Loneliness Causes Effect and Treatment : जगभरात एकाकीपणाची समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. विविध कारणांमुळे लोक एकाकीपणाचा सामना करतायत. विशेषत: वाढत्या तंत्रज्ञानामुळे एकाकीपणाची समस्या आणखीनच वाढतेय. लोकांना एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ नाही किंवा तशी मानसिकता आता पाहायला मिळत नाही. त्यामुळे लोक दिवसेंदिवस या समस्येत आणखी गुरफटताना दिसत आहेत. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने ही समस्या जागतिक आरोग्यासाठीही गंभीर धोका निर्माण करणारी असल्याचे घोषित केले आहे. यूएस सर्जन जनरलने एकाकीपणाची समस्या आरोग्यासाठी दिवसाला १५ सिगारेट ओढण्याइतकी घातक असल्याचे म्हटले आहे.
यामुळे जागतिक आरोग्य संस्थेने एकाकीपणाच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय मिशन सुरू केले आहे, ज्यामध्ये सामाजिक संबंधांना प्रोत्साहन देऊन आणि सर्व उत्पन्न स्तरांच्या देशांमध्ये उपाययोजना वाढवून एकाकीपणाचा सामना करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
जागतिक आरोग्य संस्थेचे महासंचालक डॉ. टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, जगभरात समाजापासून एकटे राहण्याची सवय आणि एकटेपणामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. पुरेसे मजबूत सामाजिक संबंध नसलेल्या लोकांना स्ट्रोक, चिंता, स्मृतिभ्रंश, नैराश्य, आत्महत्या आणि बरेच काही होण्याचा धोका जास्त असतो.”
यूएस सर्जन जनरलचे डॉ. विवेक मूर्ती यांनी एक गंभीर इशारा देत म्हटले की, एकाकीपणामुळे आरोग्यावर दिवसाला १५ सिगारेट पिण्याइतकेच धोकादायक परिणाम होत असतात. यामुळे लठ्ठपणा आणि शारीरिक निष्क्रियतेशी संबंधित आजारांपेक्षाही हा आजार गंभीर आहे. एकाकीपणामुळे सार्वजनिक आरोग्यावरही गंभीर परिणाम होत आहे; अनेकदा व्यक्ती यात स्वत:ला इतरांपेक्षा कमी लेखू लागते.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, एकाकीपणामुळे स्मृतिभ्रंश होण्याचा धोका ५० टक्क्यांनी वाढतो आणि वृद्धांमध्ये कोरोनरी धमनी रोग किंवा स्ट्रोकचा धोका ३० टक्क्यांनी वाढतो. संशोधनातून असेही समोर आले की, ५ ते १५ टक्के किशोरवयीन मुलांना अनेकदा एकटेपणाचा सामना करावा लागतो. ही आकडेवारी अधिकदेखील असू शकते.
सायकोलॉजिस्ट स्मृती भारद्वाज यांनी अधोरेखित केले की, एकाकीपणामुळे शारीरिक आरोग्यावर अनेक नकारात्मक परिणाम होऊ शकतात, ज्यात थकवा, झोपेची समस्या, तीव्र शरीर वेदना, हृदयविकाराचा धोका, स्ट्रोक, स्मृतिभ्रंश आणि अकाली मृत्यू यांचा समावेश होतो. याव्यतिरिक्त एकाकीपणामुळे व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होणे, निराशेची भावना, चिंता, थकवा आणि कोणतेही काम करण्यात उत्साह, प्रेरणा नसणे यांसारख्या मानसिक आरोग्याच्या समस्यांचाही सामना करावा लागू शकतो.
NumroVani चे अधिकारी सिद्धार्थ एस कुमार यांनी नमूद केले की, व्यक्ती एकाकीपणाचा सामना करण्यासाठी धूम्रपान, मद्यपान, इतर घातक नशा किंवा काहीवेळा वाईट सवयींच्या आहारी जाऊ शकते.
एकटेपणा ही सहसा व्यक्तिनिष्ठ भावनिक अवस्था असते, ज्यात व्यक्तीला कुटुंब, मित्र परिवारात वावरत असतानाही सतत एकटेपणाची जाणीव होत राहते.
एकाकीपणाची भावना वाढण्यामागे पिढीतील अंतर, राहणीमानातील बदल (जसे की विभक्त कुटुंबांमध्ये वाढ), सोशल मीडियाचा अतिवापर तसेच आर्थिक अस्थिरता यांचा समावेश होतो. करोनामुळे ठप्प झालेल्या आर्थिक आणि सामाजिक उपक्रमांमुळे एकाकीपणाची समस्या आणखी तीव्र होताना दिसली.
एकाकीपणाचा सामना करण्यासाठी कोणताही रामबाण उपाय नसला तरी काही गोष्टींच्या आधारे तुम्हाला त्यातून बाहेर पडण्यास काही प्रमाणात का होईना मदत होऊ शकते. यामुळे एकाकीपणाचा सामना करणारे खालील टिप्स नक्की फॉलो करू शकता.
वैयक्तिक पातळीवर एकाकीपणाचा कसा कराल सामना, जाणून घ्या टिप्स
१) स्वत:ची काळजी घ्या
शरीर, मन आणि आत्मा यांना सतत आयुष्यातील फक्त चांगल्या गोष्टींचीच जाणीव करुन द्या, यासाठी तुम्हाला आधी सर्व काही ठीक होईल अशी भावना ठेवावी लागेल. तसेच स्वत:ची काळजी घ्यावी लागेल.
२) छंद, आवड जोपासा
तुम्हाला आनंद देणारे छंद किंवा आवड जोपासा, स्वत:ला सतत व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करा. यासाठी चित्रकला, फोटोग्राफी, ट्रेकिंग, हस्तकला, वाचन तुम्हाला आवडेल ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करा, यासाठी नियोजित वेळ द्या.
३) सामाजिक कार्यात मन रमवा
विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घ्या, तिथे तुमचा वेळ द्या. जसे की वृद्धाश्रम, अनाथाश्रम किंवा स्वयंसेवी संस्थांमध्ये जाऊन स्वयंसेवक म्हणून काम करा.
४) नातेसंबंध सुधारा
तुम्हाला आवडेल त्या व्यक्तीशी मनमोकळेपणाने बोला. (पण ती व्यक्ती विश्वासातील असू दे) चांगले मित्र-मैत्रिणी बनवा, घरात तुमच्या आवडत्या व्यक्तीबरोबर बोला, त्यांच्यासोबत वेळ घालवा.
५) ध्यान, योग, व्यायाम करा
मन शांत, प्रसन्न आणि नेहमी उत्साही ठेवण्यासाठी तुम्ही ध्यान, योगा किंवा व्यायाम करा. यासाठी संकोच न करता यातील अनुभवी प्रशिक्षकाची मदत घेऊ शकता.