Health Special सुखोष्ण, सुगंधी, वातनाशक, ऋतूला अनुकूल असे तेल हलक्या हाताने त्वचेवर अनुलोम गतीने लावणे म्हणजे अभ्यंग. अभ्यंग म्हणजे बोली भाषेमध्ये ज्याला मालिश किंवा मसाज म्हणतात तो विधी. यामध्ये सुखोष्ण तेल म्हणजे शरीराला सुखावह होईल इतपत कोमट तेल. महर्षी वाग्भटांनी संपूर्ण शरीराला अभ्यंग करावेच मात्र शिर(डोकं), कान व पाय वात (गती) संबंधित अवयवांना मात्र विशेषकरुन अभ्यंग करावा हे सांगितले आहे. याचे कारण स्पष्ट आहे, जिथे गती आहे तिथे घर्षण आहे आणि जिथे घर्षण आहे तिथे झीज आहे आणि ती झीज भरून काढण्याचा, कमी करण्याचा सोपा उपाय म्हणजे अभ्यंग.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा: https://www.loksatta.com/lifestyle/health-tips/oil-massage-benefits-why-massage-with-oil-more-beneficial-than-cold-cream-hldc-zws-70-4800423/

डोक्याबाबत काळजी इतकीच घ्यायला हवी की शिर(मस्तिष्क) हे शरीरामधील एक प्रधान मर्म (नाजूक अवयव) असल्याने डोक्यावर अभ्यंग करताना गरम तेल वापरू नये, उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात सुखकर होईल इतपत किंचित कोमट वापरावे. अनुलोम गती म्हणजे त्वचेवरील रोम ज्या दिशेने असतात त्या दिशेने किंवा हृदयाच्या दिशेने अभ्यंग करणे. त्यातही हात व पायांवर हृदयाच्या दिशेने अभ्यंग करावा, तर खांदे, कोपर, गुडघे, घोटे, कंबर या सांध्यांच्या जागी वर्तुळाकार अभ्यंग करावा. छाती, पाठ, पोट या अवयवांवरील मांसपेशींची रचना समजून घेऊन त्यांच्या आकार व रचनेनुसार अभ्यंग करणे योग्य.

हेही वाचा:

अभ्यंग करताना त्वचेखालील अवयवांना चालना-गती देणे हा मुख्य उद्देश आहे हे ध्यानात ठेवून मसाज करावा. संपूर्ण शरीराला व्यवस्थित अभ्यंग मिळावा म्हणजेच शरीराच्या प्रत्येक अवयवांना अभ्यंग व्हावा यासाठी ज्या पाच स्थितींमध्ये व्यक्तीला झोपवणे अपेक्षित असते त्या पाच अवस्था पुढीलप्रमाणे- पाठीवर झोपवून, पोटावर झोपवून, डाव्या कुशीवर झोपवून, उजव्या कुशीवर झोपवून, बसून पाय लांब पसरून.

हेही वाचा:

कोणी अभ्यंग करु नये? (सुश्रुतसंहिता४.२४.३५-३७,अष्टाङ्गहृदय१.२.९)

  • ज्यांना कफसंबंधित विकार झाला आहे अर्थात व्यक्ती अशा रोगाने ग्रस्त आहे ज्या रोगामध्ये कफ हा प्रमुख दोष आहे त्यांनी अभ्यंग करु नये.
  • ज्यांनी शोधन पंचकर्म केले आहे म्हणजेच, ज्यांनी वमन(उलट्य़ांद्वारे उर्ध्व शरीराची शुद्धी) किंवा विरेचन(जुलाबांवाटे अधः शरीराची शुद्धी) केली आहे त्यांनी अभ्यंग करु नये. (वमन- विरेचन करण्यापूर्वी संपूर्ण शरीरामधील दोषांची शुद्धी व्हावी यासाठी मात्र विशिष्ट दिवस वाढत्या मात्रेमध्ये औषधी तुपाचे सेवन केल्यावर निदान तीन दिवस अभ्यंग व स्वेदन (वाफ घेणे) केले जाते, जेणेकरुन संपूर्ण शरीरशुद्धी व्हावी.)
  • ज्यांनी निरूह बस्ती ( गुदमार्गावाटे औषधी काढ्याचा एनिमा) घेतलेला आहे त्यांनी अभ्यंग करु नये.
  • ज्यांना अजीर्ण झाले आहे त्यांनी अभ्यंग करु नये.
  • ज्यांना अग्नी मंद असल्याने अन्नाचे नीट पचन न झाल्याने शरीरामध्ये आम (पचनक्रिया मंदावलेली असल्याने पूर्णपणे न पचलेला असा कच्चा आहाररस) तयार झालेला आहे त्यांनी अभ्यंग करु नये.
  • तापामध्ये अभ्यंग करु नये.
  • संतर्पणजन्य (अतिपोषणामुळे संभवणार्‍या) वेगवेगळ्या आजारांमध्ये अभ्यंग करु नये. मात्र अशा व्यक्तींना शरीरामधील चरबी घटवणार्‍या वातनाशक तेलाने केलेला अभ्यंग व त्यानंतर केलेला स्वेदन (घाम आणणारा) उपचार गुणकारी होतो.
  • भरल्यापोटी अभ्यंग करु नये.
मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why body massage is important who should have it and why ayurveda hldc vp70