Arvind Kejriwal Toffee Jail, Diabetes Remedies: कथित मद्यघोटाळ्याच्या प्रकरणात ईडीने अटक केल्यानंतर तिहार तुरुंगात असलेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना टॉफी (चॉकलेट – गोळ्या) ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यांनी केजरीवाल यांना इसबगोल, ग्लुकोज आणि टॉफीसह शुगर सेन्सर आणि ग्लुकोमीटर सारखी उपकरणे ठेवण्याची अनुमती देण्यात आली आहे. या अहवालात पुढे नमूद करण्यात आले आहे की, मधुमेह असलेल्या केजरीवाल यांच्या साखरेची पातळी अचानक कमी झाल्यास या वस्तू वापरण्यास परवानगी द्यावी, असे न्यायालयाने तुरुंगाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.
‘आप’चे नेते आतिशी यांनी X वर लिहिलेल्या पोस्टमध्ये नमूद केले की, केजरीवाल यांना २१ मार्च रोजी अटक झाल्यापासून त्यांचे वजन तब्बल ४.५ किलो कमी झाले आहे. ही बाब चिंताजनक आहे, अरविंद केजरीवाल यांना आधीच मधुमेह आहे, अधूनमधून ते आजारी सुद्धा असतात पण तरीही देशसेवेसाठी २४ तास काम करत असतात.” पण खरोखरच रक्तातील साखरेच्या चढ-उतारावर नियंत्रण ठेवण्यासाठी चॉकलेट कामी येतं का? केजरीवाल यांना चॉकलेट गोळ्या जवळ ठेवण्याची परवानगी देऊन मदत होईल का, याविषयी आज आपण तज्ज्ञांचे मत जाणून घेणार आहोत.
शरीरातील साखरेच्या पातळीत चढ-उतार कशामुळे होतात?
70 mg/dL (3.9 mmol/L) ते 100 mg/dL (5.6 mmol/L) मधील ग्लुकोजची सामान्य पातळी गाठणे आणि राखणे हे मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी महत्त्वाचे तरीही कठीण काम आहे. रक्तातील साखरेचे चढ-उतार होणे याला ‘ग्लायसेमिक व्हेरिएबिलिटी’ म्हणतात, यामध्ये मुख्यतः रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी जास्त होत असते.
वयोवृद्ध मधुमेही रुग्णांमध्ये पुरेसा आहार न घेणे, ताणतणाव, झोप न लागणे आणि अन्य अनेक कारणांमुळे साखरेचे प्रमाण कमी होण्याची शक्यता असते. तसेच गंभीर संसर्ग, सेप्सिस, दीर्घकालीन मूत्रपिंड आणि यकृताच्या समस्या तसेच कर्करोग असलेल्या रुग्णांमध्ये साखरेची पातळी वारंवार कमी होऊ शकते. ग्लुकोजच्या पातळीनुसार, उच्च शर्करा म्हणजे हायपरग्लाइसेमिया आणि कमी शर्करा म्हणजेच हायपोग्लाइसेमियाचा या स्थिती उद्भवू शकतात.
चॉकलेट गोळ्यांमुळे रक्तातील साखरेवर कसा प्रभाव होतो?
डॉ बिमल छाजेर, वरिष्ठ हृदयरोगतज्ज्ञ, एम्सचे माजी सल्लागार आणि संचालक, SAAOL हार्ट सेंटर, नवी दिल्ली हे इंडियन एक्सस्प्रेसला सांगतात की,
“साखर कमी असलेल्या स्थितीत (हायपोग्लायसेमिया) रक्तातील ग्लुकोजची पातळी पटकन वाढू शकते, चॉकलेट गोळ्यांमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होऊ शकते. मधुमेह असलेल्यांना, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी म्हणूनच चॉकलेट गोळ्या आपल्याजवळ ठेवाव्यात.”
“इतकंच नाही, फळे आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये आढळणारे सुक्रोज, फ्रक्टोज आणि लॅक्टोज यांसारखे साधे कार्बोहायड्रेट त्वरित ऊर्जा निर्माण करतात. असे साधे कार्बोहायड्रेट चॉकलेट, टॉफी आणि मिठाई यांसारख्या प्रक्रिया केलेल्या स्वरूपात देखील दिसतात. यामुळे अशक्तपणा, गोंधळ होणं, अंग थरथरणं यासारखी लक्षणे दूर होतात.”
‘या’ गोष्टी मधुमेहाच्या रुग्णांनी नेहमी लक्षात ठेवाव्यात!
तसेच डॉ पंकज वर्मा, वरिष्ठ सल्लागार, अंतर्गत औषध विभाग, गुरुग्राम, नारायण हॉस्पिटल यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, “लक्षात ठेवा की जास्त टॉफी किंवा साखरयुक्त स्नॅक्स खाल्ल्याने रक्तातील साखर वाढू शकते, जे विशेषतः मधुमेह असलेल्या लोकांसाठी धोकादायक असू शकते. याव्यतिरिक्त, मधुमेह असलेल्या व्यक्तींनी त्यांच्या एकूण साखरेचे सेवन नियंत्रणात ठेवले पाहिजे आणि रक्तातील साखरेची पातळी अधिक प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यासाठी कमी ग्लायसेमिक इंडेक्सच्या आरोग्यदायी पदार्थांच्या पर्यायांचा विचार केला पाहिजे.”
हे ही वाचा<< एका कलिंगडात दडलंय किती पोषण? डायबिटीस असो वा वजन कमी करण्याचं मिशन, किती व कसं खाल गोड कलिंगड?
वजन, हालचालींची पातळी आणि रक्तातील साखरेची पातळी या गोष्टी लक्षात ठेवूनच चॉकलेट गोळ्यांच्या सेवनाचे प्रमाण ठरवावे. रक्तातील साखरेची पातळी आणि आहार नियंत्रित करण्यासाठी तुमच्या आरोग्य परिस्थितीची माहिती असणाऱ्या तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.