवन हे शरीरात रक्तामध्ये तांबे आणि लोहाच्या शोषणात व्यत्यय आणू शकते. यातून मळमळ, उलट्या, अतिसार आणि पोटदुखी होऊ शकते. प्रौढांमध्ये दररोज ४० मिलीग्रामहुन जास्त झिंकचे सेवन नुकसानकारक ठरू शकते. यामुळे ताप, खोकला, डोकेदुखी आणि थकवा यासारखी लक्षणे दिसू शकतात. शिवाय, झिंक सप्लिमेंट्स प्रतिजैविकांच्या शोषणात व्यत्यय आणतात साइड इफेक्ट्सचा धोका कमी करण्यासाठी, वैद्यकीय सल्ला घेऊनच झिंकयुक्त पदार्थांचे व औषध गोळ्यांचे सेवन करावे. वैद्यकीय देखरेखीशिवाय, दररोज ४० मिलीग्रामहुन अधिक झिंक सप्लिमेंट्स चुकूनही घेऊ नका.