वाताचा संचय काळ म्हणजे पावसाळ्याच्या आधीचा उन्हाळा म्हणजे ग्रीष्म ऋतु होय. संचय म्हणजे जमणे किंवा साठणे अथवा साचणे. वातपित्तकफ या तीन दोषांची शरीरामधील विशिष्ट स्थाने आहेत.(वाताची प्रमुख स्थाने म्हणजे पक्वाशय (मोठे आतडे), कटी, सांधे, कान, हाडे, त्वचा वगैरे). त्या-त्या स्थानांमध्ये तो-तो दोष वाढतो- जमतो, त्याला ‘संचय’ असे म्हटले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपण आहारविहारात केलेल्या चुकांमुळे दोष वाढतो, मात्र तो मर्यादेमध्ये आपल्या स्थानामध्येच फक्त वाढतो. या संचय अवस्थेमध्येच आपण योग्य ती काळजी घेतली तर पुढे जाऊन त्या दोषाचा प्रकोप होत नाही. पण जर चुका तशाच सुरु राहिल्या तर दोषांचा प्रकोप होतो व त्यानंतर दोष शरीरभर पसरतात आणि जिथे एखादा अवयव-अंग आधीच दुर्बल झालेले असेल त्याठिकाणी त्या दोषामुळे रोग निर्माण होण्याची शक्यता असते. ही झाली रोग निर्माण होण्याची सर्वसाधारण प्रक्रिया.

हेही वाचा… आहारवेद : रक्तवर्धक कुळीथ

निसर्गचक्रामध्ये मात्र एका विशिष्ट ऋतूमध्ये दोषाचा संचय होतो, त्यापुढच्या ऋतूमध्ये प्रकोप होतो आणि त्यानंतरच्या ऋतूमध्ये प्रशम होतो अर्थात दोष स्वतःहून शांत होतो. इथे दोषांचा चय-प्रकोप हा जसा ऋतुकाळानुरूप होतो , तसाच तो आहारविहारावरही अवलंबून असतो, हे शास्त्राचे सांगणे सदैव ध्यानात घ्यावे. ते यासाठी की आपल्या शरीरात होणारी एखादी विकृती ही केवळ सभोवतालच्या वातावरणामुळेच आहे असे म्हणून आपल्या खाण्यापिण्याच्या वा एकंदरच जीवनशैलीमध्ये काहीच चुका होत नाहीत असे समजून आपण काळावर दोष द्यायला मोकळे आणि आपल्या आहारविहारातल्या चुका करत राहायलाही मोकळे! वास्तवात त्या-त्या ऋतूमध्ये होणारा त्या-त्या दोषाचा संचय त्या दोषविरुद्ध आहारविहार घेतल्यास कमीतकमी होईल. तसाच त्या-त्या ऋतूमध्ये होणारा त्या-त्या दोषाचा प्रकोप त्या दोषाच्या विरोधी आहारविहार घेतल्यास कमीतकमी तीव्रतेने होईल आणि
रोगकारक होणार नाही. त्या-त्या ऋतूमध्ये ज्या दोषाचा संचय वा प्रकोप असेल त्या अनुरूप आहार घेऊन त्या दोषांना प्राकृत करुन रोग होऊ न देणे, हेच तर ऋतुचर्येचे उद्दिष्ट आहे.

पावसाळ्यात वातप्रकोप कसा होतो?

ग्रीष्मातल्या उन्हाळ्यामध्ये जेव्हा सूर्याच्या प्रखर किरणांमुळे शरीरामधील स्नेह (तेलातुपाचा अंश) कमी होत जातो आणि रुक्षता (कोरडेपणा) वाढत जातो, तेव्हा कोरड्या गुणांचा वात वाढतो. उन्हाळ्यातल्या रुक्ष (कोरड्या) वातावरणामुळे, कोरड्या वातावरणाला त्याच गुणांच्या (कोरडेपणा वाढवणार्‍या) आहाराची जोड मिळाल्यामुळे आणि जीवनशैलीमधील रात्री जागरण, अतिव्यायाम यांसारख्या चुकांमुळे ग्रीष्मातल्या उन्हाळ्यात वात वाढतो व शरीरात जमत जातो (संचय). उन्हाळ्यात वात वाढत असूनही त्या दिवसांमध्ये वाताचा प्रकोप का होत नाही? त्याचे कारण म्हणजे उन्हाळ्यातली उष्णता.

हेही वाचा… सावधान! पक्षी, प्राण्यांपासून बर्ड फ्लू संसर्गाचा मानवाला धोका

वातावरणातील उष्णतेमुळे शीत गुणांचा वात वाढला तरी तो इतका वाढत नाही की उसळून (प्रकुपित होऊन) रोगकारक होईल. मात्र पावसाळा सुरु होऊन वातावरणात थंडावा वाढला की पावसाळ्यातील थंड-ओलसर वातावरण शरीरात आधीपासून जमलेल्या मुळात थंड गुणाच्या वाताचा प्रकोप व्हायला कारणीभूत होते. पावसाळ्यातला हा वातप्रकोप विविध वातविकारांना कारणीभूत होतो. त्यामुळे आपण उन्हाळ्यामध्येच आहारविहार सांभाळला आणि वातसंचय तितक्या तीव्रतेने होऊ दिला नाही तर पावसाळ्यात होणारा वातप्रकोप तेवढ्या तीव्रतेने होणार नाही. उन्हाळ्यात शरीरामध्ये वाताचा संचय होऊ नये (वात जमू नये) योग्य ती काळजी घ्यावी.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why accumulation of vaat occurs in summer and outbreak in monsoon hldc dvr
Show comments