‘म्हशीचं दूध ए २ म्हणून वापरलं जाऊ शकतं का? मी गेले अनेक महिने म्हशीचंच दूध सुरु केलंय’, शिवानीने सांगितलं. तिचा मुद्दा असा होता – जर दुधाच्या पाकिटावरच ए २ दूध असं लिहिलंय आणि ते इतक्या नामांकित कंपनीचं असेल तर त्यांनी काहीतरी विचार करूनच बाजारात ए २ असं पाकिटावर लिहिलंय.
‘म्हशीचं दूध पण जर ए २ असेल तर का एवढं महागड्या ए २ गायीच्या दुधाचा गाजावाजा करायचा? गायीचं महागडं ए २ दूध आणि म्हशीचं त्यामानाने कमी दरात उपलब्ध असणारं दूध याबद्दल एक वेगळाच विचार जनमानसात बघायला मिळतो.
आपण या आधीच्या अनेक लेखांमध्ये ए २ दुधाबद्दल वाचलंय .आजच्या लेखात आणखी थोडं देशी ए २ दुधाबद्दल!
भारतीय गायीच्या प्रजातींमध्ये ए २ एंझाइम म्हणजेच बीटा केसीन प्रथिने आढळून येते. हे एंझाइम शरीरातील ग्लुकोजवर नियंत्रण राखते आणि पचायला देखील हलके असते. देशी गायीच्या दुधाची खासियत काय असते ते जाणून घेऊया.
देशी गायीपासून मिळणारे दूध रसाळ असते. १ कप दुधामध्ये ३ ते ४ % मेद असते. या दुधात मानवी दुधाइतके प्रथिने असतात त्यामुळे लहान मुलांसाठी हे सर्वोत्तम मानले जाते. हाडांच्या मजबुतीसाठी उत्तम पोषक द्रव्य म्हणून ओळखले जाते. कॅज्युगेटेड लिनोलिइक अॅसिड नावाचा पदार्थ या दुधामध्ये उत्तम प्रमाणात आढळतो ज्याने वजन संतुलित राहण्यासाठी मदत होते. ज्यांना कफ होतो त्यांना हे दूध अतिशय उपयुक्त ठरते. ए २ दूध केवळ एकाच देशी गायीच्या प्रजातीपासून मिळते का? याचं उत्तर आहे- नाही.
भारतात गीर गायीचं दूध प्रसिद्ध आहे परंतु ए २ दूध देणाऱ्या आणखी प्रजाती आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर गीर, साहिवाल, राठी, थारपारकर बेलाही , कोकण कपिल ,बद्री, कंकरेंज, लाल सिंधी यासारख्या प्रजातीच्या गायीचे दूध देखील ए २ दूध आहे.
या दुधात देखील तितकीच आरोग्यदायी पोषकतत्त्वं आहेत. त्यामुळे खरं तर भारतीयांनी टेट्रापॅकऐवजी देशी गायीचे दूध नियमितपणे आहारात समाविष्ट करायला हरकत नाही.
आता पाहूया म्हशीच्या ए २ दुधाबद्दल !
म्हशीचे दूध ए २ दूध आहे मात्र यात असणाऱ्या स्निग्ध पदार्थाच्या प्रमाणामुळे म्हशीचे दूध तितकेसे पोषक मानले जात नाही. याउलट म्हशीचे दूध मुळातच घट्ट असते. आणि हा घट्टपणा त्यात असणाऱ्या स्निग्ध पदार्थांमुळे अर्थात फॅट्समुळे आहे. १ कप म्हशीच्या दुधामध्ये १२ % स्निग्ध पदार्थ किंवा चरबी आहे.
म्हशीच्या दुधात ए २ म्हणजेच बीट केसीन प्रथिने आहेत का याचं उत्तर आहे हो! मात्र या दुधात ए २ बीट केसीन सोबत मेदाचे प्रमाण देखील जास्त आहे ज्यांना वारंवार खोकला होतो त्यांनी शक्यतो म्हशीचे दूध पिणे टाळावे.
म्हशीचं दूध पिताना त्यातील मलई काढून पिणे उत्तम मानले जाते मात्र या मलईमध्येच कॅल्शिअमचे उत्तम प्रमाण असते. त्यामुळे शक्यतो संपूर्ण मलई काढून टाकू नये. म्हशीच्या दुधातील अतिरिक्त स्निग्धांशामुळे वजन वाढविण्यासाठी म्हशीचे दूध उत्तम मानले जाते.
लहान मुलांसाठी मात्र गायीचे ए २ दूध उत्तम मानले जाते. त्यामुळे बाजारात असणारे म्हशीचे दूध जरी असले तरी पोषक तत्त्वांमध्ये गायीचे ए २ दूध उत्तम मानले जाते.
ज्यांना हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे त्यांनी मात्र दूध पिताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कारण अशा स्त्रियांमध्ये दुधातील लॅक्टोज आणि शर्करा हा महत्वाचा मुद्दा असतो. त्यामुळे जर अपचन होत असेल तर दूध न पिणे उत्तम आणि जर अपचन होत नसेल किंवा दुधाची अॅलर्जी नसेल आहारात दूध नक्की समाविष्ट करावे आणि संकरित गायीच्या दुधाऐवजी देशी गायीच्या दुधाचाच समावेश करावा.
अलीकडे पनीर, तूप, दही यासाठी देशी गायीच्या दुधाचा वापर वाढलाय हे सुखकारक चित्र आहे.