Khushi Kapoor : बॉलीवूड अभिनेत्री खुशी कपूर सध्या तिच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करण्याच्या कामात व्यग्र आहे. अलीकडेच तिने एका मुलाखतीत तिच्या खाद्यपदार्थांच्या आवडी-निवडींविषयी सांगितले. तिची मोठी बहीण जान्हवीएवढी नाही; पण तिने ती स्वत:ला फूडी असल्याचे सांगितले. तिने पुढे सांगितले की, ती दुग्धजन्य पदार्थ खाणे टाळण्याचा प्रयत्न करते. ती सांगते, “मी दुग्धजन्य पदार्थ खात नाही. कारण- मला माहीत असते की, त्यामुळे माझे पोट दुखणार आहे. मला याची समस्या आहे.” कर्ली टेल्स या यूट्यूब चॅनेलवर बोलताना खुशी पुढे म्हणाली “जान्हवी सर्व प्रकारचे पदार्थ खाते.”
“दुग्धजन्य पदार्थांमध्ये कॅल्शियम, प्रोटिन्स व बी १२ सारखे आवश्यक व्हिटॅमिन्स असतात; पण त्याचे अतिसेवन धोकादायक ठरू शकते. दुग्धजन्य पदार्थांच्या अतिसेवनामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. विशेषत: जेव्हा तुम्ही संतुलित आहार घेत नाही”, असे हैदराबाद येथील ग्लेनेगल्स अवेअर हॉस्पिटलचे मुख्य आहारतज्ज्ञ डॉ. बिराली स्वेथा यांनी सांगितले.
“दुग्धजन्य पदार्थांच्या अति सेवनामुळे पचनाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. विशेषत: ज्या व्यक्तीचे शरीर लॅक्टोज पचवू शकत नाही म्हणजेच ज्यांना लॅक्टोज इन्टॉलरेन्सची समस्या असते. त्यामुळे अतिसार, पोटदुखी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात”, असे डॉ. बिराली यांनी पुढे स्पष्ट केले.
आहारतज्ज्ञ कनिक्का मल्होत्रा यांच्या मते, लॅक्टोज इनटॉलरेन्स ही एक सामान्य समस्या आहे, ज्यामुळे व्यक्तींमध्ये पोटदुखी व अतिसार यांसारखी लक्षणे दिसून येतात.
“जास्त फॅट्स असलेल्या दुग्धजन्य पदार्थांचे सेवन वाढल्याने वजन वाढू शकते आणि कोलेस्ट्रॉलची पातळीसुद्धा वाढू शकते, ज्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांचा धोका वाढू शकतो”, असे डॉ. बिराली सांगतात. तसेच मल्होत्रासुद्धा सांगतात, “दुग्धजन्य पदार्थांमध्ये असलेले सॅच्युरेटेड फॅट्स कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवू शकतात, ज्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधित आजारांचा धोका वाढतो.”
याशिवाय काही दुग्धजन्य पदार्थ, जसे की फ्लेवर्ड दही आणि प्रक्रिया केलेले चीज अनेकदा यामध्ये साखर आणि सोडियम असते, ज्यामुळे चयापचय आणि रक्तदाबाशी संबंधित समस्या वाढतात. दुग्धजन्य पदार्थांवर जास्त अवलंबून राहिल्याने पौष्टिक खाद्यपदार्थांचे अतिसेवन होऊ शकते, ज्यामुळे तुमचा आहार असंतुलित होऊ शकतो,” डॉ बिराली सांगतात.
आहारात समतोल राखण्यासाठी प्रक्रिया न केलेले दुग्धजन्य पदार्थ निवडावेत जसे की कमी फॅट्सयुक्त दूध, गोड नसलेले दही किंवा चीज आणि पालेभाज्या, सुका मेवा व फोर्टिफाइड नॉन-डेअरी पदार्थांसह कॅल्शियमच्या वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करावे. अॅलर्जी असलेल्या व्यक्तींनी दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. आहारात योग्य समतोल राखल्याने दुग्धजन्य पदार्थ फायदेशीर ठरू शकतात आणि त्याचे दुष्परिणाम दिसून येणार नाहीत.