आयुर्वेदीय ग्रंथात केळ्याचे गुण सांगितलेले आहेत, तशा गुणाची केळी क्वचितच बाजारात मिळतात. आजकालची केळी ही भट्टी लावून एका रात्रीत पिकवलेली केळी असतात. त्यामुळे निसर्गनियमाने झाडावर पिकलेल्या केळ्यांपेक्षा या हिरव्या सालीच्या केळ्यांचा गुणांचा असा सापेक्ष विचार करावयास हवा. बंगलोर ते म्हैसूर अशा प्रवासात वाटेत एका गावात वेगळ्याच जातीची, हिरवीगार केळी मिळतात. आपण चिकू किंवा पेरू खातो तशी ही केळी साल न काढता सरसकट खाल्ली जातात. केळ्याच्या वेफर्सकरिता वापरली जाणारी केळ्याची जात काही वेगळीच असते. त्या केळ्यांचे घडचे घड वाहून नेणारे ट्रक माटुंगा, मुंबई येथे नेहमी येत असतात.
केळ्याच्या सर्वसामान्य गुणांत पौष्टिक, थंड, जड, स्निग्ध, शुक्रवर्धक, दाहनाशक, क्षत व क्षय विकारात उपयुक्त असा शास्त्रांचा सांगावा आहे. ग्रंथाप्रमाणे केळे हे कफकारक व मलावरोध निर्माण करणारे आहे. प्रत्यक्ष व्यवहारात काय घडते व रुग्ण अनुभवाने आपण काय शिकावयाचे. ‘केळ्याचे पथ्यापथ्य’ कसे सांभाळायचे हे पाहू. कारण अजून तरी गरीब माणसाकरिता केळे ही एकमेव चैन राहिली आहे.
ज्यांचे वजन खूप कमी आहे. नोकरी मिळवण्यात वजनाची अडचण येते किंवा लग्नाच्या बाजारात मुलामुलींना पंचाईत पडते, त्यांनी प्रयत्नपूर्वक वजन वाढवावयास हवे. त्याकरिता किमात एक महिना हिरव्या सालीची दोन केळी, काळी मिरेपूड व शक्य असल्यास चमचा दोन चमचे चांगले तूप असा सकाळी व रात्री खाण्याचा प्रघात ठेवावा. सर्दी, कफ यांचा त्रास असणाऱ्यांनी सकाळी केळी खावी. केळ्याचे अजीर्ण होऊ नये म्हणून बरोबर वेलची दोन-चार दाणे खावे. आग होणे, केस गळणे, रूक्षता, पोटात आग पडणे, डोकेदुखी, दुबळेपणा, क्षय या विकारात केळे योग्य अनुपानाबरोबर खावे.
केळे खाऊन काहींना मलावरोध होतो. पण त्यापेक्षा अधिक संख्येच्या लोकांना उशिराने का होईना मलप्रवृत्ती साफ होते असा अनुभव आहे. दूध व केळे एकत्र घेऊ नये असा आहार शास्त्राचा सांगावा आहे. त्याकरिता शिकरण करून खाण्यापेक्षा केळे खाऊन वर दूधसाखर घ्यावी. मलावरोध होत नाही.
केळीच्या खुंटाचा रस हा मासिक पाळी व्यवस्थित होण्यास उपयोगी पडतो. कष्टार्तव, अल्पार्तव या तक्रारीत दोन-तीन चमचे हा रस नियमाने महिनाभर घ्यावा. हा रस उष्ण आहे. केळीच्या वाळलेल्या खुंटाची राख लघवी साफ करते. लघवी अडली असल्यास अशी राख चमचाभर, एक ग्लासभर पाण्याबरोबर घ्यावी, लघवी सुटते.
कुपथ्यकारक केळे- माझ्या पथ्यापथ्याच्या लाल कागदात केळे शब्दावर सारखी काट मारावी लागते. कारण केळे हे कृत्रिमपणे, जबरदस्तीने, भट्टी लावून पावडर मारून पिकवले जाते. खूपदा केळे शरीरात आमांश निर्माण करते. आम किंवा शौचाला चिकटपणा व अग्नी मंद करणे हे केळ्याच्या स्वभावातील दोष आहेत. त्यामुळेच आमांश, कृमी, जंत, कोड, त्वचाविकार, कफविकार, दमा, सर्दी, पडसे, खोकला, टॉन्सिल्सची फाजील वाढ, ताप, फुफ्फुसाचे विकार, मधुमेह, रक्ताचे विकार, शय्यामूत्र, सायटिका, सांध्याचे व वाताचे विकार, सोरायसिस या विकारात केळे पूर्ण वर्ज्य करावे.
कोडाच्या पांढऱ्या डागाच्या दुखण्यात तसेच लहान बालकांच्या कफ विकारात केळे जरूर टाळावे. कावीळ व गोवर, कांजिण्या विकारात केळ्यातून औषध देण्याचे फॅड आहे. त्याचा गुणापेक्षा तोटाच जास्त होतो. अपवाद म्हणून वेलची केळे देण्यास हरकत नाही. हे केळे शिळे झाले, साल काळी पडली, तरी आत केळे उत्तम टिकून असते. हे केळे अपायकारक नसते. केळ्याचे पीठ, राजगिरा, शिंगाडा, साबुदाणा, शेंगदाणे व खोबरे याचे थालीपीठ हे उपवासाकरिता व एकूण विचार करता उत्तम टॉनिक आहे. मात्र खाणाऱ्याचा पाचकाग्नि मंद नसावा!
कवठ
कवठ हे चवीने तुरट, गोड व काही प्रमाणात आंबट असते. पिकलेले कवठ अरुची दूर करते. उत्तम पाचक व वातानुलोमन करते. कवठाबरोबर गूळ किंवा जिरेपूड व चवीला मीठ अशी चटणी फारच चांगली व पौष्टिक आहे. कवठ हे उचकी व उलटीवर उत्तम औषध आहे. पिकलेल्या कवठाचा गर वाळवून त्याचे चूर्ण नियमाने घ्यावे. जुनाट संग्रहणी, अतिसार, पोटदुखी आजार बरा होतो. कफप्रधान अम्लपित्तात त्याचे वाळलेले चूर्ण चांगले कार्य करते. छातीतील जळजळ, ढेकर याकरिता कवठ व ओवा चूर्ण एकत्र करून खावे. कवठाच्या चूर्णाचा वापर एक काळ, पाचक चूर्णात उत्तम घटकद्रव्य म्हणून केला जायचा. कवठाचा गर पाण्यात कुस्करावा. पाणी गाळून घ्यावे व त्या पाण्याच्या भावना ओवाचूर्णाला द्यावा. असे ओवाचूर्ण पाचक चूर्णाकरिता वापरले की एकाच वेळी अरुची व अग्निमांद्याावर मात करता येते. कच्चे कवठ कदापि वापरू नये.
© IE Online Media Services (P) Ltd